Skip to main content
x

वेलणकर, श्रीराम भिकाजी

श्रीराम भिकाजी

       दादांचे वडील शिक्षक होते. दादांचे मातेचे छत्र त्यांच्या वयाच्या आठव्या वर्षीच काळाने हिरावून घेतले. राजापूर हायस्कूल, रत्नागिरीतून १९३१ ला मॅट्रिक झाल्यावर, मुंबईच्या विल्सन महाविद्यालयामधून ते बी.ए (संस्कृत) पहिल्या वर्गात उत्तीर्ण  झाले आणि दक्षिणा फेलो म्हणून त्यांची नियुक्ती झाली. १९३७ मध्ये ते प्रथम क्रमांकाने एम.ए. झाले आणि त्यांनी  झाला वेदांत प्राईझ, भगवानदास शिष्यवृत्ती, तसेच सर लॉरेन्स जेन्किन्स शिष्यवृत्ती मिळविली. १९४० मध्ये दादा एलएल. बी. परीक्षा उत्तीर्ण झाले. स्पर्धा परीक्षेस बसून उत्तीर्ण होताच ते डाक-तार खात्यात अधिकारी नियुक्त झाले. त्याचवर्षी सुधा जोशी यांच्याशी त्यांचा विवाह झाला. १९७७ पर्यंत त्यांनी दादांची साथ दिली. त्या शास्त्रोक्त गायिकाही होत्या. शालेय जीवनात रत्नागिरीला असताना दादा स्वातंत्र्यवीर सावरकरांकडे जात असत. ते सावरकर भक्त होते. एम.ए. पर्यंतच्या शिक्षणात त्यांनी पहिला वर्ग कधीच सोडला नाही. फिरतीच्या नोकरीत देशातल्या किमान ३०० जिल्ह्यांच्या ठिकाणी ते गेले. त्यांच्या प्रचंड क्रियाशीलतेचे व सातत्याचे हे निदर्शकच आहे. १५ ऑगस्ट १९७२ पासून भारतभर लागू झालेल्या टपाल खात्याच्या पिनकोड योजनेचे वेलणकर हे जनक आहेत. टपाल विभागासाठी अनेक नियम त्यांनी बनवले ते ‘वेलणकर फॉर्म्युला’ या नावाने ओळखले जातात. १९७३ मध्ये दळणवळण खात्याचे अतिरिक्त सचिव (पोस्ट खात्याचे प्रमुख) या नात्याने ते निवृत्त झाले.

       १९२९ मध्ये विद्यार्थी दशेतच त्यांनी शाळेच्या त्रैमासिकात पहिली संस्कृत कविता लिहिली. तिथूनच दिसामाजी काहीतरी ते लिहावे, ही समर्थ रामदासांची उक्ती अक्षरश: जीवनात उतरवली. ८० व्या वर्षांपर्यंत १०० हून अधिक ग्रंथ लिहिले. मराठी, संस्कृत, इंग्रजी, हिंदी, जर्मन, पाली, अर्धमागधी या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. विख्यात संगीतकार धुंडिराज पलुसकरांकडून ते व्हायोलिन शिकले.

       गीर्वाणवाणीच्या झालेल्या व होत असलेल्या उपेक्षेने त्यांना तीव्र दु:ख होई. संजीवनी देणाऱ्या संस्कृत भाषेविषयी अभिरुची निर्माण करण्यासाठी, तिला वाढीस लागून लोकप्रिय करण्यासाठी त्यांनी ‘देववाणी मंदिरम्’ संस्थेची स्थापना केली. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना हाताशी धरून दरवर्षी संस्कृत संगीत स्पर्धा व नाट्यनृत्यचे प्रयोग केले.

      नवनवीन उपक्रमांद्वारे संस्कृतला ‘सर्वजन सुलभ’ रूप देण्यासाठी ‘पथनाट्ये’ सादर केली. ‘देववाणी मंदिरम्’ संस्थेतर्फे ‘गीर्वाण सुधा’ (१९७९) हे अजूनपर्यंत नियमितपणे निघणारे एकमेव संस्कृत मासिक आहे. संस्कृत कवी या नात्याने दादांनी केलेल्या अपूर्व कामगिरीचे वर्णन करताना श्री. गो. आ. भट म्हणतात, ‘संस्कृत अक्षर व मात्रावृत्ता बरोबरच ओवी, अभंग, साकी, पोवाडा, लावणी आदी मराठी रचना प्रकारांचा उपयोग वेलणकरांनी केला आहे.  भारतीय संगीतातील ५२५ रागांची यादी व तालांची माहिती त्यांनी दिली आहे. संगीत नाटक, काव्य यावर त्यांचे प्रभुत्व होते. गद्य, पद्य, नाट्य, शास्त्रीय लेखन अशी अनेक प्रकारची अपूर्वाई त्यांच्या लेखनात आढळते.’ १९६४ मध्ये दिल्ली येथे झालेल्या प्रथम आंतरराष्ट्रीय संस्कृत संमेलनात दादांनी कालिदासाच्या शाकुंतल नाटकाचे दिग्दर्शन केले.

     अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचे उपाध्यक्ष, मुंबई मराठी साहित्य संघाचे उपाध्यक्ष, ‘देववाणी मंदिरम्’चे अध्यक्ष, ‘गीर्वाणसुधा’ या संस्कृत मासिकाचे प्रमुख संपादक, श्री. ना.दा.ठाकरसी विद्यापीठाच्या अभ्यासमंडळाचे सदस्य, अनेक शासकीय समित्यांचे मान्यवर कर्तबगार सदस्य, साहित्य अकादमीच्या संस्कृत सल्लागार समितीचे सदस्य, सुप्रसिद्ध संस्कृतप्रेमी उद्योगपती सोमैय्या श्रेष्ठींनी संस्कृत प्रचारार्थ स्थापन केलेल्या सुरभारती-सोमैय्या संस्कृत केंद्राच्या मार्गदर्शक मंडळाचे कार्याध्यक्ष, ठाण्याच्या इन्स्टिट्यूट फॉर ओरिएंटल स्टडीज या संस्थेचे मार्गदर्शक अध्यक्ष अशी ही विविध प्रकारची अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य पदे त्यांनी भूषविली आहेत.

     स्वभावत:च असलेली विद्याव्यासंगाची आवड, काव्यरचनेची हौस आणि संशोधनाची वृत्ती यामुळे दादांनी निवृत्तीनंतर ही सेवा करण्याचा सरकारी आग्रह मानला नाही. दादांनी शिवरायांच्या अनेक पैलूंचे दर्शन ‘छत्रपति श्री शिवराज:’ मध्ये, तर लोकमान्यांच्या अलौकिक व्यक्तिमत्वाचे दर्शन ‘श्री लोकमान्य स्मृति:’ मध्ये घडविले. राणी लक्ष्मीबाईंच्या जीवनावरील ‘स्वातंत्र्यलक्ष्मी:’ याचा ही उल्लेख करावा लागेल. आग्नेय आशियात ‘बालगीतं रामचरितं’ हा बालकलाकारांचा संगीत कार्यक्रम १९८२ मध्ये देववाणी मंदिरम् तर्फे सादर केला गेला. तो खूप यशस्वी झाला. कारण दादांनी आपल्या संस्कृत नाटकांना व नृत्यनाटकांना आधुनिक तंत्रमंत्राचीही जोड दिली.

      डॉ. हेडगेवार जन्मशताब्दीच्या वेळी डॉक्टरांच्या जीवनावर ‘केशव: संघनिर्माता नावाचे’ शाहिरी धर्तीचे काव्यही त्यांनी करून दिले होते. दादांच्या या मौलिक कार्याबद्दल सुरसिंगार परिषद, मुंबई यांनी १९८९ मध्ये ‘रसेश्‍वर पुरस्कार’ देऊन त्यांचा गौरव केला व अखिल भारतीय साहित्य संमेलनाने १९९२ मध्ये महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या हस्ते ‘भारत भाषा भूषण’ ही पदवी देऊन त्यांचा सन्मान केला, तत्पूर्वी १९७५ मध्ये दादांच्या ‘शिवाजी’ नाटकाबद्दल भारताच्या तत्कालीन उपराष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले. त्यांच्या एका पुस्तकाला भारताच्या राष्ट्रपतींनी प्रस्तावना लिहिली आहे.  दादांची ग्रंथसंपदा एकूण १०४ आहे.

     काव्ये - गुरुवर्धापनम्, विरहलहरी, संस्कृतभाषा, प्रीतिपथे, देववाणी मंदिरम् व इतर मिळून १७

     नाटके - कालिदासचरितम्, राज्ञी दुर्गावती, तत्त्वमसि, स्वातंत्र्यमणि, कल्याणकोप:, शासननीति:, श्री लोकमान्यस्मृति: व इतर मिळून २१

     संगीत - गीत गीर्वाणम्, निसर्गसंगीतम्, श्रीरामगानम्, व इतर एकूण ११, याशिवाय गीतनाट्यम् (ऑपेरा) दूरदर्शन मालिका, कथा ग्रंथ, नृत्यनाट्य, चर्चाग्रंथ, नृत्यगी, सुभाषिते, बालवाङ्मय व संपादित ग्रंथ. वरील विविध संस्कृत वाङ्मयासोबत मराठी पाच व इंग्रजी सहा पुस्तके असे त्यांचे मौलिक अनुवादित व संपादित ग्रंथकर्तृत्व आहे.

     - वि. ग. जोशी

संदर्भ
१.      गोडबोले  वीणा ; संपादिका , ‘श्रीराम दर्शनम्’  १९८९.
२.      गोडबोले  वीणा ; संपादिका ,श्रीराम यश: सुधा’,
         देववाणी मंदिरम्, प्रकाशन १९९६
वेलणकर, श्रीराम भिकाजी