Skip to main content
x

जिनविजय , मुनी

     ‘‘पल्या प्राचीन संस्कृतीचे संशोधन आणि उद्धार करण्याच्या कार्यात जिनविजय मुनींसारखे कट्टर धर्माचरण करणारे, त्यागी, तपस्वी विरळच आहेत. सर्वस्वी माझ्या अखत्यारीत असते तर सर्वाधिक धन ह्या कार्यासाठी देण्याची व्यवस्था मी केली असती.’’ या शब्दांमध्ये भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी १ एप्रिल १९५५ रोजी जोधपूर येथे पुरातत्त्व मंदिराचा शिलान्यास करताना जिनविजयजींच्या कार्याचा गौरव केला होता.

     जिनविजय मुनी यांचे पूर्वाश्रमीचे नाव ‘किसनसिंह’, तर टोपणनाव ‘रणमल’ होते. त्यांचे पिता परमवंशीय क्षत्रिय कुळातील ‘श्री. बिरघीसिंह’ (बडदसिंह) होते. त्यांची माता देवडावंशीय चौहाण घराण्यातील सिरोही यांची कन्या ‘राजकुंवर’ होती.

     जिनविजय यांचा जन्म भिलवाडा जिल्ह्यातील हुरडा तालुक्यातील रुपाहेली गावात झाला.

     १८५ ७च्या लढ्यात सहभागी झाले म्हणून इंग्रजांनी त्यांच्या पूर्वजांची संपत्ती जप्त केली होती. परिस्थितीमुळे त्यांना शाळेत अक्षरज्ञान घेता आले नाही. श्री यतिसिंह, गुरू मुनिदेवहंस ह्यांच्या सहवासात ते राहिले. त्यांनी जिनविजयना अक्षरओळख, धर्माचे बाळकडू दिले. अत्यंत तीव्र जिज्ञासा, कुशाग्र बुद्धी यामुळे हळूहळू त्यांनी लेणी, शिलालेख वाचण्याचे कौशल्य प्राप्त केले. गुरूंच्या घरी, मंदिरामध्ये, धर्मशाळेत, जिथे मिळेल तेथे राहून शिकण्याची जिद्द त्यांच्याकडे होती.

     प्रथम मुनिदेव यांचे शिष्य म्हणून, नंतर त्यांच्या मृत्यूनंतर खाकीबाबा शिवानंद यांच्याकडून दीक्षित किशनभैरव, जैन स्थानकवासी उपासक संघांबरोबर भ्रमण करता करता स्थानकवासी दीक्षा, शेवटी मंदिरमार्गी श्वेतांबर धर्माची दीक्षा असा त्यांचा जीवनप्रवास सुरू होता. दीक्षा घेताना मंदिरमार्गी श्वेतांबर मुनी सुंदरविजयजी यांनी त्यांना ‘जिनविजय’ हे नाव दिले. या दीक्षेनंतर त्यांच्या ज्ञानाच्या शाखा आणखी रुंदावल्या. इतिहास, संशोधन यातील त्यांची रुची परिपक्व झाली. पाटण, सुरत, बडोदा येथे जैन ग्रंथांचे अवलोकन व निरीक्षण करून त्यांना अनेक भाषांमधील अलभ्य ग्रंथांचे संशोधन, संपादन, प्रकाशन करण्याची प्रेरणा होऊ लागली. मुनीश्रींच्या अथक परिश्रमाने संपूर्ण राज्यातून प्राच्यविद्येची दुर्लभ माहिती जमा केली व बृहद् भंडार तयार केले. १९०६ ते १९१६ या काळात योग्य साधुचर्यापालन करत असताना १९१५ मध्ये पुणे येथे भांडारकर इन्स्टिट्यूट येथे कार्यरत असताना राष्ट्रीय जागृतीच्या वातावरणातील लोकमान्य टिळक, म. धोंडो केशव कर्वे यांच्या प्रभावाने ते अत्यंत प्रेरित झाले. धर्माच्या अध्ययनाबरोबरच इतर विषयांच्या अध्ययनामुळे, मनन, चिंतन वाढल्याने त्यांचा दृष्टीकोन सर्वसमावेशक झाला. स्वातंत्र्य चळवळीत भाग घेण्याच्या प्रेरणेने त्यांनी आपल्या साधुवेशातून व आचरणातून सवलत घेतली.

