Skip to main content
x

जाधव, श्यामकांत श्रीपतराव

      श्रीपतराव व चंद्राबाई या आई-वडिलांच्या पोटी कोल्हापूरात श्यामकांत जाधव यांचा जन्म झाला. शिक्षण आणि पैसा यांच्या अभावात अत्यंत हालाखीच्या परिस्थितीमध्ये त्यांचे बालपण गेले. कोल्हापूरचा अलौकिक निसर्ग, रोमांचकारी इतिहास आणि राजर्षी शाहूंची विचारधारा याचा खोलवर ठसा त्यांच्यावर दिसून येतो.

      त्यांचे शिक्षण महानगरपालिकेच्या शाळेत झाले. बिकट परिस्थितीमुळे कला महाविद्यालयात शिक्षण घेण्याअगोदरच त्यांना नोकरी करावी लागली. वयाच्या तिसाव्या वर्षी रा.शि. गोसावी यांच्या कला महाविद्यालयात प्रवेश घेऊन जी.डी. आर्ट (पेन्टिंग); आर्ट मास्टर अशा पदविका त्यांनी संपादन केल्या. चित्रकलेच्या उमेदीच्या काळात रा.शि. गोसावी व रवींद्र मेस्त्री या दिग्गजांच्या सहवासाचा झालेला प्रभाव आजपर्यंत त्यांच्यावर टिकून आहे. त्यांचा विवाह लीला पाटील यांच्याशी १९६६ मध्ये झाला.

      श्यामकांत यांचे पहिले प्रदर्शन १९६८ साली कोल्हापूरमध्ये ‘रेनी सिझन’ (वर्षाऋतू) या विषयावर झाले. त्यांनी कुंचल्यामधून कोल्हापुरातील पाऊस साकारला होता. रंकाळा तलाव, संध्यामठ, शालिनी पॅलेस, पंचगंगा काठावरील मंदिर, मिराबाग, कोल्हापूरातील वास्तू, प्राचीन महालक्ष्मी मंदिर, या परिसराच्या अभ्यासातून त्यांच्यातील कलाकार घडत गेला. केवळ भावलेला रमणीय निसर्गच नव्हे तर त्याच्या विविध अवस्थांचे प्रतिबिंब त्यांच्या चित्रांचे विषय होते. त्यांच्या रंगरेषाच्या फटकार्‍यातून येणारा पोत रंगाच्या छटा, चित्रात अचूक मेळ साधतात. तैलरंगाच्या माध्यमातून रंगाचे प्रवाहीपण जाणवते. एखादी कलाकृती निर्माण केल्यानंतर त्यापासून तात्काळ ते नवनिर्मितीकडे वळतात. चित्रनिर्मितीसाठी त्यांनी कोणत्याही माध्यमाचे बंधन स्वत:वर लादले नाही. तैलरंग, जलरंग, अपारदर्शक जलरंग, अक्रॅलिक, पेन्सिल, पेन-इंक, पेस्टल, चारकोल इत्यादी सर्व माध्यमांमध्ये त्यांनी काम केलेेले आहे.

      पारंपरिक चित्रशैलीतून काम करणार्‍या आबालाल रेहमान, बाबूराव पेन्टर, बेंद्रे, सातवळेकर, हळदणकर तसेच पाश्‍चात्त्य चित्रकार टर्नर, व्हॅन शॉग, पॉल गोगँ, अशा अनेक कलावंताच्या विविध कामाचा प्रभावही त्यांच्या चित्रातून दिसतो. गेल्या पन्नास वर्षात त्यांनी हजारो चित्रे रेखाटली. ते वयाच्या सत्त्याहत्याराव्या वर्षीही तितक्याच उत्साहाने कार्यरत आहेत. त्यांनी अनेक प्रदर्शने भरविली. दिल्ली, मुंबई, पुणे, नाशिक, महाबळेश्‍वर, कोल्हापूर, इत्यादी ठिकाणी त्यांची सोळा एकल व अनेक समूह प्रदर्शने झाली. अमेरिका, जर्मनी, नायजेरिया अशा परदेशी कला-रसिकांच्यापर्यंत त्यांच्या कलाकृती जावून पोहोचल्या आहेत. ललितकला अकादमी, बॉम्बे आर्ट सोसायटी, आर्ट सोसायटी ऑफ इंडिया, राजस्थान कला परिषद, राज्य कला प्रदर्शन, ओक स्मृती पुणे, साऊथ झोन नागपूर, रंगबहार-कोल्हापूर, कोल्हापूर म्युझियम इत्यादी मान्यवर संस्थांच्या प्रदर्शनातून त्यांची चित्रे प्रदर्शित झाली.

