Skip to main content
x

जाखेरे, पांडुरंग अहिलाजी

हाराष्ट्रामध्ये भारतीय गोवंश संवर्धनाचे काम अत्यंत तळमळीने करणाऱ्या  मोजक्या शेतकऱ्यांमध्ये एक अग्रणी नाव पांडुरंग अहिलाजी जाखेरे यांचे. त्यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील पोस्ट वाघेरे, मुक्काम मोगरे येथे झाला. तेथेच त्यांचे बालपण गेले. त्यांचे शिक्षण लौकिक अर्थाने इयत्ता चवथीपर्यंत झाले, पण घरच्या कालवडीला व खोंडाला आदर्श कसे करायचे व वंश शुद्ध कसा करायचा, हे त्यांचे ज्ञान व कार्य एखाद्या पशुतज्ज्ञाला अचंबित करणारे आहे. आपल्याच घरच्या गायींपासून चांगला वंश कसा करायचा याचे बाळकडू त्यांना आईपासून मिळाले.

जाखेरे रोज जंगलामध्ये आपला गुरांचा कळप लहानपणापासून चरायला नेत असत, पण उन्हाळ्यामध्ये कळपामधील गाभण गायी, दुभत्या गायी वेगळ्या करून त्यांना कोणत्या झाडांचा पाला खाऊ घालायचा तसेच बैल व अर्धवट वयाची वासरे यांना या काळात कोठे चारायचे याचा उत्तम अभ्यास केला होता.

जाखेरे ५० वर्षे आपल्या घरच्या ‘डांगी’ गोवंशाच्या गायी व बैल उत्तम कसे होतील या एकाच ध्यासाने काम करत आहेत. त्यांच्याकडे जवळपास ९०च्या संख्येने गोवंश आहे. त्यामध्ये उत्तम असे ३ वळू, १० ते १५ आड वयाची खोंडे, १५ ते १८ गाभण गायी, २० ते २५ दुभत्या गायी, इतर लहान वासरे व कालवडी आहेत. प्रत्येक जनावराला स्वतःची अशी नावाची ओळख आहे. प्रत्येक गायीच्या प्रत्येक स्थितीची नोंद ते ठेवतात व प्रत्येक वळूच्या संकराची नोंद ते ठेवतात. त्यांच्याकडची प्रत्येक गाय दिवसाकाठी सर्वसामान्य मेहनतीवर व्यायल्यानंतर ७ ते ८ लीटर दूध देते. तसेच सलग १२ ते १५ महिने विनातक्रार दूध देते व अल्प अशा भाकड काळानंतर १८ ते २४ महिन्यांनी दुसर्‍यांदा वेत देते. शासनाने डांगी पैदास केंद्र चालू करताना जो गोवंश खरेदी केला, त्यामध्ये जाखेरे यांच्या ६ गायी व एका वळूचा समावेश होता.

महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी पशुप्रदर्शने आयोजित केली जातात, त्या ठिकाणी १९९०पासून ‘डांगी’ गोवंशाचा प्रसार व प्रचार व्हावा म्हणून जाखेरे त्यांच्याकडील गोवंश नेतात. नाशिक व अहमदनगर जिल्ह्याच्या पशुसंवर्धन विभागाने आतापर्यंत १० ते १२ वेळा जाखेरे यांचा आदर्श गोपालक म्हणून सत्कार केला आहे, तसेच त्यांच्या गोवंशाला १९९२-१९९३ सालचा घोटी येथील पशुप्रदर्शनामध्ये वळू प्रथम क्रमांक व गाभण गाय यामध्ये प्रथम क्रमांक मिळाला, तर १९९३-१९९४मध्ये अहमदनगर जिल्ह्यामधील राजूर गावच्या पशुप्रदर्शनामध्ये गाभण गाय या श्रेणीमधील प्रथम क्रमांक, तर बैलाला ‘आठदाती’ या श्रेणीमधील द्वितीय क्रमांक, त्याच वर्षी घोटी, येथील पशुप्रदर्शनामध्ये आदर्श खोंड व आदर्श कालवड या श्रेणीमधील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. राजस्थान सरकारने २०००मध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्तरावरील पशुप्रदर्शनामध्ये त्यांच्या जनावरांना डांगी गोवंशामधील ‘उत्तम बैल’ हा प्रथम पुरस्कार व एका वळूला संकरासाठीचा ‘ब्रीड चॅम्पियन’ हा विशेष पुरस्कार मिळाला आहे. बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने आयोजित केलेल्या ‘हरित क्रांती २०१०’ साठीच्या कृषी व पशुप्रदर्शनामध्ये जाखेरे यांच्याकडील खोंडाला ‘सहादाती’ या श्रेणीमधील द्वितीय पुरस्कार मिळाला आहे. वयाच्या सत्तराव्या वर्षीही जाखेरे मनोभावे गोधनाची सेवा करतात.

- मानसी मिलिंद देवल

 

 

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].