Skip to main content
x

वांगीकर, पद्माकर दत्तात्रेय

       पद्माकर दत्तात्रेय वांगीकर यांचा जन्म त्या वेळच्या निजाम संस्थांमधील बीड येथे झाला. चार भावंडांतील पद्माकर सर्वांत मोठे बंधू होत. वयाच्या दहाव्या वर्षीच वडिलांचे छत्र हरवल्यामुळे त्यांचे दिवस हालअपेष्टांतच गेले. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मामांच्या घरी राहून उर्दू माध्यमातून व नादारीने बीड येथे झाले. वांगीकर यांनी मॅट्रिकची परीक्षा १९४८-१९४९मध्ये उत्तीर्ण केली. ते मॅट्रिकला असताना त्यांच्या पाठीवर नारळाएवढे आवाळू झाले होते. तशाच स्थितीत त्यांनी परीक्षा दिल्यानंतर त्यांच्या आईने उपचारासाठी त्यांना हैदराबादला नेले. उपचार सुरू असतानाच, ते दुसर्‍या वर्गात परीक्षा उत्तीर्ण झाल्याची बातमी त्यांना कळली. हैदराबादला राहणारे त्यांच्या वडिलांचे मामेभाऊ वीटकर यांनी वांगीकरांनी आपल्याकडे राहूनच पुढचे शिक्षण घ्यावे, असे सांगून पुढील शिक्षणाविषयीची त्यांची चिंता दूर केली. वांगीकर सहा वर्षे त्यांच्याकडे राहिले. त्यांनी एम.एस्सी. पदवी १९५५मध्ये प्राप्त केली व १९५५मध्येच कृषी खात्यामध्ये त्यांची संशोधन साहाय्यक म्हणून परभणी येथील कापूस संशोधन केंद्रावर नियुक्ती झाली. पुढे १९५६मध्ये हैदराबाद संस्थानाचे विभाजन होऊन राज्य पुनर्रचना झाली. त्या वेळी त्यांची नोकरी मुंबई इलाख्यात वर्ग करण्यात आली. दरम्यानच्या काळात ३१ मे १९५९ रोजी त्यांचा विवाह झाला. त्यांची जुलै १९६०मध्ये परभणीहून नागपूर कृषी महाविद्यालय येथे वनस्पतिरोगशास्त्राचे प्राध्यापक म्हणून बदली झाली व त्यानंतर १९६२मध्ये त्यांची बदली अकोला येथील कृषी महाविद्यालयात झाली. एप्रिल १९६६मध्ये त्यांना प्राध्यापकाच्या कामाबरोबरच वसतिगृह अधीक्षक म्हणून विनामानधन अतिरिक्त पदभार स्वीकारावा लागला. त्यांनी २२ वर्षे विनामानधन वसतिगृह अधीक्षक व वरिष्ठ वसतिगृह अधीक्षक म्हणून काम केले.

       अकोला येथील विद्यार्थ्यांनी १९६८मध्ये कृषी विद्यापीठ निर्मितीसाठी आंदोलने केली. त्या वेळी वांगीकर यांनी अपार परिश्रम करून विद्यार्थ्यांना सांभाळून घेत शासन व विद्यार्थ्यांमध्ये कोणतीही कटुता येऊ दिली नाही. कारागृहातील विद्यार्थ्यांना भोजन पोहोचवणे, त्यांना जामीन राहणे ही कामेही वांगीकर यांनी सुरळीत पार पाडली. वेळप्रसंगी शासकीय अधिकार्‍यांना भेटून, त्यावर मार्ग काढून विद्यार्थ्यांची कारागृहातून सुटका केली. या आंदोलनाच्या फलश्रुतीनिमित्त अकोला येथे डॉ.पं.दे.कृ.वि. २० ऑक्टोबर १९६९मध्ये स्थापन झाले. त्यांच्या या कार्याबद्दल शासनाने त्यांना एक प्रशस्तिपत्र दिले. विद्यार्थ्यांचे आंदोलन सांभाळण्यामध्ये त्यांना त्या वेळचे संचालक, विद्यार्थी कल्याण, अ‍ॅड. अत्रे व डॉ. गुहे यांचे अनमोल साहाय्य प्राप्त झाले.

       वांगीकर यांनी विद्यापीठामध्ये प्राध्यापक, रोगशास्त्र विभागप्रमुख व वेगवेगळ्या शाखांचे अधिष्ठातापदही भूषवले आहे. त्यांनी ७२ शोधनिबंध लिहिले आहेत व तसेच २७ विद्यार्थ्यांना एम.एस्सी. (वनस्पतिरोगशास्त्र) व तीन विद्यार्थ्यांना वनस्पतिरोगशास्त्राच्या पीएच.डी.साठी मार्गदर्शन केलेे. विद्यापीठाच्या सर्व प्रशासकीय कामांमध्ये वांगीकर यांचा ठसा उमटलेला आहे. त्यांनी विद्यापीठाच्या शाखांच्या प्रवेश प्रक्रियेचे अध्यक्ष, विद्यापीठाच्या विद्यार्थी निवडणुकांचे अध्यक्ष, सामायिक परीक्षा व उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करण्याच्या केंद्राचे प्रभारी अध्यक्ष म्हणूनही काम केलेले आहे. ते विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचे अध्यक्ष होते. सेवानिवृत्तीनंतरही वांगीकर यांनी मानद अध्यक्ष म्हणून कृषी शाखेच्या ग्राहक पंचायतीचे ३ वर्षे काम केले व त्यानंतर विदर्भ विभागाच्या कृषी शाखेचे अध्यक्षपदही भूषवले. वांगीकर यांना १९९७-१९९८मध्ये उत्कृष्ट संशोधनाबद्दल डॉ. के.जी. जोशी संशोधन पुरस्कार मिळाला आहे. सर्व शाखीय ब्राह्मण मंडळाचे सचिवपद त्यांनी भूषवले. वांगीकरांच्या विद्यार्थ्यांनी भारतामधील नवीन दोन बुरशींना त्यांची नावे देऊन (ट्रंकटेल्ला वांगीकराय, पुक्सीनीया वांगीकराय) वांगीकरांना गौरवले आहे.

       - डॉ. चंद्रकांत श्यामराव संगीतराव

वांगीकर, पद्माकर दत्तात्रेय