      सैन्य दलातील एखादा उच्च अधिकारी शोभावा असे भारदस्त आणि रांगडे व्यक्तिमत्त्व, कोणालाही आकर्षून घेईल असा दमदार आवाज असलेले आणि कोल्हापुरातील प्रसिद्ध अशा तालमीतील कसदार पैलवान असावेत तसे श्यामकांत जाधव वाटतात.

      वृत्तपत्रे, मासिके, यांमधून त्यांचे विविध विषयांवर अनेक लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्याचबरोबर कथा, कविता, ललित, व्यक्तिचित्रे, बालवाङ्मय, ऐतिहासिक लेखन व कलाविषयक विपुल लेखन त्यांनी केले आहे. त्यांच्या कथांना पारितोषिके प्राप्त झाली आहेत. ‘फुलोरा’, ‘धनंजय आणि साज सूर’, ‘फुलपंखी’, ‘पालवी’, ‘हसणारं झाड’, ‘भावरंग’, ‘सुरंगी’, ‘सांध्यमेघ’, ‘मांडव’, ‘शिवाजी छत्रपती’ असे त्यांचे लेखन प्रकाशित झालं आहे. ‘रंग चित्रकारांचे’ या कोल्हापूरातील दोनशे वर्षांची चित्रपरंपरा सांगणार्‍या अभ्यासपूर्ण ग्रंथाची त्यांनी केलेली निर्मिती हे एक महत्त्वाचे योगदान आहे.

      आकाशवाणी आणि महाराष्ट्रातील विविध व्यासपीठांवरून त्यांनी अनेक व्याख्याने दिली. प्रात्यक्षिके, चर्चा, परिसंवाद, शिबिरे याच भाग घेतला. कोल्हापुरातील या कलानिकेतन, कला संस्थेचे अध्यक्ष या नात्याने कलाकारांना आपल्या कला सादर करण्यासाठी प्रोत्साहन दिले. कलेचा प्रचार व प्रसार करण्याच्या उद्देशाने रविंद्र मेस्री यांच्या मार्गदर्शनाखाली जाधव यांनी पस्तीस वर्षांपूर्वी ‘रंगबहार’ या संस्थेची निर्मिती केली. चित्रकला, शिल्पकला व संगीताची मैफल त्यांनी सातत्याने चालू ठेवली आहे.

      विविध क्षेत्रातील कार्याबद्दल शासकीय आणि सामाजिक क्षेत्रात त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. बालचित्रकला तज्ज्ञ म्हणून शासकीय पातळीवर गौरव आणि शिष्यवृत्ती, आदर्श शिक्षक पुरस्कार (१९७६), कोल्हापूर जिल्हा वृत्तपत्र लेखक पुरस्कार, डॉ. पतंगराव कदम पुरस्कार, केशव भिकाजी ढवळे पुरस्कार, ‘रंग चित्रकाराचे’ या ग्रंथासाठी कै. बळीराम बिडकर पुरस्कार, यांचा त्यात समावेश आहे. १९९९ साली ऑल इंडिया फाईन आर्ट अ‍ॅण्ड क्राफ्ट सोसायटी, नवी दिल्ली यांच्यावतीने व्हेटरन आर्टिस्ट (तपस्वी कलावंत) म्हणून राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांचे हस्ते जाधव यांचा सन्मान करण्यात आला. तसेच जानेवारी, २०११ मध्ये महाराष्ट्र राज्य प्रदर्शनामध्ये कलेच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले.

      - मनोज दरेकर

जाधव, श्यामकांत श्रीपतराव