Skip to main content
x

जाधव, (वीर), संपत भगवंत

            संपत भगवंत जाधव यांचे ‘ऊस संशोधन व विकास’ हे प्रमुख व महत्त्वाचे कार्यक्षेत्र असून ते भारतातील ज्येष्ठ ऊसतज्ज्ञ आहेत. त्यांचा जन्म आळणी (तालुका व जिल्हा उस्मानाबाद) या गावी शेतकरी कुटुंबात झाला. त्यांच्या आईचे नाव सुभद्राबाई होते. त्यांचे बालपण व प्राथमिक शिक्षण आळणी या गावात व माध्यमिक शिक्षण उस्मानाबाद येथे झाले. उच्च शिक्षण बी.एस्सी. (कृषी-१९५९) उस्मानिया विद्यापीठ हैदराबाद; एम.एस्सी (कृषिविद्या-१९६५) कृषी महाविद्यालय पुणे; पीएच.डी (१९७४) म.फु.कृ.वि., राहुरी व पदव्युत्तर प्रशिक्षण (शेतीसाठी पाणी व्यवस्थापन) भा.कृ.सं.सं., नवी दिल्ली या ठिकाणी झाले. तसेच एन.सी.सी. अधिकारी प्रशिक्षण (१९६३) कामठी, नागपूर येथे झाले.

               डॉ. जाधव यांनी कृषी महाविद्यालय, पुणे, कोल्हापूर व पदव्युत्तर महाविद्यालय, म.फु.कृ.वि., राहुरी या ठिकाणी प्राध्यापक व संशोधक या पदावर सुमारे १५ वर्षे काम केले. तसेच या कालावधीत एन.सी.सी. अधिकारी या पदावर राहून विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षण दिले. विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबर खेळाचे, सैनिकी शिक्षणाचे व त्यांच्यातील कलागुणाचे महत्त्व याबाबतची जाणीव निर्माण केली. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी पोलीस, महसूल, कृषी व स्वत:ची शेती या क्षेत्रांत चांगली प्रगती केली असून त्यांनी परिसरातील शेतकर्‍यांना मार्गदर्शनही केलेले आहे.

               डॉ. जाधव यांचे ऊस संशोधन व विकास हे प्रमुख कार्यक्षेत्र आहे. भा.कृ.अ.प.च्या ‘पाणी व्यवस्थापन’ प्रकल्प, म.फु.कृ.वि., राहुरी येथे प्रमुख शास्त्रज्ञ व जागतिक बँक पुरस्कृत अनुयोजित पाणी व्यवस्थापन प्रकल्प राहुरी या ठिकाणीच प्रकल्प संचालक या पदावर, असे दोन्ही पदांवर एकूण पाच वर्षे कार्य केले आहे. अनुयोजित प्रकल्प महाराष्ट्रातील मुळा, जायकवाडी, खडकवासला, उजनी व कृष्णा या पाच धरणांचे लाभ क्षेत्रात शेतकर्‍यांच्या शेतावर प्रात्यक्षिकाद्वारे राबवण्यात आला. यामुळे पिकांना पाणी देण्यासाठी योग्य पद्धतीने रानबांधणीचा अवलंब मोठ्या प्रमाणात होऊन मोकार पाणी देणे पद्धतीच्या तुलनेत सुमारे १५ ते २० टक्के पाणी बचत झाली. डॉ. जाधव यांनी मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव (जि. सातारा) या ठिकाणी ऊस विशेषज्ञ, महाराष्ट्र राज्य व ऊस संशोधन समन्वयक, दक्षिण भारत (Zonal Co-ordinator, Perinsular Zone, India) या पदावर सुमारे दहा वर्षे, तसेच पाडेगाव येथून सेवानिवृत्तीनंतर वसंतदादा साखर संस्था, मांजरी, पुणे येथे कृषिशास्त्र विभागप्रमुख या पदावर सुमारे दहा वर्षे काम केलेले आहे. भा.कृ.अ.सं. यांच्या ऊस जाती पैदासकेंद्र, कोईमतूर (तामिळनाडू) व भारतीय ऊस संशोधन संस्था, लखनौ (उत्तर प्रदेश) या ठिकाणी ऊस संशोधन सल्लागार समितीचे सदस्य म्हणून एकूण सहा वर्षे कार्य केले आहे. समितीच्या बैठकीत डॉ. जाधव यांनी उसासाठी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर, खोडवा पीक व्यवस्थापन, ऊस शेतीत यांत्रिकीकरण याविषयी सूचना केल्या. त्यानुसार संबंधित संशोधन प्रक्षेत्रावर प्रयोग घेण्यात आले. पाडेगाव केंद्र व वसंतदादा साखर संस्था, पुणे येथे ते कार्यरत असताना उसाच्या पाच जाती प्रसारित करण्यात आल्या. त्यापैकी कोसी ६७१ व को ८६०३२ या जातीची गुणवत्ता व उत्पादन क्षमता लक्षात घेऊन त्यांची हंगामनिहाय लागवड नियोजन व तोडणी कार्यक्रम परिणामकारक राबवण्यात आला. यामुळे महाराष्ट्रातील साखर कारखान्याच्या सरासरी साखर उतारा १९९६-९७मध्ये ११.११ टक्के होता, तो २००५-०६मध्ये ११.६८ टक्के एवढा वाढला. २००५-०६ नंतरही तो १९९६-९७चे साखर उताऱ्याच्या तुलनेत साधारणपणे ०.५० युनिटने सातत्याने वाढला. वाढीव साखर उतार्‍यामुळे गाळप उसाच्या प्रत्येक टनास ५ किलो जादा साखर मिळाली व शेतकऱ्याला त्या प्रमाणात उसाला जास्त भाव मिळाला. सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब मोठ्या प्रमाणात केल्यामुळे १९९६-९७मध्ये ८१.०० टन प्रति हेक्टर असणारी ऊस उत्पादकता १९९९-२०००मध्ये ९०.०० टन प्रति हेक्टर एवढी वाढली. २००१-०२पासून मात्र लोकरी मावा या किडीचा प्रादुर्भाव व पाणीटंचाई यामुळे उत्पादकता कमी झाली (२००५-०६मध्ये ७८.०० टन/हेक्टर).

