Skip to main content
x

विष्णुपुरीकर, वासुदेव नारायण

          वासुदेव नारायण विष्णुपुरीकर यांनी मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातून पशुवैद्यकीय पदवी आणि सूक्ष्मजीवशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. ते १९७२मध्ये  देवनार कत्तलखान्यात पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाले. त्यांची १९८७मध्ये उपमहाव्यवस्थापक पदावर आणि १९९४मध्ये महाव्यवस्थापक पदावर निवड झाली. मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील निरनिराळ्या ठिकाणी कत्तलखान्याच्या खर्चाने (डुकराचे व इतर जनावरांचे) मांस पुरवले जात असे. डॉ. विष्णुपुरीकर यांनी ही पद्धत बंद केली व आर्थिक तोटा कमी केला. भारतातून शेळ्या व मेंढ्यांचे मटण आयात करणारे देश येथील शेळ्या-मेंढ्या यांच्या कत्तल करण्याच्या पद्धतीबाबत नाखूश होते. डॉ. विष्णुपुरीकर यांनी अ‍ॅपेडा संस्थेकडून दोन कोटी रुपयांचे कर्ज घेतले आणि या प्राण्यांच्या कत्तलीच्या विभागाचे आधुनिकीकरण केले. या बदलांमुळे संयुक्त अरब अमिरात व इतर देशांनी देवनार कत्तलखान्यातून शेळ्या-मेंढ्यांचे मटण अधिक प्रमाणात आयात करण्यास सुरुवात केली.

          मांस आयात करणाऱ्या देशांच्या अटींनुसार आरोग्यविषयक सर्व अटी पूर्ण करणारे मांस पुरवता यावे व कत्तलखान्याचे सर्व विभाग निर्जंतुक राहावेत यासाठी डॉ. विष्णुपुरीकर यांनी देवनार कत्तलखान्यातच एक गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळा सुरू केली. या प्रयोगशाळेत मांसाचे व पाण्याचे नमुने तपासले जाऊ लागले आणि निष्कर्षानुसार कार्यवाही केली जाऊ लागली. त्यामुळे सूक्ष्म जंतूंचे प्रमाण नियंत्रित करणे शक्य झाले. त्यांच्या कार्यकालात धोक्याची सूचना देणारी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. प्रथम क्रमांकाचे प्रशिक्षण देणार्‍या आणि अत्याधुनिक यंत्रणा असलेल्या मेंढ्यांच्या कत्तल विभागाला अधिकृत उत्कृष्टतेचा दर्जा प्राप्त झाला. मुंबईत २६ जुलै २००५ रोजी झालेल्या अतिवृष्टीत कत्तलखान्याच्या परिसरातील असंख्य शेळ्या-मेंढ्या  मृत्युमुखी पडल्या. त्यांची शरीरे तेथेच पडून सडल्यास सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण होईल हे लक्षात घेऊन डॉ. विष्णुपुरीकर यांनी पुढाकार घेऊन तातडीने स्वच्छता अभियान राबवले होते

- संपादित

विष्णुपुरीकर, वासुदेव नारायण