Skip to main content
x

वर्टी, सदानंद गोपाळ

      दानंद गोपाळ वर्टी यांचा जन्म मुंबई इलाक्यातील कारवार तालुक्यातल्या सदाशिव या गावी झाला. कारवारच्या सरकारी विद्यालयामधून ते मुंबई विद्यापीठाची मॅट्रिक परीक्षा कारवार तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाले. त्यावेळी त्यांना दाभोळकर शिष्यवृत्ती मिळाली होती. वर्टी तल्लख बुध्दीचे असून आपल्या वडिलांचे लाडके होते. वर्टींचे महाविद्यालयीन शिक्षण कर्नाटक महाविद्यालय आणि सेंट झेवियर महाविद्यालयामध्ये झाले. पदवी परीक्षेसाठी त्यांनी इंग्रजी विषय घेतला होता.

      शालेय व महाविद्यालयीन जीवनात अभ्यासाव्यतिरिक्त ते सर्व तऱ्हेचे खेळ खेळत, विशेषतः क्रिकेट हा त्यांचा फार प्रिय खेळ होता. गायनाची त्यांना आवड असून कोणत्याही प्रकारच्या गायनाचे त्यांना वावडे नव्हते. शालेय शिक्षण कन्नडमधून झाले. त्यांना कन्नड, कोकणी, मराठी, हिंदी, इंग्रजी भाषा उत्तम अवगत होत्या. मोडी लिपी सुध्दा त्यांना वाचता येत असे. आमदार म्हणून निवृत्त झाल्यावर सहकाऱ्यांच्या आग्रहास्तव त्यांनी एम. ए. ची पदवी घेतली.

      १९३९ च्या सुमारास प्राध्यापक वर्टी वसईत आले. प्रथम आर. पी. वाघ महाविद्यालयामध्ये शिक्षक म्हणून दाखल झाले. परंतु स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी भाग घेतला व त्याबद्दल कारावास भोगला. त्यांचे विचार शाळेत व्यवस्थापनाला पटले नाहीत म्हणून ती नोकरी त्यांना सोडावी लागली. शैक्षणिक क्षेत्र हे त्यांचे आवडते क्षेत्र होते.

      वसई हीच त्यांनी आपली कर्मभूमी मानली. वर्टीसर यांचे जीवन-कार्य म्हणजे वसई तालुक्याचा अर्ध्या शतकाचा इतिहास आहे. मित्रांच्या सहकार्याने वर्टी यांनी वसईत न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. यातूनच शिक्षकी पेशा सांभाळीत नि स्वतःचे शिक्षण पूर्ण करत ते अर्थशास्त्राचे प्राध्यापक बनले. परंतु या क्लिष्ट विषयाबरोबरच मराठी, कानडी, फ्रेंच आणि इंग्रजीवर त्यांचे प्रभुत्व होते. साहित्यावर त्यांचे कमालीचे प्रेम होते. १९५० ते १९७७ पर्यंत माटुंगा येथील पोदार व रुईया महाविद्यालयात त्यांनी अध्यापन केले. न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना त्यांनी विद्यार्थ्यांवर राष्ट्रीय वृत्तीचे संस्कार करावे आणि त्यातून समाजसेवेची आवड निर्माण झालेली नवी पिढी घडवावी या उदात्त उद्देशाने केली. प्राध्यापकी करीत असतानाही त्यांनी अखेरपर्यंत वसईत भाड्याच्या घरात साध्या व सदाचारी राहाणीनेच वास्तव्य केले.

      १९७० मध्ये विद्यावर्धिनी या उच्च शिक्षणाला वाहिलेल्या शिक्षण संस्थेची स्थापना भाऊसाहेब वर्तकांनी केली. ते स्वतः या संस्थेचे अध्यक्ष होते. त्यांनी वर्टी यांनी उपाध्यक्ष या नात्याने कार्य करण्यास संमती मिळवली. त्यांनी अखेरपर्यंत उपाध्यक्षपद भूषविले व विद्यावर्धिनीच्या महाविद्यालयाची ग्रंथालये समृध्द केली. शैक्षणिक बाबतीत मोलाचे मार्गदर्शन केले. तंत्रनिकेतन साठी तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापकांची निवड करणार्‍या निवडसमितीची स्थापना केली गेली. या समितीचे अध्यक्ष वर्टीच होते. त्यांनी पोतदार व रुईया महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना विद्यादानाबरोबर श्रमदानाची दीक्षा दिली. शैक्षणिक क्षेत्राबरोबरच त्यांचे राजकीय क्षेत्रातील कार्य उत्कृष्ट होते.

     - वि. ग. जोशी

संदर्भ
१. प्रा. स. गो. वर्टी स्मृति विशेषांक १९९४.
२. दै. नवशक्ति १७ जानेवारी १९९४ अग्रलेख.
३. दै. मुंबई सकाळ -१७ जानेवारी १९९४.
४. दै. लोकसत्ता १९ जानेवारी १९९४.
वर्टी, सदानंद गोपाळ