वाघ, विनायक व्यंकट
‘गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया’चे स्वीय शिल्पकार म्हणून लॉर्ड हार्डिंग्ज यांनी गौरविलेले शिल्पकार विनायक व्यंकट वाघ यांचा जन्म कारवार येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण कारवार येथे झाले व नंतर शिल्पकलेचे शिक्षण घेण्यासाठी ते मुंबईच्या सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये दाखल झाले. तेथील त्या वेळचे शिल्पकला विभाग प्रमुख आगासकर यांच्याकडे त्यांनी शिल्पकलेचे धडे गिरवले व ए.एक्स.त्रिंदाद व रावसाहेब धुरंधर यांच्याकडे अनुक्रमे तैलरंग व जलरंग आणि गणपतराव केदारे यांच्याकडून त्यांनी चारकोल व क्रेयॉन्स ही माध्यमे आत्मसात केली. जे.जे.मधून शिक्षण पूर्ण करताकरताच त्यांनी कारवार येथील एका संस्थेसाठी सदाशिवराव वाघ यांचे उत्तम व्यक्तिशिल्प बनवले. सुरुवातीस कामे मिळविण्यासाठी त्यांना खूप प्रयास करावे लागले. मुंबईत स्टुडीओची जागा वारंवार बदलावी लागली; परंतु नंतर गिरगाव चौपाटीवरील सध्या लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यासमोर असलेल्या ‘बीच व्ह्यू’ इमारतीतील स्टुडीओ त्यांनी १९०१ साली स्थापन केला.
स्वातंत्र्यपूर्व काळात उच्चपदस्थ इंग्रज अधिकाऱ्यांनी शिल्पकारासमोर बसून स्वत:चे व्यक्तिशिल्प घडवून घेण्याची प्रथा होती. अर्थातच ही व्यक्तिशिल्पे इंग्रज शिल्पकारांकडूनच घडवून घेतली जात. भारताचे पहिले इंग्रज गव्हर्नर जनरल व्हाइसरॉय लॉर्ड हार्डिंग्ज यांचेही एक व्यक्तिशिल्प इंग्लंडच्या रॉयल अकॅडमी ऑफ आर्टचे प्रख्यात शिल्पकार ‘हॅम्प्टन’ यांनी बनवले होते व त्यासाठी लॉर्ड हार्डिंग्ज त्यांच्यासमोर चार तास बसले होते.
डोक्याला शेंडी राखलेला एक तरुण भारतीय शिल्पकार धीटपणे लॉर्ड हार्डिंग्ज यांच्याकडे गेला व त्याने विनंती केली, ‘‘मी आपले व्यक्तिशिल्प घडवू इच्छितो, आपण मला आपला फक्त दोन तासांचा अमूल्य वेळ द्यावा.’’ लॉर्ड हार्डिंग्ज यांनी त्याची विनंती मान्य केली व या तरुण शिल्पकाराने केवळ दोन तासांत विलक्षण साम्य असलेले लॉर्ड हार्डिंग्जचे व्यक्तिशिल्प शाडूच्या माध्यमात साकार केले. हा तरुण शिल्पकार म्हणजे विनायक वाघ. लॉर्ड हार्डिंग्ज व त्यांची पत्नी यांनी त्या व्यक्तिशिल्पाची प्रशंसा तर केलीच; पण लॉर्ड हार्डिंग्जनी ‘गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया’चे स्वीय शिल्पकार म्हणून त्यांची नेमणूक केली. लॉर्ड हार्डिंग्ज यांनी केलेल्या नेमणुकीनंतर, त्यांच्या शिफारशीमुळे वाघ यांना भरपूर कामे मिळू लागली. सोपे, सुटसुटीत, पण आत्मविश्वासपूर्ण शाडूकाम करून व्यक्तिशी विलक्षण साम्य असलेले घोटीव व्यक्तिशिल्प थोड्याच वेळात निर्माण करणे ही विनायकरावांची खासियत होती. मुंबईच्या टाउन हॉलमध्ये दिलेल्या एका प्रात्यक्षिकात त्यांनी ‘पंचम जॉर्ज’ यांचे उत्कृष्ट व्यक्तिशिल्प केवळ स्मरणाने, फक्त एका तासात साकारले होते.
