Skip to main content
x

वैद्य, चिंतामण विनायक

     हाभारताचे मर्मज्ञ मीमांसक, रामायणाचे रसिक विश्लेषक, प्राचीन भारतीय साहित्य संस्कृतीचे प्रकांड पंडित, अर्वाचीन इतिहासाचे साक्षेपी विवेचक, लोकमान्य टिळकांचे राष्ट्रीय चळवळीतील सहकारी अशी चिंतामण विनायक वैद्य यांची ओळख आहे. सुखवस्तू वकील पित्याच्या घरी कल्याण येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे बालपण व प्राथमिक शिक्षण कल्याण येथेच झाले. मुंबईच्या एलफिन्स्टन हायस्कूल व याच महाविद्यालयामध्ये पुढील शिक्षण त्यांनी घेतले. ते १८७७ साली मॅट्रिक, तर १८८४ साली त्यांनी एल्एल.बी. पूर्ण केले. त्यांनी सर्व शिक्षण प्रथम श्रेणीत तसेच विविध पारितोषिकांसह केले.

     पुढे त्यांनी कोल्हापूर संस्थानात न्यायाधीशाची नोकरी स्वीकारली. १८८६मध्ये वडिलांच्या निधनानंतर त्यांनी ग्वाल्हेर संस्थानात जिल्हा न्यायाधीश नोकरी स्वीकारली. उज्जैन येथे काही काळ राहिल्यानंतर ते मुख्य न्यायाधीश झाले. १९०५ नंंतर ग्वाल्हेर येथून स्वेच्छानिवृत्ती घेऊन ते टिळकांबरोबर समाजकार्यात (१९०५-१९२०) सहभागी झाले. टिळकांनंतर ते म.गांधींच्या सहवासात (१९२०-१९३०) आले.

     चिंतामणरावांनी अनेक ग्रंथांचे लेखन केले. विशेषत: महाभारताचे उपसंहार, श्रीकृष्णचरित्र, भारतीय वीरकथा, दुर्दैवी रंगू (पानिपतावरील ऐतिहासिक कादंबरी) ही त्यांची पुस्तके घरोघरी पोहोचली. गीतारहस्य वगळता त्या तोडीचा दुसरा ग्रंथ म्हणून वैद्यांनी लिहिलेला महाभारताचा उपसंहार हा होता. १८० पृष्ठांचा हा उपसंहार १९१८साली प्रसिद्ध झाला. वैद्य यांचा हा उपसंहार वाचताना त्यांच्या विद्वत्तेचा प्रत्यय जागोजागी येतो. आपल्या ग्रंथलेखनासाठी त्यांनी विविध ग्रंथांचा आधार घेतला होता. वैद्यांच्या या लेखनाविषयी काही मतभेद व्यक्त केले गेले असले, तरी त्यांनी आपल्या उपसंहार लेखनात, (भांडारकर संस्थानाने प्रसिद्ध केलेली महाभारताची संशोधन आवृत्ती तेव्हा प्रसिद्ध झालेली नव्हती, हे लक्षात घ्यावे) ‘कुंभकोणम’ प्रतीतील श्लोक व देवनागरी पाठातील काही प्रक्षिप्त श्लोक विचारात घेतल्यामुळेच हे मतभेद झाले. त्यांचे काम आजही अभ्यासकांना मार्गदर्शकात्मक आहे. महाभारतावरील त्यांचा अभ्यास लक्षात घेऊन लोकमान्य टिळकांनी त्यांना सन १९०५मध्ये ‘भारताचार्य’ या पदवीने सन्मानित केले. टिळकांच्या स्मरणार्थ स्थापन केलेल्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठात त्यांचा सहभाग होता. ते या विद्यापीठाचे ‘कुलगुरू’ (१९२२ ते १९३४) व (१९३४ ते १९३८) ‘कुलपती’ झाले. चिंतामणयांनी १९२०-१९३८ हा आपल्या आयुष्याचा १८ वर्षांचा काळ टिळक महाराष्ट्र विद्यापीठासाठी घालवला. ६ मे १९२१ रोजी स्थापना झालेले हे विद्यापीठ नावारूपाला आणून त्यांनी राष्ट्रीय शिक्षणाचा पुरस्कार केला. ज्ञानक्षेत्रातील त्यांचा अधिकार जाणून टिळक विद्यापीठाने ‘विद्वत्कुलशेखर’ ही सन्मानाची पदवी त्यांना दिली.

