जानोरीकर, त्र्यंबक दत्तात्रेय
शास्त्रीय संगीताचे अध्यापन करणारे गुरुजन अनेक आहेत; पण समृद्ध गायकीबरोबरच शिष्यांना गायकीची नजर देणारे जे थोडे गुरुजन आहेत, त्यांपैकी जानोरीकर हे एक होते.
त्र्यंबक जानोरीकर यांचा जन्म अहमदाबाद येथे झाला. त्यांचे आई-वडील अत्यंत धार्मिक वृत्तीचे होते. त्यांच्या आईचा आवाज अत्यंत मधुर होता व त्या सुंदर भजने म्हणत असत. बालपणातच त्यांच्यावर संगीताचे संस्कार झाले. बालपणातच जानोरीकरांच्या आईचे निधन झाल्यामुळे त्र्यंबक त्यांच्या आजोबांकडे, पुण्याला आले. त्यांच्या आजोबांनाही शास्त्रीय संगीताची आवड असल्याने पं. विनायकबुवा पटवर्धन यांच्या संगीत विद्यालयात संगीताचे शिक्षण घेण्यासाठी त्यांनी त्र्यंबकला दाखल केले. इथून जानोरीकरांच्या सांगीतिक जीवनाची सुरुवात झाली. संगीतावरील निष्ठा व तीव्र ग्रहणशक्ती पाहून पं. विनायकबुवांनी त्यांना बारा वर्षे ग्वाल्हेर घराण्याची खास तालीम दिली. या शिष्यानेही निष्ठेने रियाज करून ग्वाल्हेर गायकी पूर्णपणे आत्मसात केली. तसेच पं. विनायकबुवांची शिस्त, नियोजन, चारित्र्यसंपन्नता हे गुणही जानोरीकरांनी अंगी बाणविले. पं. विनायकबुवा आपल्या शिष्याला आपल्याबरोबर गायनाच्या कार्यक्रमासाठी भारतभर नेत असत. त्यामुळे मोठमोठ्या संगीत संमेलनांतून आपली गायनकला सादर करण्याची, तसेच मोठमोठ्या कलाकारांचे गायन ऐकण्याची संधी त्यांना मिळत गेली. आपले गायन समृद्ध करण्यासाठी पं. जानोरीकरांनी या संधीचा चांगला उपयोग करून घेतला.
संगीताच्या शिक्षणाबरोबरच त्यांचे शालेय शिक्षणही उत्तम रितीने चालू होते. मॅट्रिकची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्यावर संगीताच्या वेडापायी संगीत क्षेत्रातच कार्य करण्याचे जानोरीकर यांनी ठरविले. पं. विनायकबुवांनीही त्यांना संगीताच्या प्रसाराचे कार्य करण्यास उद्युक्त केले. गुरुच्या आज्ञेप्रमाणे संगीताच्या प्रसाराचे कार्य करण्यासाठी त्यांनी अहमदनगरमध्ये आपले वास्तव्य ठेवले. परंतु स्वत:च्या गायनाचा विकास इथे होणार नाही हे ध्यानात आल्यावर त्यांनी पुण्याला परतण्याचे ठरविले. अर्थार्जनाच्या दृष्टीने तो काळ फार अस्थिर व अनिश्चित होता. परंतु जानोरीकरांनी धैर्याने या समस्येला तोंड दिले. याच काळात ते आकाशवाणीचे मान्यताप्राप्त गायक कलाकार झाले. निरनिराळ्या मैफलींतून त्यांचे गायनाचे कार्यक्रम होऊ लागले.
इतक्यात पं. जानोरीकरांच्या जीवनाला एक महत्त्वपूर्ण वळण मिळून त्यांचे सांगीतिक जीवनच बदलून गेले. त्या काळी पं. शिवकुमार शुक्ल हे भेंडीबाजार घराण्याचे उ. अमानअली खाँ यांचे शिष्य, यांचे नाव महान गायक म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचे सौंदर्यपूर्ण आणि पूर्णत: वेगळ्या ढंगातील गायन ऐकण्याचा योग पं. जानोरीकरांच्या जीवनात आला. आगळा स्वराविष्कार, अप्रतिम बंदिशी, अजोड सरगम, विजेसारखी चपळ तानक्रिया हे सर्व पैलू पाहून पं. जानोरीकर विलक्षण प्रभावित झाले आणि त्यांनी निश्चय केला, की यापुढे शिकेन तर या कलाकाराच्या गुरूकडेच शिकेन. पं. शिवकुमार शुक्ल यांचे गुरू उ. अमानअली खाँ त्या वेळी मुंबईत वास्तव्य करून होते. परंतु १९४७ मध्येे ते पुण्यात वास्तव्यास आले. खाँसाहेबांच्या खानदानी रीतिरिवाजाप्रमाणे गंडाबंधनाचा कार्यक्रम १९४८ मधील वसंतपंचमीच्या दिवशी संपन्न झाला आणि खाँसाहेबांची तालीम सुरू झाली.
