Skip to main content
x

वाळामे, पांडुरंग विठ्ठलपंत

रंगावधूत महाराज

    थोर संत रंगावधूत या दत्त संप्रदायी भक्ताने भगवत्भक्तीचा प्रचार तर केलाच, त्याबरोबर महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात सक्रिय भाग घेतला. गुजरात प्रांतातील गोधरा या गावातील एका सुशिक्षित, स्वावलंबी व सुसंस्कृत कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत व आईचे नाव रुक्मिणी असे होते. आई-वडील विठ्ठलभक्त होते. त्यांनी बाळाचे नाव पांडुरंग असे ठेवले. त्याला नारायण नावाचा एक भाऊही होता. पांडुरंग जात्याच अत्यंत हुशार होता. पांडुरंग याने अभ्यासात पहिला क्रमांक कधीही सोडला नाही. त्याने आपले प्राथमिक शिक्षण गोधरा या गावातील शाळेतच पूर्ण केले. पांडुरंगाची हुशारी व चांगल्या गुणांमुळे तो शिक्षकांचा अत्यंत आवडता विद्यार्थी होता.

लहानपणापासूनच पांडुरंग प्रभू रामचंद्रांचा निस्सीम भक्त होता. मुंज झाल्यानंतर काही दिवसांनी त्याची थोर दत्तभक्त व दत्त संप्रदायातील गुरू, परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती यांंच्याशी भेट झाली. वासुदेवानंद सरस्वती स्वामींची विद्वत्ता पाहून पांडुरंग अतिशय प्रभावित झाले व त्यांनी स्वामींना गुरुस्थानी मानून त्यांचे शिष्यत्व पत्करले. गुरूंच्या आशीर्वादामुळे पांडुरंगांच्या हृदयातील अध्यात्म-ज्योत प्रज्वलित झाली व ते भक्तिमार्गाला लागले. तो काळ भारतीय स्वातंत्र्याच्या भरतीचा काळ होता. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या असहकार आंदोलनामुळे हजारो तरुण आपले शिक्षण सोडून स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होत होते.

पांडुरंगाचेदेखील आपल्या देशावर अतिशय प्रेम होते. तो महाविद्यालयामध्ये शिकत असतानाच महात्मा गांधीजींच्या असहकाराच्या आंदोलनामुळे त्याच्या हृदयातील देशप्रेमाची ज्योत प्रज्वलित झाली. त्याने गांधीजींच्या स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय भाग घेतला.  पांडुरंग गांधीजींना अनेक वेळा भेटले व त्यांचे मार्गदर्शन घेतले. या दरम्यानच्या काळात त्यांनी एम.ए.ची पदवी चांगल्या मार्कांनी संपादन केली. देशप्रेमामुळे सरकारी नोकरीच्या मागे न लागता त्यांनी राष्ट्रीय शाळेत अध्यापनाचे कार्य सुरू केले. विषयाचे सखोल ज्ञान, अध्यापनाची आवड व विद्यार्थी-प्रेम यांमुळे ते विद्यार्थी वर्गामध्ये अतिशय प्रिय झाले. संस्कृत हा त्यांचा आवडता विषय असल्यामुळे त्यांनी संस्कृत व्याकरणावर दोन बहुमोल ग्रंथ लिहिले. त्यामुळे संस्कृतचे थोर अभ्यासक म्हणून त्यांची सर्वत्र ख्याती झाली. त्यांनी संस्कृत भाषेत  रचलेली विविध देवतांच्या  प्रार्थनेची स्तोत्रे आणि संकीर्तने ‘रंगहृदयम्’ नावाने प्रकाशित झाली आहेत.

पांडुरंगाचा पिंड अध्यात्माचा होता. अध्यात्माची प्रगती करायची असेल तर एकांतवास हवा. म्हणून ते योग्य अशा जागेचा शोध घेऊ लागले. सुदैवाने त्यांना नर्मदा नदीच्या तीरावरील एका घनदाट जंगलातील नारेश्वर या लहानशा गावाचा शोध लागला.

