Skip to main content
x

येवलेकर, सरला

     सरला येवलेकर या मूळच्या सोलापूरच्या. शालेय जीवनात असतानाच त्या नाटकातून, मेळ्यातून भूमिका करीत असत. ‘अशी वस्ती अशी माणसं’ या चित्तरंजन कोल्हटकर यांच्या नाटकाद्वारे त्या व्यावसायिक रंगभूमीवर आल्या. पिंजरा (१९७२) या चित्रपटातून त्यांची अभिनय कारकिर्द खर्‍या अर्थाने सुरू झाली. चित्रपटसृष्टीत त्यांनी निळू फुले, डॉ. श्रीराम लागू यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्यांसोबत भूमिका केल्या. डॉ. श्रीराम लागू यांच्याबरोबर ‘सुगंधी कट्टा’ या चित्रपटामध्ये त्यांनी केलेल्या भूमिकेचा खूप बोलबाला झाला आणि या भूमिकेसाठी त्यांना त्या वर्षीचा फिल्मफेअर पुरस्कारदेखील मिळाला होता. सरला येवलेकर यांनी काही गुजराती चित्रपटांतूनही भूमिका केल्या. ‘डियर भौजाई’ या गुजराती चित्रपटातील भूमिकेबद्दल त्यांना गुजरात सरकारनेदेखील पारितोषिक दिले होते. ‘पिंजरा’ या शांतारामबापूंच्या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना ‘रसरंग पुरस्कार’ लाभला होता. हिंदी चित्रपटातीलही त्यांच्या काही भूमिका स्मरणात आहेत. त्यांनी ‘डान्स-डान्स’, ‘कमांडो’, ‘मेहंदी रंग लाएगी’ इत्यादी हिंदी चित्रपटांत भूमिका केल्या. सरला यांच्या तीन भाषांतील चित्रपटांची संख्या ५०च्या आसपास आहे. काही मालिकांमधूनही त्यांनी काम केले आहे.

      ‘सुगंधी कट्टा’, ‘झाकोळ’, ‘बन्याबापू’, ‘पिंजरा’, ‘धाकटी मेहुणी’, ‘हर्‍या नार्‍या झिंदाबाद’, ‘जावयाची जात’ हे सरला येवलेकर यांनी भूमिका केलेले उल्लेखनीय चित्रपट होते. हल्ली सरला येवलेकर या येशू ख्रिस्ताच्या स्तुतिपर कवनांच्या ध्वनिमुद्रिकांची निर्मिती करण्यात व्यग्र आहेत. ख्रिस्ताचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या कामात त्या व्यस्त आहेत.

- जयंत राळेरासकर

येवलेकर, सरला