वेलणकर, हरी दामोदर
हरी दामोदर वेलणकर यांचा जन्म कोकणातील तारळ येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण कोकणात देवरुख येथे झाले. उपजीविकेसाठी त्यांनी दुकान काढले, पण ते चालले नाही. घरच्या खडतर आर्थिक स्थितीमुळे वैद्यकीय शिक्षणाचा विचार त्यांनी सोडून दिला. त्यानंतर मुंबईला येऊन विल्सन महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला. गोकुळदास तेजपाल मोफत वसतिगृहात ते राहत. त्यांनी अभ्यासासाठी संस्कृत हा मुख्य विषय घेतला. प्रगती आणि यश यांनी हरी वेलणकरांची सदैव साथसंगत केली. बी.ए.ला प्रथम येऊन त्यांनी भाऊ दाजी पारितोषिक मिळवले व ते महाविद्यालयाचे फेलो झाले. एम.ए. झाल्यावर लगेचच त्यांची नेमणूक विल्सन महाविद्यालयातच संस्कृत विभाग प्रमुख म्हणून झाली. अननुभवी आणि तरुण व्यक्तीला मोठ्या विश्वासाने सुस्थिर अशा संस्कृत विभागाचे प्रमुख नेमणे, ही महाविद्यालयाच्या दृष्टीने धाडसाची बाब होती, पण वेलणकर यांनी हा विश्वास १९१४ ते १९५२ एवढा काळ काम करून सार्थ ठरवला. त्यांच्या या दीर्घ व सलग साहचर्याचा महाविद्यालयाला खूप फायदा झाला. वेलणकर यांच्या कामाची पद्धत अतिशय सूत्रबद्ध व प्रेरणादायी होती. संस्कृतच्या प्रत्येक अध्ययनशाखेचे त्यांनी तितक्याच उत्साहाने अध्ययन-अध्यापन केले. संस्कृत, प्राकृत, वेद, व्याकरण आणि योग या विविध शाखांमधील विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. त्यामुळे विद्यापीठातील परीक्षांमध्ये त्यांचे विद्यार्थी उच्च गुण मिळवून पारितोषिक विजेते ठरले.
विल्सन महाविद्यालयातून निवृत्त झाल्यानंतर भारतीय विद्याभवनाच्या पदव्युत्तर विभागाचे ते सहसंचालक झाले. त्यानंतर त्यांचे संशोधन अडथळ्याशिवाय होत होते. मुंबई विद्यापीठाने १९६२ मध्ये संस्कृत विभाग स्थापन केला आणि प्राध्यापक वेलणकरांना त्याचे प्रमुखपद - डॉ. आर.जी. भांडारकर चेअर - बहाल केले. वेलणकर यांच्या संस्कृत प्रेमाचा, अध्ययनाचा, अध्यापनाचा हा सन्मान आहे. प्रा. वेलणकरांनी वेद, अभिजात संस्कृत, छंदशास्त्र, काव्यशास्त्र, प्राकृत, हस्तलिखितशास्त्र या शाखांमध्ये मोलाची भर घातली. त्यांचे अनेक भाषांवर प्रभुत्व होते, हे त्यांच्या लिखाणावरून दिसून येते. जसे अलंकार, ज्योतिष, मीमांसा, वेद, व्याकरण आणि योग इत्यादी. अध्यापन आणि पीएच.डी. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन यांद्वारे त्यांनी पुढील पिढीला प्रेरणा दिली. निरनिराळ्या शाखांद्वारे स्वत: काम करून विद्यार्थ्यांना संशोधनाची मूलतत्त्वे त्यांनी समजावून दिली. स्वत:जवळचे उत्कृष्ट ते त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना दिले आणि त्यांच्याकडून कसलीच अपेक्षा ठेवली नाही.
आपल्या कारकिर्दीची सुरुवात त्यांनी रॉयल एशियाटिक सोसायटी, मुंबईमधील हस्तलिखितांची सूची करून केली. अचूकता व सर्वसमावेशकता हे या सूचीचे वैशिष्ट्य होय. मुंबई विद्यापीठाच्या ग्रंथालयातील इच्छाराम सूर्यराम देसाई संकलनाचीसुद्धा त्यांनी सूची तयार केली. स्वत: जमवलेली सुमारे दोन हजार हस्तलिखिते आपले गुरू डॉ. भडकमकर यांच्या स्मरणार्थ मुंबई विद्यापीठाच्या ग्रंथालयाला दिली.
निरनिराळ्या विद्यापीठांनी त्यांना त्यांच्या अभ्याससमित्यांवर निमंत्रित केले होते. ऑल इंडिया ओरिएन्टल कॉन्फरन्समध्ये ते अनेकदा वैदिक व प्राकृत विभागाध्यक्ष झाले होते. १९६२मध्ये वेलणकर यांना राष्ट्रपतींनी ‘संस्कृतपंडित’ म्हणून गौरवले.
१) १९२५ ते १९३० - त्यांनी विविध ठिकाणांहून संहितेचे संशोधन केले व त्यांची सूची तयार केली. (खंड- १ ते ४). २) १९४४- जिनरत्नकोश- जैन ग्रंथांची वर्णनात्मक सूची तयार केली. ३) १९४९- जयदामन या ग्रंथात संस्कृत छंदांचा उद्गम आणि विकास यासंबंधीचा अभ्यास. ४) १९५३- ऋग्वेदातील भक्तिमार्ग- हा त्यांचा महत्त्वाचा ग्रंथ आहे. ५) १९५६- महाभारतातील सौप्तिक पर्वाचे संपादन त्यांनी केले. ६) त्यांच्या कालिदासाच्या विक्रमोर्वशीय नाटकाची चिकित्सक आवृत्ती साहित्य अकादमीने १९६१ साली प्रसिद्ध केली आहे. ७) १९६१- ‘छांदानुशासान’ या हेमचंद्रांच्या ग्रंथाचे संपादन केले. या ग्रंथात प्राकृत व अपभ्रंश छंदांचा विचार मांडलेला आहे. ८) ‘रत्नमंजुषा’ या छंदशास्त्रावरही त्यांनी भाष्य केले. ९) ऋग्वेदातील उपमा यांवरही त्यांनी लिखाण केले. ‘ऋग्वेद’ हा त्यांचा परमप्रिय विषय. ‘ऋग्वेदातील इंद्र व अग्निसूक्ते टीपांसह त्यांनी इंग्रजीत भाषांतरीत केली. ऋग्वेदातील सातव्या मंडलाचे इंग्रजीत भाषांतर, टीपा, त्याचे उत्कृष्ट अभ्यासपूर्ण विवेचन प्रस्तावनेद्वारे मांडून त्यांनी विद्यार्थ्यांची व अभ्यासकांची गरज भागवली. १०) याशिवाय ‘ऋग्वेदातील जादूगार’, ‘ऋग्वेदातील ऋत व सत्य’, ‘ऋग्वेदातील निर्मितिसूक्ते’, ‘दिवोदास अतिथिग्व आणि इतर अतिथिग्व’, ‘सप्तवधी आणि वध्रीमति यांची कथा’ असे त्यांचे काही निवडक लेख अभ्यासपूर्ण आहेत.
२. संक्षिप्त मराठी वाङ्मयकोश, संपादक- गणोरकर, टाकळकर, डहाके, दडकर, भटकळ, जी.आर. भटकळ फाउण्डेशन, मुंबई, २००४.