     १९२० साली गांधीजींनी गुजरातला ‘राष्ट्रीय विद्यापीठा’ची स्थापना केली आणि भांडारकर इन्स्टिट्यूट येथे कार्य करणारे हे पुरातत्त्ववेत्ते गुजरातला परत गेले आणि राष्ट्रीय विद्यापीठात पुरात्तत्वाचार्य झाले. येथे जर्मनीहून आलेल्या विद्वानांच्या निमंत्रणावरून ते जर्मनीला गेले. बर्लिन येथे विद्वानांबरोबर भारतीय साहित्य, दर्शन ह्या विषयांवर त्यांनी सखोल चर्चा केली. भारतीय संस्कृतीच्या प्रचार व प्रसारासाठी त्यांनी तेथे ‘हिंदुस्थान हाऊस’ची स्थापना केली. या संस्थेच्या विकासासाठी १९३०मध्ये भारतात परत येऊन त्यांनी गांधीजींची भेट घेतली.

     महात्मा गांधीजींच्या प्रभावामुळे त्यांनी मिठाच्या सत्याग्रहात भाग घेतला. तुरुंगवासामध्ये कन्हैयालाल मुन्शी यांच्याशी त्यांचा परिचय झाला, म्हणूनच ‘भारतीय विद्याभवन’ येथे सामान्य निदेशकपदी कार्य केले. रवींद्रनाथ टागोर यांच्या निमंत्रणावरून त्यांनी शांतीनिकेतन विद्यालयात जैन साहित्य विभाग सुरू करून त्याचे आचार्यपद भूषवले. कलकत्ता येथील चार-पाच वर्षांच्या वास्तव्यात ‘सिंघी जैन ग्रंथमाला’च्या अंतर्गत ७६ गुप्त लुप्त ग्रंथांचे प्रकाशन केले.

     प्रकृति अस्वास्थ्यामुळे राजस्थानला परत येऊन त्यांनी ‘राजस्थान प्राच्य विद्या प्रतिष्ठान’ (पुरातत्त्व मंदिर) येथे भारतीय साहित्यातील पन्नास महत्त्वाचे ग्रंथ प्रकाशित केले.

     चंदेरियाला १९५० साली त्यांनी ‘सर्वोदय साधना आश्रम’ची स्थापना केली. त्याच गावामध्ये ‘सर्वदेवायतन’ असे सर्व धर्माच्या देवांचे एकत्र मंदिर स्थापित केले. आपल्या जन्मगावी रुपाहेली येथे ‘महात्मा गांधी स्मृती मंदिर’ उभे केले.

     त्यांनी भारतीय विद्या, पुरातत्त्वविद्या, राजस्थान पुरातत्त्व, जैनविद्या यांच्या प्राचीन सामग्रीचे अध्ययन, शोध, प्रकाशन करण्याचे मौलिक, ऐतिहासिक कार्य केले.    

     मुनी जिनविजय यांच्या महान कार्याचा गौरव म्हणून जर्मन ओरिएन्टलद्वारा १९५२ मध्ये ‘ऑनररी सदस्य’ सन्मान त्यांना मिळाला. १९६२ साली भारतातील सन्माननीय ‘पद्मश्री’ उपाधी प्राप्त झाली. १९६३ साली भारतीय विद्याभवनचे ‘सन्माननीय सदस्य’ म्हणून त्यांची निवड झाली. जिनविजय यांचा जन्म जरी राजस्थानमधील असला, तरी त्यांचे कार्यक्षेत्र मात्र राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, बंगाल होते. तसेच बर्लिन, जर्मन येथेही ते कार्यशील होते.

       — लीना दोशी

जिनविजय , मुनी