     वैद्य यांची ग्रंथसंपदा विपुल आहे. त्यांनी ‘विविध ज्ञानविस्तार’मधून विविध लेख प्रसिद्ध केले व नंतर ते ग्रंथ स्वरूपात आणले. ‘अबलोन्नती ग्रंथमाला’ (आठ लेख) (१८८९-१८९५); ‘महाभारत-ए-क्रिटीसिझिम’ (१९०४-मुंबई); ‘संक्षिप्त भारत-श्लोकरूपाने’ (१९०५); ‘रिडल ऑफ रामायण’ (१९०६); ‘संक्षिप्त रामायण-श्लोकरूपाने’ (१९०६); ‘अबलोन्नती लेखमाला’ (१९०६); ‘माझा प्रवास’ (विष्णुभट गोडसे यांची १८५७च्या बंडाबद्दल हकिकत (१९०७); ‘एपिक इंडिया’ (१९०७); ‘संक्षिप्त मनुस्मृती’ (१९०९); ‘श्रीराम चरित्र’ (१९११); ‘दुर्दैवी रंगू’ (१९१४); ‘श्रीकृष्णचरित्र’ (१९१६); ‘वैद्यांचे वाङ्मयात्मक निबंध’ (१९१६); ‘महाभारताचा उपसंहार’ (१९१८); ‘मिडिव्हल हिंदू इंडिया’- व्हॉल्युम वन (१९२१); ‘मिडिव्हल हिंदू इंडिया’- व्हॉल्युम टु (१९२४); व्हॉल्युम थ्री- ‘मिडिव्हल हिंदू इंडिया’ (१९२६); ‘संस्कृत वाङ्मयाचा त्रोटक इतिहास’ (१९२२); ‘मध्ययुगीन भारत भाग’ (१९२५); ‘डाउनफॉल ऑफ हिंदु’ (१९२६); ‘गझनीच्या महमूदाच्या स्वार्‍या’ (१९२६); ‘ए हिस्टरी ऑफ संस्कृत लिटरेचर’ (१९२६); ‘भारतीय वीरकथा’ (१९२८); ‘वैद्यांचे ऐतिहासिक निबंध’ (१९३१); ‘शिवाजी, द फाउंडर ऑफ मराठा स्वराज’ (१९३१); ‘हिंदुधर्माची तत्त्वे’ (१९३१); ‘श्रीमद्भगवद्गीता व तिचे भाषांतर’ (१९३२); ‘महाभारताचे खंड सभापर्व-विराटपर्व-उद्योगपर्व’ (१९३३-३५); ‘संयोगिता नाटक’ (१९३४).

    ही सर्व सूची पाहता, वैद्यांनी प्राच्यविद्या, मध्ययुगीन इतिहास, ऐतिहासिक कादंबरी यांशिवाय संस्कृत साहित्याचा इतिहास, हिंदू तत्त्वज्ञान अशा क्षेत्रांत विपुल काम केल्याचे दिसते. त्यांच्या कामात सूक्ष्म चिंतन, एखाद्या विषयाची साक्षेपाने समीक्षा करण्याची जिद्द दिसते. अभ्यासकांना त्यांचा अभ्यास मार्गदर्शक ठरतो. त्यांच्या अभ्यासपद्धतीमुळे व त्यांनी कालिदासाच्या संस्कृत साहित्याचा अभ्यास केल्याने त्यांच्या लेखनात भाषावैभव प्रकर्षाने जाणवते. प्राच्य काव्याचा ते लीलया वापर करत. त्यांचे एक चिंतन मराठी भाषेच्या संदर्भात ‘विविध ज्ञानविस्तार’मधून प्रकाशित झाले होते. या संदर्भात व्याख्याने देताना मराठी भाषेच्या भौगोलिक सीमा स्पष्ट करून ‘महाराष्ट्र देश व मराठी भाषा’ यांचे अस्तित्व ख्रिस्त सनापासून असल्याचे स्पष्ट केले. महाराष्ट्रीय भाषा ही शौरसेनीची बहीण असल्याचे म्हटले आहे. होर्न्ले, ग्रिर्यसन यांनी केलेल्या ‘अंतर्वर्तुळातील भाषा व बहिर्वर्तुळातील भाषा’ या वर्गीकरणाची दखल घेऊन मराठी भाषा ही बहिर्वर्तुळातील भाषा असली, तरी शौरसेनीसारख्या अंतर्वर्तुळाच्या भाषेशी साधर्म्य आहे असे मत त्यांनी मांडले. वैद्य यांची ‘निबंध आणि भाषणे’ हा लेखसंग्रह महत्त्वाचा आहे.

    मराठीच्या उगमाविषयी (काळाबाबत) त्यांनी ‘ज्ञानविस्तार’मध्ये लिहिले. ‘शंकराचार्यांची चळवळ’ हा त्यातील एक महत्त्वाचा मुद्दा प्रतिपादन केला. या व अशा अनेक विषयांवर त्यांनी लेखन केले. याशिवाय त्यांचा प्रत्येक राष्ट्रीय चळवळीत सहभाग होता. एक प्रकांड पंडित व वक्ते म्हणून त्यांची नोंद करावी लागते. लोकमान्य टिळकांनी सन १८९२मध्ये म्हणजेच वैद्यांचा उगम होत असताना ‘वैद्यांच्या व्यापक बुद्धीचे, दीर्घ परिश्रमाचे, अवलोकनाचे आश्चर्य वाटल्यावाचून राहणार नाही,’ असे मत नोंदवले होते. त्यांच्याविषयी दत्तो वामन पोतदार यांनी म्हटले की, ‘अत्यंत साधी राहणी, अत्यंत प्रखर बुद्धिमत्ता, प्रगाढ व्यासंग, ज्योतिष, संगीत, इतिहास, पुराणे, वेद, धर्मशास्त्राचा दीर्घ व सखोल अभ्यास आणि या अभ्यासाची फळे इंग्रजी-मराठी भाषेमध्ये निरलसपणे सादर करण्याची तत्परता... या सर्वांमुळे, चिंतामणरावांनी भीष्माचार्य, भारताचार्य या लोकार्पित पदव्या सार्थवून महाराष्ट्राची व भारताची चिरस्मरणीय सेवा केली.’ (सह्याद्री, मे, १९३८)

     — डॉ. अरुणचंद्र शं. पाठक

संदर्भ
१. भारताचार्य चिं. वि. वैद्य स्मृतिग्रंथ- द. भि. कुलकर्णी, प्रा. नारायण भालचंद्र वैद्य संपादित, १९९६, नागपूर.
वैद्य, चिंतामण विनायक