Skip to main content
x

वैद्य, अजित विश्वनाथ

     जित विश्वनाथ वैद्य यांचा जन्म कानपूर येथे झाला. त्यांचे सातवीपर्यंतचे शिक्षण नागपुरातील सीताबर्डी मध्ये न्यू इंग्लिश विद्यालयात झाले. १९५८मध्ये त्यांच्या वडिलांची पुण्यात कृषी महाविद्यालयाचे संचालक म्हणून बदली झाली. त्यामुळे त्यांचे पुढील शिक्षण पुण्यात श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल (एस.एस.पी.एम.एस.) व सेंट व्हिन्सेंट या शाळांमध्ये झाले. अजित वैद्यांचे शिक्षण सुरू असताना त्यांच्या वडिलांनी खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एन.डी.ए.) पाहिली. तेथील शैक्षणिक वातावरण पाहून आपल्या मुलाने सैन्यात जावे असे त्यांना वाटले. म्हणून त्यांनी अजित वैद्यांना सैन्यात जाण्यास सुचविले. त्यांची पत्नी सुशीलाबाई यांनीही पतीच्या सांगण्याला पाठिंबा दिला. १९६३ साली शालान्त परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर १९६४मध्ये त्यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची परीक्षा दिली. अजित यांनी वायुसेनेचा अभ्यासक्रम निवडला.

     १९६७मध्ये प्रबोधिनीचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर त्यांना दीड वर्षांचे प्रशिक्षण मिळाले. त्यानंतर लढाऊ वैमानिक म्हणून त्यांना पहिली नियुक्ती लुधियानाजवळ हलवारा येथे मिळाली. १९६८ ते १९७० पर्यंत नॅट स्क्वॉड्रन मध्ये काम केल्यानंतर दिल्लीजवळच्या  वायुसेनेच्या तळावर मिग-२१ या रशियन बनावटीच्या विमानांचे वैमानिक म्हणून त्यांची नेमणूक झाली. १९७१मध्ये भारत-पाकिस्तान युद्धात त्यांनी भाग घेतला.

     १९७४मध्ये त्यांनी विमानोड्डाण प्रशिक्षक विद्यालयात अभ्यासक्रम पूर्ण केला. या अभ्यासक्रमानंतर विमानोड्डाण प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी काम केले. त्यानंतर १९७६च्या सुरुवातीला मद्रासजवळील तांंबरम येथे प्रशिक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. सप्टेंबर १९७७ ते सप्टेंबर १९७९ अशी दोन वर्षे इराक येथेही त्यांनी प्रशिक्षक म्हणून काम केले. इराकहून परतल्यानंतर नॅट विमानांच्या पथकावर त्यांची पुन्हा नियुक्ती झाली. नंतर १९८२मध्ये उटीजवळ डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजमध्ये त्यांची एका वर्षासाठी नियुक्ती झाली. तिथून दिल्लीजवळ हिंडन येथे १९८२ ते १९८४ या काळात त्यांची परीक्षक मंडळावर नियुक्ती झाली. १९८५मध्ये मिराज २००० विमानांच्या खरेदीसाठी फ्रान्सला पाठवण्यात आलेल्या समितीमध्ये त्यांचा सहभाग होता. यानंतर ग्वाल्हेरच्या वायुसेनेच्या तळावर मिराज २००० वर त्यांची नियुक्ती झाली. तेथून त्यांची हैद्राबाद येथे बदली झाली.

     १९९१ ते १९९४ याकाळात एअर क्रू बोर्डवर परीक्षक म्हणून वैद्य रांची नेमणूक झाली. इथे वैमानिकांचे गुणांकन, ढगांमध्ये उड्डाण असेल तर त्यांची क्षमता तपासणी, हे काम त्यांच्याकडे होते. त्यानंतर १९९४मध्ये कच्छजवळ नलिया येथील तळावर कमांडर म्हणून त्यांची नेमणूक झाली. १९९९ ते २०००च्या दरम्यान त्यांची लोहगाव हवाईतळाचे प्रमुख म्हणून नेमणूक झाली. २०००मध्ये राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयामधून अभ्यास पूर्ण केल्यानंतर त्यांना 'एअर डिफेन्स कमांडर' म्हणून बढती मिळाली. त्याचवेळी एअर व्हाइस मार्शल म्हणूनही बढती मिळाली.

     त्यानंतर दिल्ली येथे वायुभवनात वेस्टर्न एअर कमांडर म्हणून त्यांची बदली झाली. त्यानंतर २००४ ते २००६ या काळात ईस्टर्न एअर कमांडर म्हणूनही त्यांनी काम केले. त्यानंतर त्यांनी दिल्ली येथे डेप्युटी चीफ इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ म्हणून अडीच वर्षे काम बघितले. या काळात उत्तर भारतात झालेल्या भूकंपानंतर उद्भवलेली आणीबाणीची परिस्थिती त्यांनी उत्तमपणे हाताळली. तसेच, अकराव्या सर्वंकष संरक्षण योजनेच्या (इंटिग्रेटेड डिफेन्स प्लॅन) आखणीतही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. २००८ मध्ये एअर मार्शल म्हणून ते निवृत्त झाले.

     वैद्य यांनी सेवाकाळात ३००० तासांचे विना-अपघात उड्डाण केले आहे. त्यांनी नॅट, मिग-२१, मिराज-२०००, मिग-२९, तसेच अद्ययावत एसयू-३० ही लढाऊ विमाने चालवली आहेत. विंग कमांडर म्हणून त्यांनी मिराज-२००० स्क्वॉड्रनवर काम केले आहे. १९८८ साली मालदिवमध्ये शासन ताब्यात घेण्यासाठी श्रीलंकेच्या विभाजनवादी अतिरेकी संघटनेने केलेला उठाव हाणून पाडण्यासाठी भारतीय सेनेने हाती घेतलेल्या ‘ऑपरेशन कॅक्टस’ या मोहिमेत अजित वैद्य यांनी भाग घेतला होता. त्यानंतर त्यांना १९९०मध्ये ‘वायुसेना’ पदक प्रदान करण्यात आले. ३९ वर्षांच्या उत्तम सेवेबद्दल अजित वैद्य यांना जानेवारी २००८मध्ये ‘परमविशिष्ट’ सेवा पदक प्रदान करण्यात आले.

     - वर्षा जोशी-आठवले

वैद्य, अजित विश्वनाथ