Skip to main content
x

यार्दी, मधुकर रामराव

           धुकर रामराव यार्दी यांचा जन्म कोकणातल्या सुपे नावाच्या छोट्या गावात झाला. काळ्या नदीवर वसलेले हे गाव धरणाखाली गेल्यामुळे आता अस्तित्वात नाही. त्यांच्या आईचे नाव जानकीबाई होते. वडील सरकारी नोकरीत होते. आठ मुलांचे त्यांचे मोठे कुटुंब होते.  मधुकरला उत्तमोत्तम शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आईवडिलांनी कंबर कसली. मधुकर शालेय शिक्षणासाठी कारवार व धुळ्यामध्ये मोठ्या भावांकडे राहिला.

नंतर यार्दींनी पुण्यात येऊन प्रथम फर्गसन व नंतर सर परशुरामभाऊ महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. गणित व संस्कृत हे त्यांचे आवडते विषय होते. बी.ए. व एम.ए ला त्यांना कुलपती पदकाचा (चँसलर मेडल) मान मिळाला. प्राध्यापक रा.ना.दांडेकर, डी.डी.कोसंबी व डी. डब्ल्यू. केरकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संस्कृत, गणित व प्राच्यविद्या यांचा अभ्यास केला. १९४० मध्ये भारतीय प्रशासकीय सेवा आयसीएस परीक्षेत सर्वप्रथम येण्याचा मान त्यांनी मिळविला. त्या वेळच्या मुंबई राज्यात जिल्हाधिकारी म्हणून त्यांची कारकीर्द फार गाजली. नंतर महाराष्ट्राचे गृह सचिव व वित्त सचिव म्हणून त्यांनी काम केले. १९६२ मध्ये त्यांची केंद्रीय अर्थ खात्यामध्ये नियुक्ती करण्यात आली. केंद्र सरकारच्या नियोजन विभागाचे सल्लागार आणि गृह खात्यात अतिरिक्त सचिव म्हणून त्यांनी काम केले. योजना व गृह खात्यामधील विविध समित्यांवरही त्यांनी काम केले. केंद्रीय वित्तसचिव ह्या पदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर १९७४ मध्ये ते निवृत्त झाले.

शासकीय सेवेत कार्यरत असताना सुद्धा यार्दी यांनी संस्कृतचा अभ्यास चालू ठेवला होता. नाशिकला जिल्हाधिकारी असताना करवीर पीठाचे शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी यांच्या मार्गदर्शनाखाली शांकरभाष्यातील ब्रह्मसूत्रांचा अभ्यास करण्याची संधी त्यांना मिळाली. पूर्वी प्रा.कोसंबी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संख्याशास्त्राचा अभ्यास केला होता. मार्क्सवादी कोसंबी आणि परंपरावादी डॉ.कुर्तकोटी या दोन टोकाच्या विद्वानांचा त्यांच्या जीवनावर प्रभाव पडला.

निवृत्तीनंतर यार्दी यांनी संस्कृतचा अभ्यास व लेखनकार्य आणि शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थांच्या कार्यामध्ये स्वत:ला वाहून घेतले. आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानाचे ते विश्वस्त होते. त्यांच्या प्रेरणेने आणि पुढाकाराने पुण्यामध्ये भारतीय विद्या भवनया संस्थेच्या केंद्राची स्थापना झाली. त्यांच्या अध्यक्षतेखाली दोन उत्तम दर्जाच्या शाळा आणि अनेक अभ्यासक्रम सुरू झाले. १९७९ मध्ये दि योगा ऑफ पातंजलीहा त्यांचा पहिला ग्रंथ भांडारकर प्राच्यविद्या संस्थेने प्रसिद्ध केला. महाभारत हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता. महाभारताच्या अनुष्टुभ छंदाचे वैशिष्ट्य लक्षात घेऊन, या श्लोकांना संख्याशास्त्राचे निकष लावून प्रत्येक पर्वाचा चिकित्सक अभ्यास केला. यापूर्वी त्यांनी संख्याशास्त्रावर आधारित शेक्सपियरला अभ्यासून क्रोनोलोजी ऑफ शेक्सपीयर्स प्लेजहा ग्रंथ तयार केला होता. त्याच पद्धतीने त्यांनी महाभारत अभ्यासून काही निष्कर्ष काढले. भगवद्गीता हा सुद्धा त्यांच्या संशोधनाचा प्रमुख विषय होता. भगवद्गीता - ए सिंथेसिसहे त्या संशोधनाचे फलस्वरूप. त्यांची पत्नी अनुसूया हिच्यासह त्यांनी रामकृष्ण मिशन व शारदा मठाच्या कार्यात रस घेतला होता.

- भारती कोतवाल

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].