Skip to main content
x

वालकर, शंकर शंखपान

     शंकर शंखपान वालकर यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील केडगाव येथे झाला. वालकर कुटुंब हे मूळचे बेळगाव जिल्ह्यातील निपाणी येथील होत. १५ जून १९६९ रोजी शंकर वालकर हे भूसेनेत कॅप्टन म्हणून भरती झाले. मद्रास रेजिमेंटमध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली.

     १६ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात भारताच्या पश्चिम भागाच्या संरक्षणाची जबाबदारी वालकर यांच्या रेजिमेंटवर सोपविण्यात आली होती. वालकर व त्यांची बटालियन हिंगोरी भागात पोहोचली. तिथून पुढचे ४२ मैलांचे अंतर कापतानाच  शत्रूच्या जोरदार गोळीबाराचे त्यांना सामोरे जावे लागले. आपल्या प्राणाची पर्वा न करता वालकरांनी प्रत्येक कंपनीजवळ जाऊन स्वसंरक्षणासाठी गोळीबाराचा आदेश दिला. वालकर आपले कर्तव्य बजावत असताना पाकिस्तानी सैनिकांकडून झालेल्या हल्ल्यात ते दोन वेळा जखमी झाले, तरीही त्यांनी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी पूर्ण केली.

     त्यानंतर शत्रूकडून रात्रभर गोळीबार सुरू होता. जखमी झालेले असतानाही त्यांनी रात्रभर शत्रूचा सामना केला. दुसर्‍या दिवशी सकाळ झाली तरीही वालकर मागे हटले नाहीत. अचूक पद्धतीने तोफगोळ्यांचा नेमका मारा करीत त्यांनी शत्रुसैन्य जायबंदी केले. या वेळी त्यांनी शत्रूच्या चार सैनिकांना ठार केले आणि शत्रूला माघार घेण्यासही भाग पाडले. मात्र शत्रूच्या गोळ्यांनी झालेल्या गंभीर जखमांनी त्यांना वीरमरण प्राप्त झाले. त्यांच्या या पराक्रमाबद्दल त्यांना मरणोत्तर ‘महावीरचक्रा’ने सन्मानित करण्यात आले.

- समीर कोडिलकर

वालकर, शंकर शंखपान