राजमान्यता मिळाल्यामुळे विनायकरावांना बऱ्याच अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची व्यक्तिशिल्पे घडविण्याची संधी मिळत गेली व त्याचे त्यांनी सार्थक केले. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, लाला लजपतराय, विठ्ठलभाई पटेल, पंडित मदनमोहन मालवीय, डॉ. राजेंद्रप्रसाद, रवींद्रनाथ टागोर, सर विश्वेश्वरय्या, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, लॉर्ड विलिंग्डन यांसारख्या व्यक्तींना प्रत्यक्ष समोर बसवून विनायकरावांनी त्यांची व्यक्तिशिल्पे साकारली. सरकारच्या शिफारशीमुळे बिकानेर, झलवार, कोटा, कपूरथळा, दातिया, उदयपूर, ग्वाल्हेर, म्हैसूर इत्यादी संस्थानांच्या राजेमहाराजांनी विनायकरावांकडून आपली व्यक्तिशिल्पे करून घेतली. संत तुकडोजी महाराज, गाडगेबाबा, साधू वासवानी, सिद्धारूढ स्वामी इत्यादी संतमहात्मे, तसेच जमशेदजी टाटा, राजा बलदेवदास बिर्ला, शेठ आनंदीलाल पोद्दार यांसारखे उद्योगपती, चित्रकार पेस्तनजी बोमनजी, वीणावादक उस्ताद वझीरखान, गायक उस्ताद तनरसखान इत्यादींची व्यक्तिशिल्पेही त्यांनी घडविली. लोकमान्य टिळक, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. राजेंद्रप्रसाद, लॉर्ड विलिंग्डन यांसारख्या थोर व्यक्तींनी त्यांच्या स्टुडीओस भेट दिली होती. विनायक वाघांनी मोतीलाल नेहरूंचेही व्यक्तिशिल्प साकारले होते. ब्राँझ व मार्बल (संगमरवर) या माध्यमांत ते व्यक्तिशिल्पे साकारत.
बाँबे आर्ट सोसायटी, दि आर्ट सोसायटी ऑफ इंडिया या प्रतिष्ठित कलासंस्थांच्या वार्षिक कलाप्रदर्शनांमध्ये त्या काळी त्यांना परितोषिके मिळाली, तसेच विविध ठिकाणी त्यांनी व्यक्तिशिल्पे घडविण्याची प्रात्यक्षिकेही दिली. प्रसिद्ध वीणावादक उस्ताद वझीरखान यांच्याकडे विनायकराव वीणावादन शिकले व ते उत्तम वीणावादन करीत असत.
वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी, वृद्धापकाळामुळे त्यांना देवाज्ञा झाली. विनायकरावांचा वारसा त्यांचे चिरंजीव ब्रह्मेश वाघ यांनी पुढे नेला. ब्रह्मेश वाघ यांचा जन्म मुंबईत १७ सप्टेंबर १९१७ रोजी झाला. त्यांचे शिल्पकलेचे शिक्षण सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये पार पडले. डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी ‘राष्ट्रपतींचे स्वीय शिल्पकार’ म्हणून त्यांची व वाघ स्टूडिओची नेमणूक केली. भारतीय संसदेसमोरील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’, काठमांडू येथील ‘नेपाळ नरेश त्रिभुवन’, हैदराबाद येथील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’, दिल्लीतील ‘सरदार वल्लभभाई पटेल’, राष्ट्रपती भवनातील ‘डॉ. झाकीर हुसेन’, वज्रेश्वरी येथील ‘स्वामी नित्यानंद’ अशी विविध मोक्याच्या ठिकाणी उभारलेली व्यक्तिशिल्पे ब्रह्मेश वाघ यांनी साकारली. १४ एप्रिल १९९३ रोजी वयाच्या शहात्तराव्या वर्षी त्यांचे निधन झाले.
विनायकरावांचे नातू विनय वाघ यांनी ही शिल्पकलेची परंपरा व साधना, वाघ स्टुडीओत सुरू ठेवली आहे. त्यांनीदेखील जम्मू येथे ‘गुलाबसिंग महाराज’, बंगळुरू विधानसभेसाठी ‘देवराज अर्स’, ‘लालबहादूर शास्त्री’ व ‘बाबू जगजीवनराम’, दक्षिण आफ्रिकेसाठी ‘नेल्सन मंडेला’, अमेरिकेतील मेम्फॅसिस येथील ‘महात्मा गांधी’ यांसारख्या विविध लक्षवेधी शिल्पाकृती निर्माण केल्या आहेत.
- डॉ. गोपाळ नेने