Skip to main content
x

जंगली, महाराज

जंगली महाराज

     सद्गुरू श्री जंगली महाराज यांचा जन्म साधारणपणे १८१० सालचा मानला जातो. ते बालपणापासून एकपाठी आणि अत्यंत कुशाग्र बुद्धीचे होते. पुढील काळात त्यांनी पर्शियन, उर्दू, कानडी, संस्कृत, मराठी या भाषा आणि सर्व धर्मांतल्या ग्रंथांचा अभ्यास केला. विविध गुरूंचे मार्गदर्शन घेऊन मल्लविद्या, मंत्रशास्त्र, नाथपंथीय साधना, हठयोग, राजयोग यांतही ते प्रवीण झाले. यामुळे समोर कोणत्याही जाती, धर्म, पंथाचा माणूस आला, तरी ते त्याच्या धर्मग्रंथातील वचनांचा आधार देऊन त्याला सन्मार्गाचा उपदेश करीत, उपासना सांगत व संकटमुक्तही करीत. सिद्धीच्या बळावर त्यांनी अनेक चमत्कारही करून दाखवले. पुढे सर्वसंगपरित्याग करून महाराज जनकल्याणार्थ बाहेर पडले. भिक्षाटन करताना महाराजांनी सर्व धर्मांच्या लोकांना सन्मार्गाचा उपदेश, दु:खनिवारण, तेथील मंदिरे, मशिदी वा देवस्थाने यांचा जीर्णोद्धार करणे ही कार्ये सुरू केली. यामुळे त्यांची कीर्ती महाराष्ट्रभर पसरली. दक्षिणेच्या रूपात समोर आलेल्या सर्व गोष्टी ते गरजूंना वाटून, मोठा भंडारा घालून पुढील गावी जात. या फिरस्तीत महाराजांनी जमखिंडीजवळील कुडची या गावच्या माँसाहेब दर्ग्याच्या परिसरातील सर्व देवळे, समाध्या, वृंदावने यांचा कायापालट केला. दर्शनास आलेल्या जमखिंडी व मिरज येथील संस्थानिकांस कृपांकित करून महाराजांनी शिष्य परिवारासह नरसोबाच्या वाडीस प्रयाण केले. नंतर त्यांनी आपला मुक्काम हुपरीजवळच्या कारदगा या गावी हलवला. महाराजांच्या वास्तव्याच्या ४-५ वर्षांच्या काळात ‘बंगालीबाबा’ समाधीचे नूतनीकरण, दूधगंगा नदीवरील प्रशस्त घाट व मठाचे बांधकाम यांबरोबरच जवळपासच्या छोट्या-मोठ्या देवस्थानांचा जीर्णोद्धारही केला गेला.

     इकडे कराड जवळील नेर्ले व रेठरे हरणाक्ष या गावी जाताना महाराज प्रथम नरसोबावाडीस गेले. तेथे रखमाबाई गाडगीळ आपला मुलगा धोंडो याला घेऊन दर्शनास आल्या. त्या वेळी सर्वांसमक्ष धोंडोला कुरुंदवाडच्या राजेसाहेबांच्या हाती सोपवून महाराजांकडून अनुग्रह घेऊन रखमाबाई शिष्यपरिवारात (१८६१) सामील झाल्या व महाराजांच्या समाधीपर्यंत त्यांच्या सेवेत राहिल्या. यांना भक्तमंडळी आदराने ‘आईसाहेब’ असे म्हणत. धोंडो श्रींचे आशीर्वादाने कुरुंदवाड संस्थानाचे पोलीसप्रमुख झाले.

