Skip to main content
x

वर्तक, चंद्रकांत रामचंद्र

     चंद्रकांत रामचंद्र वर्तक यांचे मूळ गाव हर्णेजवळील केळशी हे होय. त्यांचा जन्म महाडचा. प्राथमिक शिक्षणापासून एम.ए.पर्यंतचे त्यांचे शिक्षण मुंबईत झाले. महाविद्यालयीन शिक्षण रुईया महाविद्यालय, दादर येथे झाले. बी.ए. (ऑनर्स) १९५२, एम. ए. (मराठी-इंग्रजी) १९५५. पुणे विद्यापीठातून ‘मराठी साहित्यातील प्रवासवर्णने: प्रेरणा व स्वरूप’ या विषयावर पीएच.डी मिळवली.

     कारकुनी नोकरीपासून ते मराठीचे अधिव्याख्याते, रिडर आणि नंतर प्राध्यापक आणि एस.एन.डी.टी. विद्यापीठात मराठी विभागप्रमुख या पदावरून ते निवृत्त झाले. बेचाळीस वर्षांच्या कार्यकाळाचा हा प्रवास वर्धा, नाशिक आणि मुंबई येथे झाला.

     चंद्रकांत वर्तकांची पहिली कथा ‘एलिझा’ ही ‘सह्याद्री’ दिवाळी अंकात (१९५२) प्रसिद्ध झाली. ‘पारंब्या’ (१९६८), ‘फुलपंखी दिवस’ (१९६८), ‘अंकुर’ (१९७१), ‘मनमोर’ (१९७४), ‘धून’ (१९८७), ‘षड्ज’ (१९९८), ‘गंधार’ (२००९) हे कथासंग्रह प्रसिद्ध झाले. त्यांच्या कथांना ‘सत्यकथा’, ‘मौज’, ‘साधना’, ‘माणूस’, ‘विवेक’, ‘अंतर्नाद’ इत्यादी नियतकालिकांतून प्रसिद्धी मिळाली. ‘वळणावरचे  साकव’ (व्यक्तिचित्रे, १९९६) ‘भ्रमण चित्रे’ (प्रवासलेख, २००२) ‘लू यू चीन’ (प्रवासवर्णन, २००४) ‘देशादेशातून’ (प्रवासलेख, २००९) ‘मावंदे’ (प्रवासवर्णनांची समीक्षा, १९९३), ‘सफर बहुरंगी रसिकतेची’ (गाडगीळांच्या प्रवासलेखांचे संपादन आणि प्रदीर्घ प्रस्तावना, १९९९) ‘संशोधनाची लेखनशैली’, ‘साहित्याचे अध्यापन’ हे संशोधनपर लेखन आहे. ‘कॉन्व्हर्सेशन्स विथ स्टॅलिन’, ‘एक शर्थीची झुंज’ (१९६७-६८), ‘केटलिक वार्ताओ’ हा गुजरातीत अनुवादित कथासंग्रह प्रसिद्ध आहेत.

      त्यांच्या कथांतील वातावरण सहसा मध्यमवर्गीय, पात्रे मध्यमवयीन, भट-भिक्षुक, प्राध्यापक, गृहिणी, मागल्या पिढीतील मध्यमवयीन जोडपी, त्यांच्यातला विजोडपणा वा समरूपता, स्त्रियांची मानसिकता, त्यांच्या समस्या, नात्यांतील ताणे-बाणे-तिढे, साहित्यिक कलावंत यांचे श्रेष्ठपण वा त्यांचे मातीचे पाय, असे असते. आणि तरीही त्यांतील अनुभवांची विविधता थक्क करणारी आहे.

शिक्षणक्षेत्राशी संबंधित ‘द्वैत’, ‘ललिता’, ‘पुरुष प्रकृती’ या कथा घेतल्या तर त्या पूर्ण भिन्न अनुभव देतात. तणाव, भ्रष्टाचार याबरोबरीनेच माणूस-निसर्ग हे नाते कथेच्या निर्मितीप्रक्रियेचा शोध, बाप-मुलगी, आई-मुलगी, मावशी -भाचा यांमधील प्रगल्भ नाते; वासना, त्यांचा उपभोग, तो पुरेसा न मिळाल्याने आलेली अतृप्ती-कोंडमारा, तिचा प्रत्यक्ष मुलापुढे केलेला उच्चार; सहाणेसारखी झिजलेली आई, ऐन तारुण्यातील वैधव्यामुळे तिने दडपून टाकलेल्या वासना (‘कोरडा’), त्र्यंबकेश्वर- त्रिमुखी ज्योतिर्लिंगाला प्रदक्षिणा घालणारे जोडपे आयुष्यालाही पालाण घालून जाते; त्यातून नकळत अनेक सत्ये बाहेर येतात (‘प्रदक्षिणा’); अशा विविध विषयांवरील कथा वैचारिक प्रगल्भता दर्शवितात.

