Skip to main content
x

वालावलकर, पुरुषोत्तम माधव

            पुरुषोत्तम वालावलकरांचा जन्म सावंतवाडी येथे माधव व पार्वती या दांपत्यांच्या पोटी झाला. वडिल माधवराव हे गायक नट होते व ‘गंधर्व नाटक मंडळी’मध्ये बालगंधर्वांचे नायक म्हणून त्यांनी कारकीर्द गाजवली होती.

            पुरुषोत्तम वालावलकर यांचे बालपण हुबळी, धारवाड आणि मुख्यत: बेळगावात गेले. त्यांचे हार्मोनिअमचे शिक्षण विठ्ठलराव कोरगावकर, हणमंतराव वाळवेकर,  गोविंदराव टेंबे यांच्याकडे झाले. हार्मोनिअम वादनामधील या तीन गुरुंबरोबरीनेच ‘बालगंधर्व’ यांच्याविषयी त्यांना नितांत श्रद्धा होती. वालावलकरांनी बालगंधर्व, शिवरामबुवा वझे, कागलकरबुवा यांच्या सहवासात गायकीचे संस्कार घेतले.

            बडे गुलाम अली खाँ, भीमसेन जोशी, किशोरी आमोणकर, मल्लिकार्जुन मन्सूर, जितेंद्र अभिषेकी, गंगूबाई हनगल, शोभा गुर्टू, गिरिजादेवी, अजय चक्रवर्ती, रशीदखाँ, सी.आर. व्यास इ. दिग्गज कलावंतांना त्यांनी हार्मोनिअमची साथ केली. मैफलीत बसल्यावर मुख्य गायकाची स्वरांची गरज ओळखून ते ती साथीतून पुरवत असल्याने त्यांची साथ ती मैफल एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवत असे.

            त्यांच्या शिष्यांपैकी हार्मोनिअम आणि ऑर्गनवादक संजय गोगटे हे आजचे प्रथितयश संगतकार आहेत. हार्मोनिअम वादनातील प्रदीर्घ योगदानाबद्दल पं. वालावलकरांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. संगीत रिसर्च अकॅडमी, कोलकाता (२००५), ‘लीलाताई जळगावकर संवादिनी वादन’ पुरस्कार, ‘बालगंधर्व’ पुरस्कार (२००७), ‘गांधर्व महाविद्यालय संगतकार’ पुरस्कार (२००६) प्राप्त झाले होते. मुंबई येथे त्यांचे निधन झाले.

धनश्री खरवंडीकर

वालावलकर, पुरुषोत्तम माधव