इंगोले, प्रतिमा पंजाबराव
डॉ.प्रतिमा पंजाबराव इंगोले यांचा जन्म एका शेतकरी कुळात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दादाराव हिंमतराव कुकडे आणि आईचे नाव विमलाबाई कुकडे. पित्याच्या छत्राला अगदी लहानपणीच मुकल्याने त्यांचे संगोपन त्यांच्या आईने आपल्या वडिलांच्या साहाय्याने केले. सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या दानापूर खेड्यात आणि नंतर अकोला येथे शालेय शिक्षण झाले. अमरावती येथे महाविद्यालयात बी.ए.ला शिकत असताना, त्यांचा विवाह अॅड.पंजाबराव इंगोले यांच्याशी झाला. शिक्षणाबद्दलच्या तळमळीमुळे विवाह झाल्यानंतरदेखील त्यांनी शिक्षण चालू ठेवले. एम.ए.नंतर पीएच.डी.साठी त्यांना त्यांचा ग्रामीण लोकगीते गोळा करण्याचा छंद उपयोगी पडला. ‘वर्हाडी लोकगीतांचा चिकीत्सक अभ्यास’ या विषयावर त्यांनी पीएच.डी.ही पदवी मिळवली.
त्यांनी आपल्या लालित्यपूर्ण शैलीदार लेखनातून विदर्भातील लोकसंस्कृतीचे, वर्हाडी भाषेचे दर्शन मराठी साहित्यात ठळकपणे घडवले. विनोदी, गंभीर, वैचारिक, बालांसाठी, शैक्षणिक असे विविधांगी लेखन त्यांनी केले. पूर्णपणे निखळ वऱ्हाडी भाषेत लेखन, हे त्यांचे वैशिष्ट्य. विविध विषयांवर वैचारिक लेखन आणि कथा, कविता, कादंबरी इत्यादी ललित लेखनाबरोबरच प्रतिमा इंगोले यांनी कथा-कथनाचेही खूप कार्यक्रम केले.
आजवर त्यांची ४१ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांपैकी वैदर्भी भाषेचा प्रभावी वापर केलेल्या ‘हजारी बेलपान’ (१९८४- कथा), ‘अकसिदीचे दाने’ (१९८६ - कथा), ‘बुढाई’ (कादंबरी - १९९९) ही त्यांची काही प्रसिद्ध आणि पुरस्कारप्राप्त पुस्तके आहेत.
त्यांनी विविध सामाजिक संस्थांमधून वेगवेगळ्या पदांवर काम केले आहे. त्यात साहित्य संस्था, महिला मंडळ, वाचनालये, कला अकादमी, वैदर्भीय लेखिका मंडळ, काही शासकीय संस्था यांचा समावेश आहे. सामाजिक, शैक्षणिक आणि वाङ्मयीन ह्या क्षेत्रांत चौफेर आणि भरीव कामगिरी करणार्या प्रतिमा इंगोले यांनी अनेक पुरस्कार मिळवले आहेत.
त्यांना प्राप्त झालेल्या ३६ पुरस्कारांपैकी यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार, महाराष्ट्र राज्य पुरस्कार, विदर्भभूषण पुरस्कार असे काही महत्त्वाचे पुरस्कार आहेत.
सामाजिक भान असलेल्या, ग्रामीण वैदर्भीय लोकजीवनाची फार जवळून ओळख असलेल्या प्रतिमा इंगोले यांनी मराठी वाङ्मयात -विशेष करून- वैदर्भीय संस्कृतीच्या संदर्भात मोलाची भर घातली आहे.