जायले, मोहन जानराव
मोहन जानराव जायले यांचा जन्म अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील अकोली जहांगीर या गावातील शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी पदवी शिक्षण कलाशाखेतून घेतले. कलाशाखेचे पदवीधर असूनही त्यांनी आपले कार्यक्षेत्र म्हणूून ‘शेती’ची निवड केली आणि घरच्या १२० एकर जमिनीवर विविध प्रयोग केले. पाण्याचा तुटवडा लक्षात घेऊन त्यांनी कमीत कमी पाण्याचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन काढण्यावर भर दिला. तसेच त्यांनी सेंद्रिय शेती करण्याचा ध्यासही घेतला. त्यांनी शेतामध्ये ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही मोहीम उत्कृष्टपणे राबवली. त्यांनी ३२ ु ३२ मीटरची १२ शेततळी स्वतःच्या शेतामध्ये तयार केली. त्यांनी २००३मध्ये आपल्या शेतात १०० मीटर लांब व १०० मीटर रुंद तलाव तयार केला. त्या तलावाची पाणी साठवण्याची क्षमता ३ कोटी लीटर इतकी झाली. या तलावामुळे उतार भागात राहणार्या शेतकर्यांच्या विहिरी व कूपनलिकांत भरपूर पाणी साठले. त्यामुळे कमी पावसाच्या गावात पाण्याची उपलब्धता मोठ्या प्रमाणात वाढली. पाण्याच्या साठवणुकीमुळे जमिनीचे नुकसान होते, हा शेतकर्यांमध्ये असणारा अपसमज त्यांनी आपल्या शेतात पाणी साठवून दूर केला.
जायले यांनी आपल्या शेतात संत्रा, केळी व पपई यांसारख्या फळझाडांची लागवड करताना तुषार सिंचन पद्धतीचा वापर केला. विदर्भामध्ये घनक्षमता पद्धतीने आंब्याची लागवड करण्याचा पहिला यशस्वी प्रयत्न जायले यांनी केला. तसेच त्यांनी ‘मुसळी’ या वनौषधी पिकाची लागवडही आपल्या शेतात केली. त्यांनी सरी वरंबा पद्धतीने भुईमुगाची लागवड करून उत्पादनात लक्षणीय वाढ करून दाखवली.
जायले यांची शेती खारपाण पट्ट्यामध्ये येत असल्यामुळे त्यांनी खारपाण पट्टा नियोजन करण्याकडे जास्त लक्ष दिले. शेतमळ्यांमध्ये प्लॅस्टिकचे लाइनिंग टाकून त्यात साठवलेले पाणी ते शेतीकरता वापरत. त्यांनी पपईच्या ‘तायवान ७८६’ या जातीच्या झाडांची लागवड केली. २००२ सालापर्यंत त्यांनी १०० एकर जमिनीमध्ये पपईच्या झाडांची विक्रमी लागवड केली. तसेच, राष्ट्रीय बागवानी संस्था, नाशिक यांच्यातर्फे आयोजित केला जाणारा भाजीपाला व बियाणे उत्पादनाचा कार्यक्रम जायले यांनी स्वतःच्या शेतावर राबवला. शेतीच्या कामांमध्ये विशेष लक्ष पुरवल्यामुळेच त्यांना फळझाडांची घनक्षमता लागवड करता आली. जायले यांनी केलेल्या प्रयोगांमुळे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. महाराष्ट्र शासनाचा उद्यानपंडित (२००३), प्रसारभारतीचा सह्याद्री कृषी सन्मान (२००८) या पुरस्कारांचे ते मानकरी ठरले. तसेच जलसंवर्धनाच्या कामासाठी २००३-२००४मध्ये त्यांना जिल्हा प्रशासनातर्फे सन्मानपत्र देण्यात आले. तसेच शास्त्रोक्त पद्धतीने फळझाडांची लागवड केल्याबद्दल डॉ. पं.दे.कृ.वि.नेही सन्मानपत्र दिले
- प्रा. पद्माकर दत्तात्रेय वांगीकर