Skip to main content
x

जळगावकर, सखाराम प्रभाकर

जळगावकर अप्पा

     मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील जळगाव या छोट्या गावी, एका भिक्षुक घराण्यात सखाराम प्रभाकर ऊर्फ अप्पासाहेब जळगावकरांचा जन्म झाला. वडिलांच्या अकाली निधनामुळे ते दोन वर्षांचे असताना आईने त्यांना गावातीलच प्रभाकरबुवांना दत्तक दिले. प्रभाकरबुवांच्या मठात जालन्याचे कीर्तनकार बाळकृष्णबुवा चिखलीकर येत असत. त्यांच्यामागे गाण्याची साथ अप्पा ९-१० वर्षांचे असताना करू लागले. जालन्याच्या शाळेत शिक्षणाचे उर्दू माध्यम असल्याने त्यांना वडिलांनी शाळेतून काढले, त्यामुळे त्यांचे शालेय शिक्षण जेमतेम पाचवीपर्यंत होऊन थांबले. मग चिखलीकरबुवांबरोबर जालन्याला येऊन अप्पा प्रथम थोडे धृपद, मग काही जलद चिजा शिकले.
तेव्हा गावातल्या मेळ्यांमध्येही अप्पा गात असत. पण पुढे आवाज फुटल्यावर हातात हार्मोनिअम आली. हार्मोनिअमचे शिक्षण अप्पांनी कुणाकडे घेतली नाही; पण सूरतालाची उपजत जाण व थोडे शिक्षण यांच्या बळावर ते कीर्तन-भजनाला साथ करू लागले. अमरावतीचे तानरस घराण्याचे गवैयेे शब्बू खाँ हे १९४४ च्या सुमारास काही काळ जालन्यास स्थायिक होते, त्यांच्याकडेही अप्पा साथ करत शिकले. भीमसेन जोशींच्या पत्नी वत्सलाबाई मुधोळकर याही तेव्हा शब्बू खाँकडे शिकत असत.
शब्बू खाँ यांनीच अप्पांना पुण्या-मुंबईसारख्या शहरांत जाण्याबद्दल प्रोत्साहन दिले. त्या दरम्यान तर्कतीर्थ महादेवशास्त्री जोशी यांची मेहुणी, उत्तम कीर्तनकार मथुताई फडके जालन्याला आल्या होत्या. त्यांच्या कीर्तनास अप्पांनी साथ केल्यावर त्या खूष झाल्या. त्यांनी अप्पांना पुण्यात जाण्याविषयी सांगून त्यांची २-३ महिन्यांची तेथे राहण्याची सोयही केली.
अप्पा जळगावकर १९४६ साली पुण्यास आले. काही काळ त्यांनी ब्रास बॅण्डमध्ये क्लॅरिओनेटवादक म्हणूनही काम केले. शब्बू खाँंचे मेहुणे रमझान खाँ तेव्हा पुण्यातल्या कोठ्यांवर सारंगी वाजवत. त्यांच्या ओळखीने अप्पांनी कोठ्यांवरील बायकांनाही साथ केली. इथेच अप्पांना मैफलीत पटकन आपला रंग जमवण्याचे तंत्र गवसले असावे. शिवाय ठुमरी-दादरा, लावणीची साथ करण्यातला ढंगदारपणाही मिळाला.
हळूहळू पुण्यातील संगीत क्षेत्राशी त्यांचा परिचय होऊ लागला. मग माणिक वर्मा, विमल वाकडे, गंगूबाई हनगल अशा कलाकारांना ते साथ करू लागले. कथक नृत्यांगना रोहिणी भाटे यांच्याकडे अप्पा नृत्याच्या साथीसाठी जाऊ लागले. पुण्यातल्या तेव्हाच्या होतकरू गायिका, हिराबाई बडोदेकरांच्या शिष्या लीला मुधोळकर यांच्याशी १९५७ साली त्यांचा विवाह
  झाला.
