Skip to main content
x

वर्टी, अनंत वामन

     डॉ.अनंत वामन वर्टी यांचा जन्म जळगाव येथे झाला. त्यांचे वैद्यकीय विभागाचे शिक्षण झाले. ते एम.बी.बी.एस. परीक्षा उत्तीर्ण झाले. नाशिक नगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी या पदावर त्यांनी १९६२ ते १९७२ या दरम्याने सेवा केली. त्यांना लहानपणापासून वाचनाची आवड होती. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, चिं.वि.जोशी, ना.धों.ताम्हनकर यांच्या विनोदी साहित्याचे त्यांना आकर्षण होते. राम गणेश गडकरी यांच्या नाटकातील ‘गोकुळ’, ‘तळीराम’ या पात्रांच्या तोंडचे विनोदी संवाद त्यांना भावले होते. या सार्‍यांचा परिणाम त्यांच्यावर झाला. आपणही विनोदी लेखन करायचे याचे बीज त्यांच्या मनात रुजले.

     एकीकडे वैद्यकीय सेवा, तर त्याच वेळी सामाजिक  व साहित्यक्षेत्रात त्यांचे कार्य चालू राहिले. ज्ञान आणि मनोरंजन यांचा सुरेख मिलाप असणार्‍या ‘अमृत’ या मासिकाचे ते १९५३ ते १९५९ या काळात संपादक होते. नंतर त्यांनी स्वतः ‘श्रीयुत’ मासिक काढले व १९५९ ते १९६६ ह्या काळात ‘श्रीयुत’ मासिकाचे संपादन केले. नाशिक येथील सार्वजनिक वाचनालयात त्यांनी विविध पदांवर कार्य केले. नाशिक शहर सांस्कृतिक महामंडळाचे ते तीन वर्षं अध्यक्ष होते. नाशिक जिमखाना कार्यकारी मंडळावर ते ३० वर्षे कार्यरत होते. नाशिक एज्युकेशन सोसायटीमध्ये त्यांनी दहा वर्षे कार्यकारिणीवर काम केले. ते देशी व विदेशी खेळांत पारंगत होते. बुद्धिबळ या खेळात त्यांना विशेष रुची होती.

     ‘आपले शरीर’ (१९६८) आणि ‘वैद्यकातील महान शोध’ ही त्यांची पुस्तके त्यांच्या वैद्यकीय व्यवसायातील अनुभवांवर आधारित आहेत. तणावमुक्तीसाठी विनोद हे मानवाला मिळालेले वरदान आहे, याची जाण ठेवून अ.वा.वर्टी यांनी त्यांच्या साहित्यातून मराठी वाचकांना विपुल प्रमाणात उच्चभू्र प्रतीच्या विनोदाची मेजवानी दिली.  त्यांचे सर्वाधिक लिखाण झाले, ते विनोदी कथांसाठी. ‘कामसेना’, ‘अल्लामिया देनेवाला’, ‘अकरावा गडी’, ‘परिपाक’, ‘कागदी घोडे’, ‘कठपुतळ्या’, ‘दंतकथा’(१९४७), ‘नवा देव’, ‘पतिव्रता’, ‘पाऊस! पाऊस!’, ‘म.चा.मा टूवे’, ‘मुमताज’, ‘मंत्र्यांचा मंत्री’, ‘रुपेरी स्वप्न’, ‘सायरा बानू’ हे त्यांचे कथासंग्रह लोकप्रिय झाले. ‘अखेरचा आघात’ (१९५७) हा लघुकथांचा व ‘पिसारा’(१९४८) हा लघुनिबंधांचा संग्रहही वाचकांना भावला.

     वर्टींनी ‘राणीचा बाग’ हे नाटक लिहिले. ‘नाट्यनिकेतन’च्या मो.ग.रांगणेकरांनी ते रंगभूमीवर आणले. त्या नाटकाला पारितोषिक मिळाले. ह्या एकाच नाटकाने वर्टी हे नाटककार म्हणून ओळखले जाऊ लागले. ‘इडली डोसा’आणि ‘सुलूचा रामा’ (१९५८) या त्यांच्या एकांकिका संग्रहाचाही खूप नावलौकिक होता.

     विनोदावर सर्वांगांनी विचार करून विनोदी अंगाने मांडलेले त्यांचे ‘विनोद एक व्याख्यान’ हे पुस्तक आजही सर्व विनोदकारांना मार्गदर्शन करणारे आहे.

     त्यांनी त्यांच्या साहित्यातून विनोदाचा फार मोठा खजिना मराठी रसिकांसाठी ठेवलेला आहे.-

     -श्याम भुर्के 

संदर्भ
१.      वर्टी अ. वा.; ‘विनोद एक व्याख्यान’.
वर्टी, अनंत वामन