      श्रीधरने त्याचा कलावंताचा कंद ठेव लाभावी तसा व्रतस्थपणे जतन करणे आणि कृष्णाने वणिक वृत्ती दाखवून प्रकाशन व्यवसायात नाव, यश, पैसा कमावून आपल्यातल्या कलावंताला संपवून टाकणे; लोकांनी मात्र यालाच ‘यशस्वी’ समजणे! ‘लागेबांधे’ व ‘यशस्वी’ या एकाच बीजावरच्या दोन कथा वेगवेगळे रूप घेताना ज्या पद्धतीने त्या फुलतात; समाज, नातेसंबंध, मूल्यकल्पना यांवर संथपणे प्रकाशझोत टाकत जातात; ते विलक्षण आहे.

      सर्वसामान्यांच्या आयुष्यातले साधेसुधेच प्रसंग; पण वेगवेगळे कोन, दिशा, परिप्रेक्ष्य यांमुळे वर्तकांच्या हातात ते अनुभव येताच, त्यांच्या शैलीमुळे कथारूप घेताच तो अनुभव फुलून, डवरून येतो. ते संपूर्ण मानवी जीवनाचा वेध घेतात. शिल्पे जशी कोरीव व कातीव त्याप्रमाणे त्यांच्या कथांतील माणसांची मने रूपाला-आकराला येतात. उजेडालाही पालवी फुटते.

     प्रवास हा वर्तकांचा दुसरा श्वास आहे. ती अनिवार ओढ त्यांच्या लेखनातून सतत जाणवते. जवळपास  २० देशांमधून (अमेरिका, रशिया, मॉरिशस, चीन, वगैरे) त्यांनी प्रवास केला आहे. स्थळवर्णन करताना इतिहास-भूगोल यांबरोबरच रस्त्यांची आखणी, राजकीय-धार्मिक परिस्थिती, प्रथा-परंपरा हे सारे सांगत असतानाच ते प्रचलित लोककथा-पुराणकथा सांगतात. एकातून एक वेल्हाळपणे गप्पा निघतात, पण गायकाने समेवर यावे; तसे ते पुनः मूळ विषयाला भिडतात. समुद्राचे पांढरे-निळे पाणी अंजीरी-करडे-काळे डोंगर अशा रंग-रंगच्छटा ते चित्रकाराच्या कौशल्याने शब्दांनी रेखाटतात आणि ते-ते प्रत्येक स्थळ अनेकानेक पैलूंनी दृग्गोचर होते.

     ‘शाश्वताचा कृष्णरंग’मध्ये वर्तक द्वारकेत असतात; पण ते वेरावळ, प्रभास, पाटण येथेही फिरवून आणतात. कधी मॉरिशसच्या प्रसन्नतेतून अचानक सोमनाथाच्या उद्ध्वस्त, भकास वातावरणात प्रवेश करतात. निरागस बालकासारखे खेळकर व्यक्तिमत्त्व एकदम प्रौढ, परिपक्व बनते. ही किमया त्यांच्या शैलीची आणि त्या-त्या स्थळांशी समरसून जाण्याची आहे! यांत विविध श्रुतयोजना दिसतात. तसेच ते काही नवे अर्थवाही शब्दबंध, ‘कृष्णयोग’, ‘गर्भसूत्र’, ‘सोलीव गर्भ’, ‘डोंगराची वनाळलेली डोकी’ वापरतात.

‘लू यू चीन’मधील चीन वा ‘देशादेशांतून’मधील ‘व्हिएटनाम’, ‘कंबोडिया’, ‘इण्डोनेशिया’, ‘बाली’ अशा विविध देशांची वर्णने वाचताना साक्षात त्या स्थळी, त्यांच्यासमवेत आपण उभे आहोत; असा आभास ते वाचकाला घडवतात, हे त्यांच्या लेखणीचे सामर्थ्य! कधी त्यांचे प्रवासलेख कथारूपही धारण करतात.

