Skip to main content
x

वैद्य, विद्याधर गोविंद

        विद्याधर गोविंद वैद्य हे इंटेलिजन्स ब्युरो ऑफ इंडिया या भारतीय गुप्तहेर संस्थेच्या संचालक पदावर नियुक्त झालेले आतापर्यंतचे एकमेव महाराष्ट्रीयन पोलीस अधिकारी आहेत. त्यांचा जन्म मध्य प्रदेशातल्या बऱ्हाणपूर इथं  झाला. गोविंद कृष्ण आणि राधाबाई वैद्य हे त्यांचे आई-वडील अकाली निवर्तल्यानं त्यांचे संगोपन वडीलबंधूंनी केले. मध्य प्रदेशात बंधूंची नोकरी फिरस्तीची असल्यानं त्यांचे शालेय शिक्षण मुख्यत्वेकरून नागपूर, रायपूर आणि जबलपूर येथे मराठी आणि हिंदी माध्यमातून झालं. महाविद्यालयीन शिक्षण नागपूरला झालं. नागपूर विद्यापीठाची संपूर्ण गणित या विषयाची एम.एस्सी.पदवी त्यांनी १९५६ साली सुवर्णपदकासह प्रथम क्रमांकाने प्राप्त केली.

      पदवी मिळाल्यावर १९५६ ते १९५८ या काळात  वैद्य यांनी नागपूरच्या सायन्स महाविद्यालयात व्याख्याता म्हणून अध्यापनाचं काम केलं. नोकरी करत असतानाच त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यु.पी.एस.सी.) परीक्षेची तयारी केली. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांची निवड भारतीय पोलीस सेवेत झाली आणि निवृत्त होईपर्यंत ते याच सेवेत कार्यरत होते. पोलीस सेवेच्या आवश्यक प्रशिक्षणानंतर १९५९ साली साहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून त्यांची पहिली नियुक्ती सुरत इथं झाली. नोव्हेंबर १९५९ ते मार्च १९६२ या काळात याच पदावर त्यांनी पुणे आणि कोल्हापूर इथंही काम पाहिलं. त्यानंतर वैद्यांची केंद्र शासनाच्या गुप्तहेर विभागात प्रतिनियुक्तीवर नेमणूक झाली आणि त्याच विभागाच्या संचालक पदावरून ते निवृत्त झाले.

      गुप्तहेर खात्याच्या कामाचं स्वरूप नावाप्रमाणेच गुप्त आणि त्याचबरोबर संवेदनशील असल्यानं खास नोंद घेण्याजोगी कामगिरी केली असली तरी त्याची सविस्तर माहिती जाहीर करण्याबाबत प्रशासकीय मर्यादा आहेत. देशांतर्गत सुरक्षा अबाधित राहावी यासाठी देशभरच्या समाजविरोधी घटकांबद्दल गुप्त पद्धतीने माहिती संकलित करून त्यांचा बिमोड करणे हे या संघटनेचे प्रमुख कार्य आहे. सारांशाने नोंद घ्यायची झाली तर देशांतर्गत घडलेल्या अनेक संवेदनशील घटनांसंदर्भात वैद्य यांचं प्रशासकीय प्रक्रियेतील योगदान महत्त्वाचं ठरलं आहे.

      ‘विविधतेत एकता’ हे खंडप्राय भारतीय समाजरचनेचं खास वैशिष्ट्य आहे. असं असून देखील देशात राजकीय, धार्मिक परंपरा, भाषा, प्रादेशिक अस्मिता, जातिभेद, वर्णभेद, सीमावाद, नद्यांचं पाणीवाटप, दहशतवाद, नक्षलवाद, प्रचंड आर्थिक विषमता आणि इतर अनेक कारणांमुळे अगदी गाव पातळीवरही हिंसाचार उफाळतो, हा अनुभव आहे. अशा घटना घडू नयेत म्हणून प्रतिबंधात्मक पूर्व माहिती संकलन आणि घडल्यानंतर त्याची सखोल चौकशी हे भारतीय गुप्तहेर संस्थेचे मुख्य कार्य आहे. हे काम देशभर नेमलेल्या मनुष्यबळाच्या माध्यमातून गुप्तपणे करावे लागते. अशा प्रकारे जमवलेली माहिती देशभराच्या कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या विविध यंत्रणांपर्यंत जलद पोहोचवणं हा गुप्तहेर संस्थेच्या कार्याचा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो.

       गुप्तहेर संस्थेचे संचालक असताना वैद्य यांनी आपल्या कार्याचा एक भाग असलेल्या इमिग्रेशन प्रक्रियेचे संगणकीकरण करण्याची अत्यंत मोलाची कामगिरी केली. यामुळे देशातल्या प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळांवरच्या प्रत्येक प्रवाशाबद्दल सर्व प्रकारची माहिती आता स्थानिक कार्यालयात लगेच नोंदवली जाते. यामुळे धोकादायक समाजविरोधी, विशेषत: आंतरराष्ट्रीय दहशतवादी घटकांची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना मिळते आणि ते वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करू शकतात.

       संचालक असताना वैद्य यांनी सुरक्षाविषयक अनेक आंतरराष्ट्रीय संमेलनं आणि परिषदांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केले आहे. यापैकी टोकियो इथं जून १९८७ ला झालेली इंटरपोल आणि युगांडात कंपाला इथं जून १९९३ ला भरलेली राष्ट्रकूल देशांची सुरक्षा परिषद या विशेष नोंद घेण्याजोग्या होत्या. याशिवाय निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांच्या एका अभ्यास गटानं त्वरित पोलीस चौकशी आणि त्यानंतर जलद न्यायालयीन प्रक्रिया या विषयावर अहवाल तयार केला होता. या अहवालाचे सहलेखन वैद्य यांनी केलं. राष्ट्रीय आणि इतर सुरक्षा या विषयावर त्यांनी संरक्षण प्रबोधिनीत व्याख्यानं दिली आहेत. याच विषयावर वैद्य यांचे अनेक लेख प्रकाशित झाले आहेत.

       आपल्या सेवा काळात त्यांनी १९७८ ला राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी संस्थेत सुरक्षेसंबंधी एक वर्षाचं प्रशिक्षण घेतलं. तसंच भारतीय सार्वजनिक प्रशासन अध्यासनात सहा आठवड्यांचा कोर्स केला. संगणक प्रणाली संदर्भात सखोल ज्ञानही त्यांनी आत्मसात केले. परदेशातील सुरक्षा विषयक प्रशिक्षणातही वैद्य सहभागी झाले.

       पोलीस सेवेतल्या कालखंडात वैद्य यांना भारतीय पोलीस सेवा पदक, खास कामगिरीसाठी राष्ट्रपतींचं उत्कृष्ट सेवा पोलीस पदक आणि निरनिराळ्या विभागातल्या नोंद घेण्याजोग्या कार्यासाठी विशेष पोलीस पदक असे तीन पुरस्कार मिळाले आहेत.

- सुधाकर कुलकर्णी

वैद्य, विद्याधर गोविंद