त्या दिवसापासून जानोरीकरांच्या समोर संगीताच्या नवीनच विश्वाचा उदय झाला. संपूर्ण दिवस गायनाच्या शिकवण्या करून रोज रात्री ८ ते १ वाजेपर्यंत खाँसाहेबांची तालीम चालत असे. खाँसाहेबांनी जानोरीकरांची निष्ठा आणि ग्रहणशक्ती पाहून उदार मनाने भेंडीबाजार घराण्याच्या गायकीची सर्व वैशिष्ट्ये शिकविली. मुलायम कण-स्वरांची गायकी, खंडमेराची बढत, लयीशी निगडित पेशकारी, शब्दांचे भावपूर्ण उच्चारण, लयीशी खेळत कर्नाटकी अंगाची सरगम या सर्व गोष्टी जानोरीकर श्रद्धापूर्वक शिकत होते. खाँसाहेबांनी आपल्या आगळ्यावेगळ्या ढंगदार बंदिशी आत्मीयतेने जानोरीकरांना शिकवल्या. अशा तऱ्हेने जानोरीकरांना पाच वर्षांपर्यंत खाँसाहेबांची तालीम मिळाली व खाँसाहेबांचे आशीर्वादही मिळाले.
उ. अमानअली खाँसाहेबांचे १९५३ मध्ये निधन झाल्यावर जानोरीकरांनी भेंडीबाजार घराण्याच्या ज्येष्ठ कलाकार गानतपस्विनी अंजनीबाई मालपेकर यांच्याकडे शिकण्यास प्रारंभ केला. दोन्ही गुरू एकाच घराण्याचे असल्याने गायकीची मूलतत्त्वे समान होती. परंतु प्रत्येकाची प्रतिभा, सौंदर्यदृष्टी, आवाजाची जात ह्या गोष्टी भिन्न असतात. त्यानुसार खाँसाहेबांपेक्षा अंजनीबाईंची गायनशैली अधिक विलंबित लयीची होती. खुला आवाज व दीर्घ मींडकाम, दीर्घ श्वास ही अंजनीबाईंची वैशिष्ट्ये होती. खाँसाहेब मध्यलय जास्त पसंत करीत असत. मींडकामही मध्यम स्वरूपाचे असे.
जानोरीकरांनी चार ते पाच वर्षे अंजनीबाईंकडे तालीम घेतली. त्यांच्या गायकीचे मर्म आत्मसात केले. खाँसाहेबांकडून मध्यलयीची गायकी, तर अंजनीबाईंची विलंबित गायकीची तालीम मिळाल्याने जानोरीकरांना ज्ञानाचे भांडारच उपलब्ध झाले. मिळालेल्या या सर्व विद्येचे चिंतन-मनन व रियाज करून ते ज्ञान आत्मसात करून श्रोत्यांसमोर घराण्याची गायकी सादर करण्याचे कार्य सुरू झाले.
उ. अमानअली खाँसाहेब आध्यात्मिक वृत्तीचे असल्याने मैफलीत जास्त गात नसत. अंजनीबाईंनी ऐन उमेदीतच गायन-संन्यास घेतला व पं. शिवकुमार शुक्ल यांचा आवाज अचानक खराब झाल्यामुळे घराण्याची गायकी श्रोत्यांपर्यंत जाणे दुरापास्त झाले होते. विद्वान लोकांना या घराण्याच्या गायकीची व कलाकारांची माहिती होती. पण सर्वसामान्य रसिकांना या गायकीचा लाभ न मिळाल्याने हे घराणे संपले अशीच धारणा लोकांमध्ये रुजली होती.
