Skip to main content
x

वझे, शिवराम रामकृष्ण

शिवराम रामकृष्ण वझे यांचा जन्म नागेशी, गोवा येथे झाला. गायनाचार्य रामकृष्णबुवा वझे यांचे सुपुत्र व शिष्य असणाऱ्या शिवरामबुवांनी त्यांची गायकी सहीसही उचलली, विद्या जपली व वडिलांप्रमाणेच ‘कोठिवाले गवैये’ असा लौकिक संपादन केला. 
वयाच्या चौथ्या वर्षी नागेशीच्या मंदिरात त्यांनी ‘पेणं’ नावाचे वाद्य वाजवून श्रोत्यांकडून दाद आणि बक्षीस म्हणून सोन्याची ‘पवने’ (नाणी, मुद्रा) मिळवली. थोरल्या बुवांचा रियाज ऐकायचा, ते शिष्यांना देत असलेली तालीम ऐकायची आणि ते बाहेर गेले की भिंतीतील फडताळात (भिंतीतच असणारे खोल कपाट) बसून रियाज करायचा हा त्यांचा दिनक्रम होता. पुढे रंगमंचावर रामकृष्णबुवांची साथ तंबोर्‍यावर करीतच शिवरामबुवांनी गायनविद्या कमावली.
अत्यंत लहरी आणि मनस्वी असणारे शिवरामबुवा लहर असेल तर कितीतरी अनवट व जोडरागांचा खजिना रसिकांपुढे रिता करीत. थोरल्या बुवांपेक्षा त्यांचा रागविस्तार संथ व भरीव असे. बोलतानेपेक्षा सरगम करण्यावर त्यांचा भर होता. समेवर येण्याच्या त्यांच्या पद्धतीत इतकी विविधता, आकर्षकपणा असे, की त्यांच्या प्रत्येक समेला जाणकारांची उत्स्फूर्त दाद मिळे. त्यांना आकाशवाणीची सर्वोच्च श्रेणी होती. त्यांचे गायन धारवाड, पुणे आणि दिल्ली केंद्रांवर राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत प्रसारित होत असे.
‘बेळगाव भूषण’ ही बिरुदावली थोरले रामकृष्णबुवा वझे आणि शिवरामबुवा वझे या गायक पिता-पुत्रांनी भूषवली. बेळगावात आलेला कलाकार त्यांना भेटल्याशिवाय जात नसे. आदरयुक्त प्रेमाचा हा शिरस्ता थोरल्या बुवांच्या माघारीही कायम राहिला. शिवरामबुवांचे बेळगाव येथे अर्धांगवायूमुळे निधन झाले.

लीनता वझे

 

वझे, शिवराम रामकृष्ण