गायनास पोषक अशी साथ, आकर्षकपणा, वादनातील आसयुक्त सलगता, वैविध्य, लडिवाळपणा, खास करून ठुमरीतला नखरा यांमुळे त्यांची साथ अनेक कलाकारांस प्रिय होती. अनेक बुजुर्ग गायक, नृत्यकलाकारांना व तबलावादनाला नगम्याची संगत करून ते ‘रंगतदार हार्मोनिअमवादक’ म्हणून प्रसिद्ध झाले.
अप्पा जळगावकर यांनी साथसंगत केलेल्या कलाकारांत हिराबाई बडोदेकर, रोशनआरा बेगम, मोगूबाई कुर्डीकर, कुमार गंधर्व, भीमसेन जोशी, किशोरी आमोणकर, जसराज, गंगूबाई हनगल, माणिक वर्मा, बसवराज राजगुरू, वसंतराव देशपांडे, प्रभा अत्रे, परवीन सुलताना, मालिनी राजूरकर, प्रभाकर कारेकर, आरती अंकलीकर, संजीव अभ्यंकर, जयतीर्थ मेवुंडी असा मोठा कालपट आहे. अहमदजान थिरकवा, निजामुद्दिन खाँ, हबीबुद्दिन खाँ, किशन महाराज, सामताप्रसाद, अल्लारखा खाँ, झाकिर हुसैन अशा मातब्बर तबलावादकांसाठी व बिरजू महाराजांसारख्या कथक नर्तकांना त्यांनी केलेली नगम्याची साथही गाजली. अप्पांनी साथसंगतीच्या निमित्ताने देशातच नव्हे, तर परदेशांतही अनेक दौरे केले व एकल हार्मोनिअमवादनही केले.
भीमसेन जोशी यांच्याशी अप्पांच्या साथीचे सूर दीर्घ काळ जुळले. सवाई गंधर्व महोत्सवात त्यांनी एकल हार्मोनिअमवादनही सादर करून वाहवा मिळवली होती. ‘सूर गवसलेली साथ’ हे भारत गजेंद्रगडकर यांनी संपादित केलेले आत्मचरित्रवजा पुस्तक २००६ साली प्रसिद्ध झाले. अनेक अनुभवांचे व आठवणींचे भंडार यात आहे.
त्यांनी १९७० च्या सुमारास एकल हार्मोनिअमवादनास सुरुवात केली व आपली स्वत:ची अशी शैली सादर केली. ते बा.गं. आचरेकरांनी बनवलेली श्रुति-हार्मोनिअम वाजवत असत. मींडेचा आभास निर्माण करून ते गाण्याला जवळ जाणारे वादन करत. मंजूळपणा व गोडवा हा खास अप्पांच्या वादनातील स्वरविशेष आहे. त्यांना ‘संगतकार’ पुरस्कार (१९९७), ‘आय.टी.सी.’ पुरस्कार (१९९९), ‘संगीत नाटक अकादमी’ पुरस्कार (२०००), ‘महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक’ पुरस्कार (२००१), कै. विठ्ठलराव कोरगावकर स्मृतिनिमित्त पहिला ‘संवादिनी साधक’ पुरस्कार (२००३) हे सन्मान व गानवर्धन संस्थेकडून ‘स्वर-लय-रत्न’ (१९९३) ही उपाधी प्राप्त झाली होती.
अखेरीच्या काळात अर्धांगवायूच्या झटक्यामुळे त्यांची डावी बाजू निकामी झाली होती, तरीही ते भाता मारण्यासाठी शिष्यास बसवून जिद्दीने वादन करत होते. त्यांच्या पत्नीच्या नावाने ‘स्व. लीलाताई जळगावकर स्मृती पुरस्कार’ हा श्रेष्ठ हार्मोनिअमवादकांस देण्यात येतो. हार्मोनिअम या वाद्यास मैफलीत मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या अप्पा जळगावकरांचे पुणे येथे निधन झाले.

चैतन्य कुंटे

जळगावकर, सखाराम प्रभाकर