Skip to main content
x

जावडेकर, सुबोध प्रभाकर

     सुबोध जावडेकर यांचा जन्म मुंबई येथे झाला. प्राथमिक शिक्षण इस्लामपूर नवीन मराठी शाळा, हायस्कूल येथे झाले. मॅट्रिक शिक्षण चिकुर्डे, ता. वाळवे येथे झाले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण बी. टेक. केमिकल इंजिनिअरिंग आय. आय. टी. मुंबई येथे झाले. १९७० मध्ये ते वसुधा पंडित यांच्याशी विवाहबद्ध झाले.

     जेकॉब्ज इंजिनिअरिंग, इंडिया ह्या इंजिनिअरिंग कन्सल्टन्सी कंपनीत नोकरी करून ते निवृत्त झाले. आज विज्ञानकथा लिहिणार्‍या लेखकांमध्ये सुबोध जावडेकर हे प्रमुख नाव घेतले जाते. कोणत्याही साहित्यात शेवटी स्वतःचा शोध प्रमुख असतो. फक्त परिस्थितीनुसार विचारव्यूह बदलतात. आजची विज्ञानकथा मुख्य प्रवाहात मिसळून जाण्याची शक्यता, जावडेकर अजमावून पाहतात. याबरोबरच औद्योगिक क्षेत्रातील अन्य कथाही त्यांनी लिहिल्या आहेत. जावडेकरांच्या विज्ञानकथांचा रोख अखेर माणसा-माणसांमधील नातेसंबंधांवर अवलंबून असतो.

     ‘गुगली’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह १९९१ साली प्रसिद्ध झाला. ‘वामनाचे चौथे पाऊल’ विज्ञानकथासंग्रह (१९९४) तर ‘आकांत’ ही भोपाळ दुर्घटनेवर आधारित कादंबरी (१९८८) ग्रंथालीने प्रकाशित केली. ‘हसरं विज्ञान’ हा विज्ञानावर विनोदी अंगाने लिहिलेला ललित लेखसंग्रह; ही त्यांची प्रमुख पुस्तके होत. ‘प्लॅस्टिक’ या विषयावर त्यांनी माहितीपूर्ण चार पुस्तके लिहिली. त्यांनी मोजकेच लेखन केले आहे. त्यांचे लेखन नेटके व संयत असते. विज्ञानावर लेखन असूनही शैली ललित अंगाने जाते, त्यामुळे वाचताना औत्सुक्य वाटत राहते. जीवनातील भावपूर्ण नाट्यात्मतेचे त्यांना भान आहे. शिवाय त्याला नर्म विनोदाचा एक हलकासा अंतःस्तर असतो. त्यामुळे वाङ्मयक्रीडेसारखा एक पुसटसा आनंद ते वाचकांना मिळवून देतात व त्यातूनच ते जीवनविषयक प्रश्न वाचकांच्या मनात उभे करून वाचकांना विचार करण्यास उद्युक्त करतात. ‘संगणकाची सावली’ (१९९७), ‘विज्ञानाच्या नव्या वाटा’ (१९९२), ‘विज्ञानाची नवी क्षितिजे’ (१९९२), ‘आकाशभाकिते’ (२०००) ही त्यांनी लिहिलेली आणखी काही पुस्तके आहेत. त्यांच्या कथांमध्ये यंत्रामुळे येणार्‍या परात्मतेचे भान आहे. संगणकाच्या आणि यंत्रमानवाच्या ताब्यात गेले की कामात गणिती बिनचूकपणा येतो. त्यामुळे अपूर्णतेमधील अनपेक्षित गंमत हरवते. याबद्दल कधीकधी ते खंतही व्यक्त करतात. त्यांच्या दोन पुस्तकांना राज्य शासनाची पारितोषिके मिळाली, तसेच कथासंग्रहास केशवराव कोठावळे पुरस्कार मिळाला. ‘आकांत’ कादंबरीचा मल्याळममध्ये अनुवाद झाला. पंचवीस कथांचे अनुवाद इंग्रजी, उर्दू, कन्नड, मल्याळम, बंगाली, इटालियन, स्पॅनिश इत्यादी भाषांमध्ये झाले. विविध पाठ्यपुस्तकांतून, अभ्यासक्रमांतून त्यांच्या लेखांची व कथांची निवड झाली आहे.

     त्यांच्या लेखनात हेवेदावे, अहंकार अशा पातळीवर वावरणारी माणसे, एका विशिष्ट क्षणी साक्षात्कार व्हावा तशी अंतरीच्या प्रकाशाने उजळून निघतात. जावडेकरांना मानवी जीवन, त्यातली धडपड यांतली वैय्यर्थता कळून आली हे जाणवते.

     - रागिणी पुंडलिक

जावडेकर, सुबोध प्रभाकर