Skip to main content
x

जगताप, जयवंत बाबूराव

           स्वातंत्र्योत्तर काळात बहुजन समाजासाठी शिक्षण सुविधा निर्माण व्हाव्यात या उद्देशाने तसेच वडील व गुरुवर्य बाबूराव जगताप यांच्या प्रेरणेने जयवंतराव (दादासाहेब) बाबूराव जगताप यांनी जनता शिक्षण संस्थेच्या रूपाने शिक्षण क्षेत्रातील मुहूर्तमेढ १७ ऑगस्ट १९५२ रोजी रोवली. पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी विद्यामंदिरच्या नावाने जेजुरी या ठिकाणी संस्थेची प्रथम शाखा सुरू केली. जनता शिक्षण संस्थेचे ब्रीदवाक्य आहे बलविद्यामुपास्व’.

जनता शिक्षण संस्थेने पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात शिक्षणाची गंगा बहुजन समाजापर्यंत पोहोचविण्याचा ध्यास घेतल्याने संस्थेचा विस्तार मुख्यत्वे ग्रामीण भाग व पुणे शहरातील उपनगरे या ठिकाणी झाला. पार्वतीबाई बाबूराव जगताप यांच्या पोटी जयवंतरावांचा जन्म पुणे येथे झाला.

त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण श्री शिवाजी मराठा शाळेतच झाले. पुण्याच्या सर परशुराम भाऊ महाविद्यालयामधून ते बी. ए. (ऑनर्स) झाले. नंतर बी. टी. झाले. शिक्षक म्हणून त्यांनी श्री शिवाजी मराठा सोसायटीहे कार्यक्षेत्र निवडले. शिवाजी मराठा प्रायमरी शिक्षक’, महाविद्यालय शिक्षक, मिडल स्कूलमध्ये मुख्याध्यापक’, गांधी ट्रेनिंग महाविद्यालयामध्ये प्राचार्य’, रात्र शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून अध्यापनाचे कार्य केले.

१९५२ मध्ये जेजुरीला शाळा सुरू केल्यानंतर १९६७ पर्यंत त्यांनी ग्रामीण भागात अनेक शाळा सुरू केल्या. उदा. वडगाव निंबाळ येथे स्वातंत्र्य मंदिर’, चाकण येथील श्री शिवाजी विद्यामंदिर’, औंधगाव येथे श्री शिवाजी विद्यामंदिर’, दापोडी येथे स्वामी विवेकानंद विद्यामंदिर’, आंबळे येथे श्री शिवाजी विद्यामंदिरइ. ठिकाणी शाळा सुरू केल्यानंतर अनेक ठिकाणी बालक मंदिर, मोफत वाचनालये, वसतिगृहे, विद्यार्थी वस्तुभांडार व सहकारी पतपेढ्या सुरू केल्या. तसेच पर्वतीरमणा येथे भाऊसाहेब हिरे यांनी सरकारकडून ६३ एकर जागा मिळवून त्यावर शिक्षणकेंद्र उभारण्याचे काम सुरू केले. त्याच इमारतीत अनेकांच्या मदतीने दादांनी कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालय सुरू केले आणि १९४९ ते १९६७ या कालावधीत हिरे विद्यालयाचा विकास घडवून आणला. नंतर ते अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे सहसचिव झाले.

आज जनता शिक्षण संस्थेच्या अठरा शाखांचा विस्तार झालेला आहे. पण ज्या काळात जयवंतरावांनी शाळा स्थापन केल्या, त्या काळात त्यांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागले. आपले अध्यापन निष्ठेने सांभाळून सुटीच्या काळात, खेडोपाडी पायी किंवा एस. टी. ने फिरणे, शाळांसाठी जागा शोधणे, स्थानिक लोकांशी चर्चा करून त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटविणे, शासकीय तरतुदीनुसार साहित्याची जुळवाजुळव करणे, कागदपत्रांचे लेखन स्वत:च करणे, पैसा उभारणे, निष्ठावान शिक्षक व मुख्याध्यापकांची नेमणूक करणे, त्यांच्या पगाराची, राहण्याची व्यवस्था करणे या गोष्टी अजिबात सोप्या नव्हत्या, पण दादासाहेबांनी ही कसरत दीर्घकाळ केली.

स्वत:चे शिक्षकपण व शाळा व्यवस्थापन काटेकोरपणे सांभाळून, त्यांनी अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेत सन १९४७ पासून १९६७ पर्यंत सभासद व सचिव पद अत्यंत कल्पकतेने व जबाबदारीने पेलले. ठिकठिकाणी अधिवेशने भरविणे व ती यशस्वीरीत्या पार पाडणे यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. परिषदेमार्फत त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या मिळवून दिल्या.

मान्य खाजगी प्राथमिक संघाचे ते कायम सभासद व सल्लागार, तसेच १९४९ - ५० मध्ये अध्यक्ष होते. त्यांनी सभासदांची व्यवस्था समिती व परीक्षा समिती नेमली. त्या समित्यांच्या माध्यमातून शिक्षक व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्पर्धा घेतल्या. सहली आयोजित केल्या. शाळाशाळांतून चांगले सिनेमे दाखविले.

वत्सला साहित्य प्रकाशन संस्थाजगताप पब्लिशिंग हाऊसस्थापन करून त्यांनी स्त्रियांसाठी भगिनीमासिक व शिक्षकांसाठी शिक्षक मासिककाढले. तसेच फायनलच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर पाक्षिके व प्रश्‍नपत्रिका संच छापून ना नफा ना तोटाया तत्त्वावर वितरित केले.

-प्रा.राजकुॅंवर ग.सोनवणे 

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].