Skip to main content
x

वाघमारे, जनार्दन माधव

     जनार्दन वाघमारे यांचा जन्म लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातील कौठा या गावी झाला. लातूरच्या राजस्थान विद्यालयातून १९५३ साली शालान्त परीक्षा, चार वर्षांनी हैद्राबादच्या निजाम महा-विद्यालयातून पदवी परीक्षा, पुणे विद्यापीठातून १९५९ साली एम.ए. आणि मराठवाडा विद्यापीठातून  ‘निग्रो साहित्य आणि संस्कृती’ या विषयावर प्रबंध लिहून १९८० साली त्यांनी डॉक्टरेट संपादन केली.

     प्रा.डॉ. वाघमारे दीर्घकाल प्राचार्य होते व पुढे स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू झाले. त्यांनी १९६२ सालापासून लेखन सुरू केले.

     जून १९८८ मध्ये, नाशिक येथे भरलेल्या दलित-आदिवासी-ग्रामीण संयुक्त साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून त्यांनी आपले विचार व्यक्त केले: “वाङ्मयीन क्षेत्रात ज्या विविध चळवळी निर्माण झाल्या आणि होत आहेत, त्या चळवळींचा एक डोळस साक्षीदारमात्र मी निश्चितच आहे. त्या चळवळींचा स्पर्श माझ्या शब्दांना व लेखणीला होणे क्रमप्राप्त होते आणि म्हणून तो झाला आहे.”

     संयुक्त संमेलनाला स्पष्टपणे मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, “राजकीय आणि आर्थिक लढ्यांपेक्षा सांस्कृतिक लढे हे अधिक गुंतागुंतीचे व दीर्घकाल चालणारे असतात, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. समग्र, सम्यक परिवर्तन हीच या युगाची साद असून संस्कृतिचक्र परिवर्तन हेच दलित-आदिवासी-ग्रामीण साहित्याचे अंतिम उद्दिष्ट असले पाहिजे.”

     वाघमारे यांनी नारायण सुर्वे, ना.धों. महानोर, वर्ड्सवर्थ, वि.वा. शिरवाडकर यांची समर्पक उद्धरणे देऊन, संमेलन भरवण्याचा हेतू स्पष्ट करून, सर्वांनी निश्चितपणे, पण निर्धाराने युगयात्रा चालू ठेवावी, असे आवाहन केले. डॉ.जनार्दन वाघमारे यांनी मूल्य जोपासणार्‍या एकवीस व्यक्तींची हृद्य ओळख ‘जीवनरेखा’ या आपल्या ग्रंथात करून दिली आहे. डॉ.राधाकृष्णन, प्रा.शिवाजीराव भोसले, देवीसिंग चौहान, गोविंदभाई श्रॉफ इत्यादींचा त्यात समावेश आहे. यातले व्यक्तिचित्रण लेखकाच्या दृष्टिकोनातून केलेले असले, तरी त्याला वास्तवाचा आधार आहे. कुशल प्रशासक, शिक्षणतज्ज्ञ व प्रत्यक्ष कर्ते सुधारक असा डॉ.जनार्दन वाघमारे यांचा लौकिक आहे.

     वाघमारे यांची ‘हाक व आक्रोश’ (१९८४), ‘महाराष्ट्रातील राजकारण व समाजकारण’ (१९८०), ‘शिक्षण: सामाजिक परिवर्तन व राष्ट्रीय विकास’ (१९८४), ‘आजचे शिक्षण: स्वप्न आणि वास्तव’ (१९९३), ‘चिंतन एका कुलगुरूचे’ (१९९९) व इतर काही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ‘मूठभर माती’ हे त्यांचे आत्मचरित्र २००६ साली प्रकाशित झाले.

- वि. ग. जोशी

वाघमारे, जनार्दन माधव