Skip to main content
x

वझे, गोपाळ हरी

       गोपाळ हरी वझे यांचा जन्म विजापूर येथे झाला आणि तेथील सरकारी विद्यालयात त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण झाले. नंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते मुंबईत आले. सेंट झेविअर्स महाविद्यालयात शिकून ते टाटा मूलभूत संशोधन संस्थेत ‘संशोधन साहाय्यक’ म्हणून रुजू झाले.

     दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी प्रलयंकारी अणुस्फोट हा भौतिक विज्ञानाच्या अभ्यासाचा आविष्कार होता व नियंत्रित अणुविघटनातून मानवासाठी एक नवीन ऊर्जास्रोत विकसित करणे शक्य आहे, अशी आशा निर्माण झाली.

     विज्ञानातील मूलतत्त्वांवर, विशेषत: अणुविज्ञानाबाबत संशोधन करणारे केंद्र भारतात असावे अशी जाणीव, भारताच्या अणु कार्यक्रमाचे जनक डॉ.भाभा यांना झाली. उद्योगपती जे.आर.डी. टाटा ह्यांच्या प्रोत्साहनाने व भरीव मदतीने टाटा मूलभूत संशोधन संस्था १९४५ साली निर्माण झाली. त्या सुमारास मुंबई विद्यापीठातून एम.एस्सी. पदवी प्राप्त केलेले गोपाळ हरी वझे यांची संशोधन साहाय्यक म्हणून निवड झाली. सुरुवातीला त्यांचे शोधकार्य ‘विश्वकिरणांचे स्वरूप’ ह्याबाबत होते. याच विषयातील वझे यांचा शोधनिबंध ‘फिजिक्स रिव्ह्यू’ या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये १९४८ साली प्रसिद्ध झाला. संस्थेने वझे यांना मावर्न (इंग्लंड) येथे ‘इलेक्ट्रॉनिक्स इंस्ट्रुमेंट’संबंधी प्रशिक्षणाची संधी १९५० - १९५१ मध्ये दिली. ‘अणुऊर्जा’ ह्या विषयाचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेऊन भारत सरकारने अस्तित्वात असलेल्या अणुऊर्जा विभागांतर्गत अणुऊर्जा आस्थापना, तुर्भे (डिपार्टमेन्ट ऑफ अ‍ॅटॉमिक एनर्जी)  हे केंद्र कार्यान्वित केले.

     स्वदेशी अणुभट्टी तयार करण्यासाठी या केंद्रात वेगवेगळी ‘हेल्थ फिजिक्स इंस्ट्रुमेंट’ विकसित करण्याचे काम संशोधन अधिकारी त्या वेळी वेगाने करीत होते. तिच्या नियंत्रणाची यंत्र योजना विकसित करून कार्यान्वित करण्यासाठी तज्ज्ञांचा एक चमू स्थापन केला होता. वझे त्यात एक सभासद होते. क्लाउड चेंबरसारखी उपकरणे बनवण्यासाठी त्यांच्याबरोबर गोपाळ शाहीयार, प्रा.श्रीकांतन होते. टाटा संस्थेमध्ये त्यांना डॉ.कोसंबी, डॉ.भाभा, डॉ.मसानी यांच्या ज्ञानाचा लाभ मिळाला होता.

     १९६३ साली वझे, इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे प्रमुख झाले. सायरस, प्लूटोनियम प्लांट, प्लूटोनियम प्रयोगशाळा, रेडिओलॉजिकल प्रयोगशाळा, तारापूर अणुवीज केंद्र, आयसोटोप वापरणारे संरक्षण दल, असे कितीतरी प्रकल्प एकापाठोपाठ एक उभे राहत होते. ‘फिल्म रेझिस्टन्स’, ‘टेंट्रालम कण्डेन्सर’, ‘सर्वो कंपोनंट्स’, ‘ट्रान्झिस्टर्स’ यांसारख्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, ‘गीगर मूलर ट्यूब’, विकिरण मापन करणारे उपयुक्त ‘रेडिएशन डिटेक्टर’ तयार करण्याचे तंत्रज्ञान वझे यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित केले गेले. ‘मेडिकल स्पेक्ट्रोेमीटर’, ‘स्कॅनर’, ‘रेनोग्रफी’, ‘न्यूक्लियर इन्स्ट्रुमेंट’ विकसित करून त्याचे तंत्रमंत्र उद्योगधंद्यात पोहोचवण्याचे कार्य त्यांनी केले. न्यूट्रॉन, थर्मल न्यूट्रॉन, तसेच गामा किरणांची तीव्रता यांचे अचूक मापन, त्याचे मानकीकरण ह्या बाबतीत संशोधन प्रणाली इलेक्ट्रॉनिक विभागात विकसित करण्यात आल्या.

     असे चौफेर संशोधन करणारे विविध तंत्रज्ञ तयार करून त्यांनी अणुविज्ञानात प्रगती केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक तंत्रज्ञांचे सुमारे १७० शोधनिबंध वेगवेगळ्या नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. वझे यांनी जिनिव्हा (१९५८), व्हिएन्ना (१९६०), बेलग्रेड (१९६१) आणि फ्रान्स (१९७०) या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये भाग घेतला होता.

     निवृत्त झाल्यावर त्यांनी चेंबूर येथील ‘विवेकानंद अभियांत्रिकी महाविद्यालया’त प्राचार्य म्हणून बरीच वर्षे अध्यापनाचे कार्य केले. अणुकेंद्रातील बहुमोल अनुभवाचा फायदा नवीन पिढीला देण्याची त्यांना संधी मिळाली. मध्य मुंबई मराठी विज्ञान संघाला त्यांनी सहा वर्षे अध्यक्ष म्हणून मार्गदर्शन केले.

     तारापूरच्या अणुविद्युत केंद्राचे काम ‘जनरल इलेक्ट्रिक' ह्या जगप्रसिद्ध कंपनीला दिलेले होते. त्या प्रसंगी डॉ.भाभा म्हणाले होते की, ही अणुभट्टी बांधत असताना भारतीय तंत्रज्ञांचा सहभाग असेल. त्यामुळे भविष्यकाळात अणुऊर्जा प्रकल्प उभे करताना परदेशी तंत्रज्ञांची मदत अगदी कमी भासेल. हे सर्व तंत्रज्ञ भारतातच उपलब्ध असतील. गोपाळ हरी वझे आणि तितक्याच तोलामोलाच्या तंत्रज्ञांनी खरोखरच अशी ‘भारतीय फौज’ उभी केली, ह्याची साक्ष आता उभे असलेले अणुप्रकल्प देत आहेत.

    वझे यांनी संरक्षण दलातील क्षेपणास्त्र यंत्रणेतील अचूकता अजमावण्यासाठी किरणोत्सारी समस्थानिक वापरून तयार केलेली मापनपद्धती विकसित केली. तसेच, रेल्वे रुळाची देखभाल व सुरक्षिततेचे सर्व मुद्दे चालत्या गाडीतून तपासण्याची मापनयंत्रे (जसे रुळाची समांतरता, वळणावरील रुळांची वक्रता व समांतरता, संतुलन, भक्कमपणा इत्यादी) विकसित केली. तसेच, प्रत्यक्ष बुलेट न वापरता, लेझर शलाका वापरून सरावासाठी उपयोगी रायफलसदृश यंत्रे विकसित केली.

स. वा. काळे

वझे, गोपाळ हरी