भेंडीबाजार घराण्याची ही स्थिती पाहून जानोरीकर व्यथित झाले. त्यांनी ही अजोड गायकी जपण्यासाठी कंबर कसली. सर्व समस्यांना तोंड देत, परिस्थितीशी झगडत त्यांनी विद्यादानाचे कार्य सुरू केले. अनेक शिष्यांना विद्यादान करत असताना निवडक ५-६ शिष्य चांगले तयार झाले. जे पुढच्या पिढीपर्यंत ही गायकी पोहोचवू शकतील असे साधना जोशी, सुहासिनी कोरटकर, श्रीकांत पारगावकर, शरद करमरकर, कुमुदिनी मुंडकूर, वसुंधरा पंडित, पद्माकर कुलकर्णी आणि अनुराधा कुबेर हे उल्लेखनीय शिष्य आहेत.
घराण्याचे नाव पुन्हा उज्ज्वल करण्यासाठी उ. अमानअली खाँसाहेबांची पुण्यतिथी साजरी करण्यासाठी १९८१ मध्ये शिष्यांच्या सहकार्याने जानोरीकरांनी कार्यक्रम करण्यास सुरुवात केली. गोवा, पुणे, मुंबई, दिल्ली, सातारा, चिंचवड अशा विविध ठिकाणी दरवर्षी जानोरीकर व त्यांच्या शिष्यांचे, तसेच घराण्यातील इतर गुरुजनांच्या शिष्यांना सामावून घेत गायनाचे कार्यक्रम खाँसाहेबांच्या पुण्यतिथीला साजरे केले. त्या निमित्ताने घराण्याची माहितीपत्रके, स्मरणिका, वर्तमानपत्रांतून लेख प्रकाशित केले गेले.
शिष्या डॉ. सुहासिनी कोरटकर या दिल्लीला आकाशवाणीमध्ये अधिकारी म्हणून सेवेत असताना जानोरीकरांचे दिल्लीला जाणेयेणे सुरू झाले. उत्तर भारतात अनेक संगीतसभांमधून त्यांनी घराण्याची दुर्मीळ गायकी प्रभावीपणे श्रोत्यांसमोर मांडली. त्यांचे गायन ऐकून रसिकांना वेगळ्याच आनंदाची अनुभूती मिळाली.
प्रसिद्ध बासरीवादक व समीक्षक श्री. प्रकाश वढेरा आपल्या एका लेखात लिहितात : ‘पं. जानोरीकरांचे गाणे ऐकणे हा एक अनोखा अनुभव होता. धीरगंभीर आवाज, गुंजनयुक्त स्वरलगाव, दीर्घ मींडयुक्त आलापी, लयदार सरगम, गमकेच्या ताना, बंदिशींचे सुंदर सादरीकरण ही भेंडीबाजार घराण्याच्या गायकीची सर्व अंगे त्यांच्या गायनातून प्रकट होत असत.’
संगीत नाटक अकॅडमी, आकाशवाणी या संस्थांनी पं. जानोरीकर यांचे विशेष ध्वनिमुद्रण त्यांच्या संग्रहात समाविष्ट करून ठेवले आहे. त्यामुळे पुढील पिढ्यांसाठी भेंडीबाजार घराण्याची गायकी ऐकण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.
कोलकाताच्या संगीत रिसर्च अकॅडमीने १९९० मध्ये पं. जानोरीकरांना भेंडीबाजार घराण्याचे गुरू म्हणून आवर्जून आमंत्रित केले. तीन वर्षे राहून तेथे त्यांनी शिष्यांना विद्यादान केले. तेथील संगीत लायब्ररीने घराण्याच्या बंदिशींचे ध्वनिमुद्रणही करून घेतले आहे.
पं. जानोरीकरांना शारीरिक व्याधींशीही खूप झगडावे लागले. अनेक शस्त्रक्रियांना सामोरे जावे लागले. आर्थिक विवंचनेलाही तोंड द्यावे लागले. पण त्यांच्या पत्नी श्रीमती सुमनताई त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या होत्या. पं. जानोरीकरांची स्नुषा किशोरी जानोरीकर ही संगीताची परंपरा पुढे चालवीत आहे. पं. जानोरीकरांना महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक पुरस्कार, शारदापीठ, पुणे द्वारा ‘गानमहर्षी’ पुरस्कार, गानवर्धनचा ‘स्वर-लय-रत्न’ पुरस्कार, ‘बाबासाहेब गाडगीळ ट्रस्ट’ पुरस्कार, ‘वसुंधरा पंडित स्मृती’ पुरस्कार व संगीत रिसर्च अकॅडमी पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले. त्यांनी अनेक संस्थांना देणग्या देऊन सामाजिक जाणीवही जोपासली.