Skip to main content
x

जामकर, रावसाहेब बापूसाहेब

       रावसाहेब बापूसाहेब जामकर यांचा जन्म परभणी तालुक्यातील जांब या गावी एका पिढीजात श्रीमंत घराण्यात झाला. त्यांच्या वडिलांना एकत्र कुटुंबातील वाटणीतून १२५ एकर जमीन मिळाली होती, पण रावसाहेबांनी शेती व्यवसाय करावा, असे वडिलांना वाटत नव्हते, त्यामुळे त्यांनी रावसाहेबांना शिक्षण घेण्यासाठी बाहेरगावी ठेवले होते.

रावसाहेबांनी हैदराबाद विवेकवर्धिनी व अंबाजोगाई योगेश्वरी शिक्षण संस्था येथे शिक्षण घेतले. रावसाहेबांचे शिक्षण संपण्याच्या सुमारास त्यांचे संयुक्त कुटुंब विभक्त झाले होते. आपले शिक्षण पूर्ण झाल्यावर रावसाहेबांनी शेतीत लक्ष घालण्यास सुरुवात केली. आपली शेती शास्त्रीय पद्धतीने करण्याकडे त्यांचा कल होता. त्यांनी आपल्या जमिनीचे सपाटीकरण करण्याचा उपक्रम राबवला. तसेच शेतात शेणखत, कंपोस्ट खत आणि रासायनिक खत यांचा योग्य तो उपयोग करण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांना चांगले पीक घेता येऊ लागले. रावसाहेब आपले ज्ञान स्थानिक शेतकऱ्यांना आनंदाने देत असत. त्यामुळे लवकरच ते जांबचे सरपंच झाले. जांबच्या शेतकऱ्यांचा  माल जिल्ह्याच्या ठिकाणी योग्य भावाने विकला जावा, म्हणून त्यांनी परभणी येथे आडत दुकान स्थापन केले. पुढे १९६२मध्ये रावसाहेब जिल्हा परिषदेवर निवडून गेले व त्यांनी सात वर्षे जिल्हा परिषदेच्या कृषी सहकार समितीवर काम केले.

शेतीला पाण्याची चांगली सोय व्हावी; म्हणून रावसाहेबांनी आपल्या शेतजमिनीवर चौदा विहिरी खोदल्या. पूर्वी त्यांची जमीन ठिकठिकाणी विखुरलेली होती. गैरसोयीची ठरणारी जमीन विकून त्यांनी केवळ दोन ठिकाणीच सलग २५० एकरांत जमिनीचा विस्तार केला. पुढच्या काळात संकरित बीजोत्पादनाचा कार्यक्रम हाती घेतल्यानंतर त्यांनी दर्जेदार शुद्ध बियाण्यांची प्रक्रिया आणि विक्री योग्य पद्धतीने व्हावी, यासाठी सहयोगी बीज उत्पादक व प्रक्रिया सहकारी संस्था स्थापन केली. तसेच परभणी जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी प्रीमिअर सीड्स कंपनी स्थापन केली. पुढे दोन वेळा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात जामकर यांचा समावेश करण्यात आला. पहिले ग्रामीण विकास खाते आले व नंतर कृषी खाते आले. जामकर कृषी विद्यापीठ चळवळीचे आश्रयदाते होते. विद्यापीठ स्थापनेनंतर ते कार्यकारिणी सदस्य होते. तेव्हा त्यांनी ग्रामीण विकासासाठी शेतीविकासाला पर्याय नाही, हे ध्यानात घेऊन विविध योजना आखल्या. सहकाराचा हात धरून शेतकऱ्यांच्या मालकीचे उद्योग उभे राहावेत; यासाठीही जामकर यांनी मनापासून प्रयत्न केले. परभणी येथे मोसीकॉल कारखाना आणि प्रभावती सहकारी सूतगिरणी, तालुका जिनिंग फॅक्टरी, नृसिंह सहकारी साखर कारखाना हे प्रकल्प त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष देतात. त्यांना परभणीच्या जमिनीच्या उत्पादन क्षमतेची चांगली पारख असल्यामुळे त्यांच्या शेतीवर द्राक्षे, मोसंबी, केळी, चिक्कू इत्यादी बागायती पिके दिसून येतात. बदलत्या कालमानानुसार त्यांनी यांत्रिक शेतीचा अवलंब करण्यास प्राधान्य दिले.

जामकर यांनी अन्य क्षेत्रांतही लक्षणीय कार्य केले आहे. त्यांनी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळावर विविध जबाबदाऱ्या सांभाळून काम केले आहे. परभणी येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या स्थानिक नियामक मंडळाचे अध्यक्ष असताना त्यांनी महाविद्यालयांतून विविध विषय सुरू केले. त्यांनी परभणी जिल्ह्यातील दैठणा व ताडबारेगाव अशा ग्रामीण भागातही शैक्षणिक संस्था उभ्या करण्याचे धाडस दाखवले. जेव्हा महाराष्ट्र राज्य नुकतेच स्थापन झाले होते व सहकार कायदा खेडोपाडी येऊनही पोहोचला नव्हता. तेव्हा जामकरांनी त्यांच्या गावी १९१८पासून कार्यरत असणार्‍या अंजुमन संस्थेची सहकार कायद्यानुसार जाम विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्यादित, जाम म्हणून १९६०मध्ये स्थापना केली. या संस्थेने शेतकऱ्याच्या हितासाठी अत्यंत प्रशंसनीय कार्य केले. तसेच शहरातील छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांशी संपर्क साधून १९६५मध्ये दी परभणी पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लि., परभणी या नावाने नोंदणी केली. जामकरांनी या बँकेला चांगले नेतृत्व दिले. या बँकेचा स्वतःच्या मालकीच्या इमारतीसह, अन्य गावांत आठहून अधिक शाखा; असा विस्तार पुढच्या काळात झाला. त्यांनी १९६६मध्ये परभणी तालुका जिनिंग व प्रेसिंग सहकारी सोसायटी काढली व तिचाही चांगला विस्तार घडून आला. त्यांनी सूतगिरणीसारखा मोठा प्रकल्प हातात घेतला व तो चांगला चालवला, पण काही महत्त्वाकांक्षी मंडळींनी त्यांच्याकडून नेतृत्व काढून घेतले आणि अवघ्या दोनच वर्षांत या सूतगिरणीला टाळे लागले.

राजकीय क्षेत्रात जामकरांचा खेड्याचा सरपंच ते महाराष्ट्राच्या मंत्रिपदापर्यंत प्रवास झाला. परभणी येथील गृहरक्षक दलाचे समादेशक म्हणून त्यांनी १९६२ ते १९७७ या काळात जबाबदारी सांभाळली. त्याबद्दल त्यांना १९७६मध्ये राष्ट्रपती पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. त्यांचा परभणी येेथे लायन्स क्लब स्थापण्यात सिंहाचा वाटा आहे. ते १९६९ ते १९७६ या काळात लायन्स क्लबचे अध्यक्ष होते. या काळात त्यांनी अमेरिका, इटली, जपान आदी देशांना भेटी देऊन तेथील सामाजिक व शैक्षणिक संस्थांचा अभ्यास केला.

- संपादित

 

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].