४ डिसेंबर १९२५ रोजी, अंधाऱ्या रात्री, बोचऱ्या थंडीत नारेश्वर येथील एका लहानशा झोपडीत ते राहावयास आले. नारेश्वर हे गाव आजूबाजूच्या सात गावांच्या स्मशानभूमींनी वेढलेले घनदाट जंगलातील गाव आहे. या जंगलात विषारी साप, विंचू व श्वापदे यांचे वास्तव्य आहे. नारेश्वर येथे येण्यापूर्वी पांडुरंग यांनी अनेक संतांची भेट घेतली व त्या संतांनी सांगितलेली शिकवण नारेश्वर येथील वास्तव्यात आणण्याचा प्रयत्न केला.

पांडुरंगशास्त्री भल्या पहाटे, सूर्योदयापूर्वी उठत. नर्मदेच्या पाण्यात स्नान करीत. त्यांच्या दैनंदिन जीवनात ध्यान, वाचन, सूर्योपासना या गोष्टी प्रामुख्याने चालत. हळूहळू आजूबाजूचे लोक त्यांचे शुद्ध आचरण व भक्तीमुळे त्यांच्या आश्रमाकडे येऊ लागले. लोक त्यांना ‘रंगावधूत महाराज’ व ‘पूज्य बापजी’ या नावाने संबोधू लागले. प.पू.वासुदेवानंद स्वामींच्या सूचनेनुसार पूज्य बापजींनी ‘श्रीगुरुलीलामृत’ हा ग्रंथ लिहिला.यामध्ये श्रीगुरुचरित्र, (सरस्वती गंगाधर) श्रीगुरुमूर्तिचरित्र, (गांडामहाराज) यांचा समावेश आहे. हा ग्रंथ ज्ञान, कर्म व उपासनाकांड या तीन भागांत आहे. महाराजांनी मराठीत श्रीवासुदेवसप्तशती ही ७०० श्लोकांची पोथी लिहिली आहे महाराजांनी अनेक गुजराती भजने प्रासादिक भाषेत लिहिली आहेत. हजारो भक्त दररोज ती म्हणतात. अवधूती आनंद, अवधूती मस्ती, ग्राम अवधूत, ऊभो अवधूत, बेठो अवधूत त्याचप्रमाणे हिंदी अवधूती मौज हे भजनांचे पुस्तक प्रसिद्ध आहे. दत्तनामसंकीर्तन, श्रीदत्तपंचपदी, उष:प्रार्थना; या छोटया पुस्तिका नित्य उपासनेसाठी आहेत. उपनिषदोनीवातो, पत्रगीता, संगीतगीता, आत्मचिंतन, दत्तउपासना, अबुध अवधूत, नित्यस्तवन, अष्टगरबी, डाकोरमाहात्म्य, हालरडा वगैरे पुस्तके प्रसिद्ध आहेत.

त्यानंतर त्यांनी ‘दत्तबावनी’ या ग्रंथाचेही लिखाण केले. ‘दत्तबावनी’ हा बावन्न श्लोकी ग्रंथ असून आजूबाजूच्या कुटुंबांतील लोक याचे अत्यंत भक्तिभावाने गायन करतात. नारेश्वर येथील वास्तव्यात बापजी नीमवृक्षाखाली बसून भक्तांबरोबर आध्यात्मिक, धार्मिक व अन्य गोष्टींबाबत चर्चा करीत. नीमवृक्षाची पाने कडू असतात; परंतु परमपूज्य बापजी यांच्या वास्तव्याने व सहवासाने या नीमवृक्षाची पाने गोड झालेली आहेत.

रंगावधूत महाराजांनी नारेश्वर येथे आपल्या आईचे एक भव्य स्मारक उभारले. ते बांधल्यानंतर त्यांनी हरिद्वारास प्रयाण केले. त्यानंतर ते कधीही नारेश्वराला परतले नाहीत. आपल्या जीवनाच्या शेवटच्या क्षणी रंगावधूत महाराजांनी  तीन वेळा ॐ (ओम्) चा उच्चार केला व विक्रम संवत २०२५ च्या कार्तिक अमावास्येच्या दिवशी इहलोकीचा निरोप घेतला. २१ नोव्हेंबर १९६८ च्या मध्यरात्री त्या देहास नारेश्वर येथे मंत्राग्नी देण्यात आला. योगायोगाने हाच दिवस त्यांचा जन्मदिवस होता.

प्रा. नीलकंठ पालेकर    / आर्या जोशी  

वाळामे, पांडुरंग विठ्ठलपंत