     ‘वळणावरचे साकव’मध्ये आयुष्याच्या वळणावर  वेळोवेळी भेटलेले न.र.फाटक, कुसुमाग्रज, विजय तेंडुलकर, वसंत कानेटकर, माधव मनोहर, विद्याधर पुंडलिक असे गुरुजन, मित्र, सहकारी कधी दीपस्तंभ बनतात तर कधी आधारवड! आणि श्री. वर्तकांचे आयुष्य आपल्या सहवासाने सधन करून टाकतात. त्यात रंग भरतात. वर्तक त्यांचे हे ऋण अत्यंत कृतज्ञतेने मान्य करतात. त्या-त्या व्यक्तीबद्दलच्या गुणदोषांच्या छटाही ते सांगतात. परंतु त्यात कटुता वा खळबळ माजवावी असे होत नाही. त्याचबरोबर स्वतःच्या चुका, त्या-त्या माणसाला ओळखण्यात झालेली गफलत किंवा स्वतःला वाटणारा वृथा अभिमान, आपल्या मर्यादा हे सारे ते सहज व्यक्त करतात आणि मग त्या दिग्गजांबरोबरचे ऋणानुबंध ठळक होऊ लागतात.

लेखकाचे स्वच्छ, मोकळे, स्वीकारशील असे प्रांजल मन, साहित्याची सघन जाणीव, मैत्राकरता आसुसलेले मन, आपल्याच नात्यांचा घेतलेला शोध, घरची सर्व जबाबदारी लहानशा वयात खांद्यावर घेणारा कर्तव्यदक्ष, शिक्षणासाठी धडपडणारा, काही आकांक्षा उरीपोटी धरणारा तरुण, एक सजग गुणग्राहक वाचक आणि या सर्वांनी घडलेले श्रीमंत व्यक्तिमत्त्व!

     त्यांना प्रवासाबद्दल आवड आहेच, पण प्रवासवर्णनांबद्दलही प्रेम आहे. याची प्रचिती ‘मावंदे’मधून येते. ‘माझा प्रवास’, ‘क्षत्रींचे प्रवासवर्णन’, ‘न.चिं. केळकरांची बातमीपत्रे’, ‘धुक्यातून लाल तार्‍याकडे’, ‘अपूर्वाई’ इत्यादींवरील त्यांचे लेख म्हणजे सर्जनशील समीक्षेचा नमुना! वाचकाला मूळ कलाकृतीकडे वळवण्याचे सामर्थ्य त्यांच्या लेखनात आहे. प्रवासवर्णनाची तांत्रिक बैठक आणि संशोधनाची शिस्त प्रस्तावनेतून आणि प्रवासवर्णनांच्या पुस्तकांच्या शेवटी दिलेल्या सूचीमधून दिसते (१८५२पासून १९९०पर्यंत).

      त्यांचा प्रत्येक शब्द नेमका, कोरीव असतो. लेखन ही एक गांभीर्यपूर्वक स्वीकारलेली गोष्ट आहे, असे त्यांच्या लेखनावरून स्पष्ट जाणवते. मराठी विश्वकोश, मराठी वाङ्मयकोश, तसेच आकाशवाणीवर ‘ऐसी अक्षरे रसिके’मध्ये नाशिक जिल्ह्यातील साहित्यिकांचा परिचय करून देणार्‍या लेखमालेची संहिता, १९व्या शतकातील मराठीतील नियतकालिकातील साहित्यविचार अशा विविध स्तरांवर त्यांनी लेखन केले आहे.

      उत्कृष्ट पीएच.डी प्रबंधाबद्दल डॉ. वर्तकांना  पुणे विद्यापीठाचे ‘न.चिं.केळकर पारितोषिक’, आणि ‘डॉ. परांजपे पारितोषिक’ प्राप्त झाले आहे. तसेच त्यांना नाशिक महानगरपालिकेतर्फे ‘लोककल्याण’ पुरस्कार प्राप्त झाला आहे. ‘आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण- शिल्पकार चरित्रकोश’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील साहित्य खंडाचे सहसंपादक म्हणून त्यांनी कायभार सांभाळला.

     सर्वोत्कृष्ट मराठी कथा, खंड १३ (संपादक कोलारकर) आणि किर्लोस्कर उत्कृष्ट कथा, खंड ४ यांमध्ये त्यांच्या कथा समाविष्ट आहेत.

- प्रा. मीना गुर्जर

वर्तक, चंद्रकांत रामचंद्र