Skip to main content
x

जाधव, भरत

     रत जाधव यांचे बालपण मुंबईतील लालबाग भागात गिरणी कामगारांच्या वस्तीत गेले. शालेय शिक्षण येथेच झाल्यावर त्यांनी मंगेश दत्त यांच्या ओळखीने ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या कार्यक्रमात१९८५ पासून काम करण्यास सुरुवात केली. येथेच त्यांची केदार शिंदे, अंकुश चौधरी, संतोष पवार यांच्याशी ओळख झाली व त्याचे मैत्रीत रूपांतर झाल्यावर त्यांनी एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांमध्ये चांगले परीक्षक लाभतात असे कळल्यावर त्यांनी परळच्या महर्षी दयानंद महाविद्यालयात प्रवेश घेतला. तेथे त्यांनी देवेंद्र पेम यांची ‘प्लॅन्चेट’ ही एकांकिका केली. त्या एकांकिकेला सर्वोत्कृष्ट एकांकिकेचा पुरस्कार मिळाला.

     त्यानंतरच्या ‘ऑल द बेस्ट’ या एकांकिकेला आय.एन.टी. मध्ये पारितोषिक मिळाल्यावर मोहन वाघ यांनी ही एकांकिका नाटकरूपात व्यावसायिक रंगमंचावर आणली व भरत जाधव यांचा नाट्यप्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला. या एकांकिकेत भरत जाधव यांना मुक्याची भूमिका करण्याची संधी मिळाली. हे नाटक यशस्वी झाल्यानंतर त्यांनी केदार शिंदे लिखित व लता नार्वेकर दिग्दर्शित ‘आमच्यासारखे आम्ही’ नाटकात काम केले. ‘अधांतर’ नाटकातील भूमिकेसाठी त्यांना सर्वांत जास्त पारितोषिके मिळाली. ‘श्रीमंत दामोदर पंत’, ‘तू तू मी मी’ यांसारख्या नाटकातून उत्तम अभिनय करून आपल्या कामाचा ठसा उमटवण्यातही भरत जाधव यशस्वी झाले. पुढे गजेंद्र अहिरे यांच्या ‘जन्मसिद्ध’ नाटकात त्यांनी एका बी.सी. उमेदवाराची भूमिका साकारली. प्रदीप पटवर्धन यांच्याबरोबर त्यांनी ‘चल काहीतरीच काय’ हे नाटक केले, पण ते विशेष चालले नाही. त्यानंतरचे ‘पैसाच पैसा’ हे व्यावसायिक नाटकही फसले.

     भरत जाधव यांनी अल्फा टी.व्ही.वरील ‘प्रपंच’ या मालिकेतही नंदूची भूमिका साकारली. त्यानंतर त्यांनी केलेले ‘सही रे सही’ या नाटकाचे प्रयोग खूपच गाजले. या नाटकातील गलगलेची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली. १९९९ मध्ये ‘वास्तव : द रिअ‍ॅलिटी’, ‘प्राण जाये पर शान न जाये’ यासारख्या अभिनय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काही हिंदी चित्रपटांनंतर भरत यांनी आपला मोर्चा पूर्णपणे मराठीकडे वळवला आणि पुन्हा मागे वळून पाहिलेच नाही.

     भरत जाधव यांनी ‘खतरनाक’ (२०००), ‘बाप रे बाप’ (२००३), ‘नवऱ्याची कमाल बायकोची धमाल’ (२००४), ‘हाउस फूल’ (२००४), ‘खबरदार’ (२००५), ‘पछाडलेला’ (२००५), ‘नाना मामा’ (२००६), ‘माझा नवरा तुझी बायको’ (२००६), ‘नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे’ (२००६), ‘जत्रा’ (२००६), ‘चालू नवरा भोळी बायको’ (२००६), ‘मुक्काम पोस्ट लंडन’ (२००७), ‘गलगले निघाले’ (२००८), ‘मस्त चाललयं आमचं’ (२०११), यासारख्या विनोदी बाजाच्या भूमिकांसह ‘सरीवर सरी’तील (२००५) असफल प्रियकर, ‘बकुळा नामदेव घोटाळे’मधील (२००७) खलनायकी सरपंच, ‘शिक्षणाच्या आयचा घो’तील (२०१०) मुलाच्या सुरक्षित भविष्यासाठी धडपडणारा बाप (मधुकर राणे), ‘क्षणभर विश्रांती’मधील जगणं शिकवणारा अप्पा आणि ‘झिंग चिक झिंग’मधील जगण्याची जिद्द घेऊन लढणारा माउली या काही अत्यंत वेगळ्या आणि काळजाला हात घालणाऱ्या भूमिकाही भरत यांनी आपल्या अप्रतिम अभिनयाने जिवंत केल्या.

     भरत जाधव यांचा केदार शिंदे दिग्दर्शित ‘खो खो’ (२०१३) हा चित्रपट प्रदर्शित झाला. भरत जाधव एन्टरटेन्मेंट या त्यांच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून ते नव्या कलाकारांना प्रोत्साहन देण्याचेही काम करतात.

- आसावरी चिपळूणकर

जाधव, भरत