Skip to main content
x

जालवणकर, नारायण महाराज

पुराणिक, नारायण तात्या

    नारायण महाराज जालवणकर यांचे घराणे झाशी, मध्यप्रदेश येथील जालवण या गावचे होते. त्यांचे वडील तात्या पुराणिक यांना जालवणच्या राजाकडून पुराण वाचण्याबद्दल वर्षाला आठशे रुपये वेतन मिळे. तात्या पुराणिकांना नवसासायासाने गुरुवार, आषाढ वद्य पंचमी रोजी पुत्ररत्न प्राप्त झाले. त्यांनी त्याचे नाव नारायण ठेवले. नारायण वर्षाचा व्हायच्या आधीच त्याच्या मातु:श्री देवाघरी परतल्या. त्यानंतर नारायणाचा सांभाळ त्यांच्या आजीने केला.

     लहानपणी नारायण कुठेही अडगळीत लपून राही. ‘‘काय करतोस?’’, असे विचारल्यावर, ‘‘आज्जी गं, देव शोधतो,’’ असे म्हणे. पुढे आठ वर्षांच्या नारायणाची मुंज झाल्यानंतर आणखी दोन वर्षांतच त्याला त्याच्या इच्छेविरुद्ध विवाहबंधनात अडकवण्यात आले. असे म्हणतात, की मागच्या जन्मात हिरण्यगर्भाचार्य नाव असलेल्या नारायणाला एका स्त्रीने लग्नाची मागणी घातली होती. तेव्हा नारायणाने तिला पुढच्या जन्मात सहधर्मचारिणी म्हणून स्वीकारण्याचे वचन दिले होते. म्हणून ही वचनपूर्ती होती. परंतु थोड्याच दिवसांत नारायणाला विरक्ती आली आणि तो घर सोडून मथुरेला सद्गुरूंच्या शोधात निघून गेला. तेथे त्याची भेट खूप वयस्कर, ३५० वर्षांचे ज्ञानवृद्ध हठयोगी गोवर्धनबाबा यांच्याशी झाली. बाबांनी त्यास ध्यान, मंत्र, उपासना शिकवली; आणि त्यास पुन्हा घरी परतून प्रपंच करण्यासाठी सुचविले.

      गोवर्धनबाबांनी नारायणाला सांगितले, ‘‘तुला दत्तदर्शन होईल, शांत राहा, संसार कर.’’ नारायण घरी परतून संसार करू लागला. त्यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला खरा; परंतु आठच दिवसांत त्यांची पत्नी आणि पुत्र, दोघेही निवर्तले. या वेळी मात्र नारायणांनी घर त्यागण्याचा निर्णय घेतला. ते दत्तदर्शनार्थ जुनागढला गिरनार पर्वतावर गेले. दत्त भेटत नाहीत म्हणून निराश मनाने पर्वतावरून देहत्याग करणार, इतक्यात एका फकिराने त्यांना आपल्या सोबत पर्वताच्या पायथ्याकडील गुंफेत नेले. तेथे नारायणांना दत्त दर्शनाचा साक्षात्कार झाला. त्यांना ब्रह्मविद्येचा बोध झाला. नारायणांचे वय त्या वेळी वीस वर्षांचे होते.

     श्री दत्तांनी त्यांना जगदुद्धारासाठी ज्ञानदान करण्यासाठी भारतभर परिक्रमा करण्याची आज्ञा केली. त्यानुसार नारायण महाराज हे नाव धारण करून त्यांनी रामेश्वर, काशी, जगन्नाथपुरी, मुंबई असे फिरून कानपूर येथील ब्रह्मावर्तात परिक्रमेची सांगता केली. ब्रह्मावर्तात  नारायण महाराजांनी आपली हजारांहून अधिक शिष्यमंडळी तयार केली. परंतु यांपैकी दोघेच शिष्य पूर्णावस्थेला पोहोचले. एक महाराजांचेच नाव धारण केलेले रत्नागिरीचे देवरुखे ब्राह्मण सद्गृहस्थ नारायणबाबा आणि दुसरे ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे राहणारे सखारामबाबा.

     मुंबईतही राधाकृष्ण राघोबा तोरणे हे गौड सारस्वत ब्राह्मण सिद्धदिशेला पोहोचलेले शिष्य होते. याशिवाय विष्णूबाबा ब्रह्मचारी, दिवाण बापूजी रघुनाथ दिघे यांच्या पत्नी नानी बया, अशा अनेक शिष्यांनी महाराजांच्या शिकवणीचा प्रसार केला. या शिष्यमंडळींनी पुढे ब्रह्मविद्येचा प्रसार भारतभर केला.

     याच शिष्यमंडळीत एक शिष्य महाराजांबद्दल असूया बाळगून होता. त्याला सुधारावे या उद्देशाने त्याची वाचा त्यांनी आपल्या साधनेने बंद पाडली. नंतर त्याला चार घरी जाऊन ‘भिक्षां देहि’ असे बोलण्यास सांगितल्यावर त्या शिष्याची वाचा पुन्हा पूर्ववत झाली. आपली साधना, महाराज अशा प्रकारे उन्मत्त माणसाला मार्गावर आणण्यास वापरीत. प्रसिद्धी आणि स्वत:च्या लाभासाठी त्यांनी आपली साधना कदापिही वापरली नाही. नारायण महाराज भगवे वस्त्र आणि हातात चिमटी अशा वेषात वावरत असत, म्हणून ते उत्तर भारतात ‘चिमटेबाबा’ म्हणूनही प्रसिद्ध होते.

     महाराज जेव्हा पुराण सांगत तेव्हा चुकार श्रोत्यांनी चुळबुळ केल्यास ते भिंतीकडे वळून पुराण वाचीत. भिंती जास्त शांतपणे पुराण ऐकतात असे सांगितल्यावर चुकार श्रोते वठणीवर येत.

     प्रापंचिकांसाठी नारायण महाराजांनी विपुल ज्ञानसागर दिला. ‘सत्यसागर’ ही १७,६७२ ओव्यांची त्यांची प्रतिभा माणसाच्या अध्यात्म-शक्तीला बलवर्धक ठरेल असे जीवनसत्त्व आहे.

     महाराजांनी आपला सारा अनुभव त्यात चितारला आहे. या महाग्रंथात बोध, करुणा, शांती, विज्ञान, ज्ञान, आनंद, कैवल्य या विषयांवर सुबोध भाषेमध्ये विवेचन केले आहे. याव्यतिरिक्त त्यांंचे स्फुटलेखनही विपुल आहे. ‘निर्वाणपंचक’, ‘सिद्धयोगाष्टक’, ‘गुरुपादुकाष्टक’, ‘बोधाष्टक’, ‘चिद्रत्नमाला’, ‘धावे’ आणि अनेक पदांची त्यांनी निर्मिती केली आहे. ‘वनवास विलास’ हे त्यांचे मनाचे मनोगत फार साक्षेपाने रेखाटलेले शब्दचित्र आहे.

     नारायण महाराज जालवणकर आषाढ वद्य पंचमीला साठाव्या वर्षीच, गुरुवारी पूर्णानंदांच्या मठात समाधिस्थ झाले.

संदीप राऊत

जालवणकर, नारायण महाराज