               वसंतदादा साखर संस्था, पुणे व पी.टी. ओव्हीसिंदो मात्रानुसा, इंडोनेशिया यांच्यामधील सामंजस्य करारानुसार इंडोनेशियातील दक्षिण सुमात्रा राज्यात ‘ऊस लागवड व नियोजित साखर कारखाना प्रकल्प’ याबाबतचा अहवाल (Feasicility Report) तयार करण्याचे काम वसंतदादा साखर संस्थेस देण्यात आले. ते काम डॉ. जाधव यांनी केले व हा अहवाल इंडोनेशियातील संस्थेस पाठवला.

               डॉ. जाधव यांचे ऊस संशोधन व विकास याबाबत शोधनिबंध व इतर लेख असे सुमारे १२० लेख प्रसिद्ध झालेले आहेत, तसेच कृषी विद्यापीठ, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांनी शोधनिबंधाचे सादरीकरण केले आहे. ‘बळीराजा’ मासिकाचे ऊस विशेषांकासाठीही लेख लिहिलेले आहेत. ‘शेतकरी शिक्षणमाला’ या मासिकाने त्यांचे ऊस उत्पादन तंत्रज्ञान याविषयी चार पुस्तिका प्रसिद्ध केल्या आहेत. आकाशवाणी व दूरदर्शनवर डॉ. जाधव यांचे ‘ऊस संशोधन व विकास’ या संदर्भात सुमारे ४५ कार्यक्रम झालेले आहेत.

               ऊस लागवड नियोजन व व्यवस्थापन अहवाल तयार करणे, शोधनिबंध सादरीकरण, रेण्वीय जीवशास्त्र व जैविक अभियांत्रिकी प्रयोगशाळेतील ऊस संशोधन, ऊस शेतीचे यांत्रिकीकरण इत्यादी बाबतचा प्रत्यक्ष शेतीत वापर याची पाहणी व सविस्तर माहिती घेण्यासाठी डॉ. जाधव यांनी इंडोनेशिया (१९९४); कोलंबिया (दक्षिण अमेरिका-१९९५); अमेरिका (१९९५ व २०००); हवाई (१९९५) व ब्राझिल (२०००) या देशांना भेटी दिल्या.

               मराठवाडा मित्रमंडळ, पुणे या शैक्षणिक व सामाजिक संस्थेने डॉ. जाधव यांचा ऊस संशोधन व त्याच्या सामाजिक परिणामाबाबत मानपत्र देऊन सन्मान केला आहे. तसेच डेक्कन शुगर टेक्नोलॉजिस्ट्स असोसिएशन, पुणे या महाराष्ट्र, गुजरात व कर्नाटक येथील साखर उद्योगाच्या संस्थेने डॉ. जाधव यांचे ऊस संशोधन व विकासाचे समर्पित कार्य व त्याचा शेतकरी व साखर उद्योगावर झालेला विधायक परिणाम लक्षात घेऊन त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले आहे.

               मराठवाडा मित्रमंडळ, पुणे या शैक्षणिक व सामाजिक कार्य करणार्‍या संस्थेच्या स्थापनेपासून डॉ. जाधव संस्थेशी निगडित आहेत. सुरुवातीच्या काळात चिटणीस म्हणून व २०००पासून उपाध्यक्ष या पदावर कार्यरत आहेत.

               डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना, अरविंदनगर केशेगाव (ता./जि. उस्मानाबाद) या कारखान्याच्या उभारणीपासून (१९९९-२०००) ऊस विकास कार्यक्रमाचे नियोजन व शेतकर्‍यांच्या शेतावर कार्यक्रम राबवण्यात डॉ. जाधव यांचा सक्रिय सहभाग आहे. महाराष्ट्रात व विशेषत: उस्मानाबाद जिल्ह्यात ऊस शेतीसाठी पाणी हा फार मर्यादित घटक असल्यामुळे, कारखान्याच्या राजर्षी शाहू ट्रस्टच्या माध्यमातून पाण्याचा कार्यक्षम व मोजका वापर याविषयी शेतकर्‍याला प्रशिक्षण व प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शनाच्या कामात कार्यरत असतात.

        - संपादित

जाधव, (वीर), संपत भगवंत