Skip to main content
x

जाधव, सिद्धार्थ रामचंद्र

         राठी चित्रपटांतून आणि मालिकांमधून अतिशय थोड्याच काळात विनोदी अभिनेता म्हणून नावारूपाला आलेला कलाकार-नट म्हणजे सिद्धार्थ जाधव.

      सिद्धार्थ रामचंद्र जाधव यांचा जन्म राजापूर तालुक्यातील केळवली या गावी झाला, पण त्यांचे बालपण मुंबईसारख्या महानगरात गेले. रामचंद्र आणि मंदाकिनी जाधव यांचा हा तिसऱ्या क्रमांकाचा मुलगा. नायगावच्या सरस्वती हायस्कूलमध्ये त्यांचे शालेय शिक्षण झाले. शालेय जीवनात हुशार विद्यार्थी म्हणून नावाजले गेलेल्या सिद्धार्थ जाधव यांनी मॅट्रिक झाल्यावर रुपारेल महाविद्यालयात प्रवेश घेतला. येथे शिकत असतानाच कला शाखेच्या दुसऱ्या वर्षाला असताना त्यांना जयवंत भालेकर यांच्या ओळखीने देवेंद्र पेम यांच्या ‘तुमचा मुलगा करतो काय’ या नाटकात काम करण्याची संधी मिळाली. या नाटकातील भूमिकेमुळे व त्या भूमिकेला दिलेल्या न्यायामुळे सिद्धार्थ जाधव यांच्याकडे अनेक चित्रपट आणि मालिकांमधून काम करण्यासाठी विचारणा झाली. या नाटकाचे त्यांनी ३५० प्रयोग केले. या नाटकादरम्यान त्यांची पॅडी (पंढरीनाथ) कांबळे या कलाकारासोबत ओळख झाली व त्याचे रूपांतर पुढे मैत्रीत झाले. त्यानंतर सिद्धार्थ जाधव यांनी ‘राम भरोसे’ या नाटकात काम केले. या नाटकाचे २५ प्रयोग झाले.

      महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘मी शाहरुख मांजरसुंभेकर’ या नाटकात सिद्धार्थ जाधव यांच्यातील कलाकाराची खरी कसोटी लागली व त्यांच्या अंगी असलेल्या अभिनयकौशल्यामुळे ते खऱ्या अर्थाने या कसोटीला उतरले आणि याच नाटकामुळे त्यांच्यातला कलाकार खऱ्या अर्थाने घडला. 

      सिद्धार्थ जाधव यांच्या अभिनयातील सहजता लक्षात आल्यावर केदार शिंदे यांनी आपल्या ‘लोच्या झाला रे’ या नाटकात त्यांना काम दिले. या नाटकामुळे सिद्धार्थ यांच्या कारकिर्दीला कलाटणी मिळाली आणि नंतर त्यांना अनेकानेक चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.

      ‘जत्रा’, ‘माझा नवरा तुझी बायको’, ‘अगं बाई अरेच्या’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’, ‘जबरदस्त’, ‘साडे माडे तीन’, ‘दे धक्का’, ‘उलाढाल’, ‘बापरे बाप अन् डोक्याला ताप’, ‘गलगले निघाले’, ‘सालीने केला घोटाळा’, ‘गाव तसं चांगलं’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘शिक्षणाच्या आयचा घो’, ‘हुप्पा हुय्या’, ‘लालबाग परळ’, ‘क्षणभर विश्रांती’, ‘इरादा पक्का’, ‘भैरू पैलवान की जय’, ‘फक्त लढ म्हणा’, ‘कुटुंब’, ‘खो खो’ अशा चित्रपटांतून त्यांनी अतिशय सहज आणि वेगळ्या विनोदी भूमिका साकारल्या व आपला एक विशिष्ट प्रेक्षकवर्ग आपल्या कारकिर्दीत अगदी कमी वेळात तयार केला. मराठीबरोबरच ‘गोलमाल’ या हिंदी चित्रपटात, तसेच ‘आऊटसोर्स’ या इंग्लिश चित्रपटात कामे करून त्यांनी चित्रपटातील भाषिक मर्यादा पार केल्या.

       चित्रपटात काम करत असतानाही व यशाच्या शिखरावर पोहोचल्यावरही त्यांनी नाटक या प्रयोगशील कलेकडे पाठ फिरवली नाही, तर याउलट त्यांनी आपल्या अभिनयाच्या ताकदीच्या जोरावर ‘जागो मोहन प्यारे’ या नाटकात महत्त्वाची भूमिका साकारली. नाटक सुरू झाल्यापासून संपेपर्यंत प्रेक्षकांना जागेवर खिळवून ठेवण्याची ताकद सिद्धार्थ जाधव यांच्या अभिनयात निश्‍चितपणे आहे. या नाटकाचे त्यांनी ४५० प्रयोग केलेले आहेत.

      ‘एक शून्य बाजीराव’ (सह्याद्री), ‘घडलंय बिघडलंय’, ‘हसा चकटफू’ (झी मराठी), ‘आपण यांना हसलात का?’, ‘तीन तेरा पिंपळझाड’ (ई टीव्ही), ‘दार उघडा ना गडे’ (स्टार प्रवाह) या मराठी मालिकांतून सिद्धार्थ जाधव यांनी काम केले आहे. शिवाय ‘बा बहु और बेबी’, ‘कॉमेडी सर्कस का नया दौर’ (सोनी), ‘साराभाई वर्सेस साराभाई’ अशा अनेक हिंदी मालिकांतूनही ते चमकले.

       सिद्धार्थ जाधव यांना अभिनयासाठी २००७ साली युवा बालगंधर्व पुरस्कार, २००८ साली ‘दे धक्का’ चित्रपटातल्या भूमिकेसाठी महाराष्ट्र राज्य सरकारचा उत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार, २००४-०५ साली ‘जागो मोहन प्यारे’, ‘लोच्या झाला रे’ या नाटकासाठी महाराष्ट्र राज्य व्यावसायिक नाट्य स्पर्धेत उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार, २०१२ मध्ये ‘लालबाग परळ’ या चित्रपटातील अभिनयासाठी महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार त्यांना मिळाला. महाराष्ट्र कला निकेतनतर्फे २ वेळा अभिनयासाठी पुरस्कार, तसेच एकता कल्चरल अ‍ॅकॅडमीतर्फे व्ही. शांताराम स्मृती पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत.

       कलर्स टीव्हीवरील 'कॉमेडी नाईट्स बचाओ', तर स्टार टीव्हीवरील 'नच बलिये'चा आठवा सिझनही त्यांनी गाजवला. झी युवावरील 'डान्स महाराष्ट्र डान्स' या कार्यक्रमात त्यांनी परीक्षक म्हणून भाग घेतला.

       नृत्याची उपजत देणगी लाभलेल्या या कलाकाराकडे अभिनयाची उत्तम जाणही आहेच, हे त्यांनी आपल्या अनेक प्रकारच्या भूमिका साकारून सिद्ध केलेले आहे. एक बुद्धिमान व प्रयोगशील अभिनेता म्हणून सिद्धार्थ जाधव यांनी चित्रपटसृष्टीत आपले स्वत:चे स्थान निर्माण केले आहे.

- संपादित

जाधव, सिद्धार्थ रामचंद्र