     रेठरे व नेर्ले या गावी श्रीमहाराजांनी मठ स्थापना, भक्तिमार्गाच्या प्रसाराबरोबर अनेक पैलवान व भजनी मंडळी तयार केली. कुस्त्यांचे फडही भरविण्यास सुरुवात केली. याच रेठर्‍याचेच लावणीसम्राट श्रीधरपंत कुलकर्णी ऊर्फ पठ्ठे बापूराव ,श्रीमहाराजांस शरण आले. श्रीमहाराजांचे अनुग्रहित झाल्यावर (१८६५) पठ्ठे बापूरावांचे काव्य शृंगाराकडून भक्तिमार्गाकडे वळले. रेठर्‍याहून श्रीमहाराजांनी पुण्यास प्रस्थान केले. सुरुवातीस श्री महाराजांनी देहूस राहून धर्मशाळा, पुंडलिकाचे मंदिर व तुकोबांच्या घरापासून वैकुंठगमन स्थानापर्यंतचा रस्ता स्वत: पुढाकार घेऊन बांधला. पुण्यास महाराज १८६८ साली आले.

     या ठिकाणी घारे, शिरोळे, बहिरट, दुर्गे या घराण्यांतील अनेक पुरुष महाराजांचे कृपांकित झाले. त्यांचे वंशज आजही महाराजांनी घालून दिलेल्या प्रथेप्रमाणे श्रींची सेवा करीत आहेत. पुण्यात श्रीमहाराजांनी भांबुर्डा (आजचे शिवाजीनगर) भागातील श्री रोकडोबा मंदिरात वास्तव्य केले. श्रीमहाराज येण्याअगोदर तिथे अंधश्रद्धेचा पगडा असून नवसपूर्तीसाठी पशुबळी, बगाड (पाठीत एक हुक खोचून स्वत:ला टांगून घेणे) असे अघोरी प्रकार, रेड्यांच्या झुंजी, अश्लील तमाशा इ. चालत.

     महाराजांनी देवास शाकाहारी नैवेद्य, वीणा घेऊन अखंड हरिनाम घेणे, कुस्त्यांचे फड आणि प्रासादिक भजनी मंडळ हे पर्याय सुरू करून सर्व अनिष्ट प्रथा बंद केल्या. हे भजनी मंडळ आता सद्गुरू श्री जंगली महाराज भजनी मंडळ म्हणून ओळखले जाते. आईसाहेबांची रामावर भक्ती असल्याने पुढे त्यांनी भिक्षाटनातील पैशांतून रोकडोबा मंदिरासमोर श्रीरामपंचायतन मंदिरही बांधले. आईसाहेबांच्या भक्तीखातर श्रीमहाराज प्रत्येक वर्षी त्यांना घेऊन शिष्यपरिवारासह सज्जनगडावर जात.

     किर्लोस्कर नाटकमंडळींचे दुय्यम नट मोरोबा वाघोलीकर यांना तयारी नसताना ३१ ऑक्टोबर १८८० रोजी कारणवशात ‘शाकुंतल’ नाटकातील दुष्यंताची प्रमुख भूमिका करण्याचा प्रसंग आला. महाराजांनी त्यांना मूठभर धूप देऊन नाट्यप्रयोगापूर्वी जाळण्यास सांगितले. मोरोबांनी तसे करताच त्यांचे काम दृष्ट लागण्याइतके उत्तम वठले. तेव्हापासून नाट्यप्रयोगाअगोदर धूप जाळण्याची प्रथा महाराष्ट्रात सुरू झाली.

     पुण्यातील वास्तव्यात आळंदीचे नृसिंह सरस्वती, पुण्यातले बीडकर महाराज, जोग महाराज, लोकमान्य टिळकादी मान्यवरांबरोबर महाराजांचा सत्संग होत असे. चतुर्थ दत्तावतार श्री माणिकप्रभू तीर्थयात्रा करीत पुण्यास आले असता, महाराजांनी त्यांस काही दिवस आग्रहाने ठेवून घेतले. जगदोद्धाराचे उदंड कार्य करून चैत्र शुद्ध चतुर्दशी, ४ एप्रिल १८९० या दिवशी पुणे येथे सायंकाळी ५.३०च्या सुमारास महाराजांनी देह ठेवला. सर्व धर्मियांनी एकत्र येऊन महाराजांस समाधी दिली. पुण्यातील समाधी मंदिरासमोरील रस्त्याला श्री जंगली महाराज मार्ग असे नाव दिले गेले.

     जंगली महाराज यांचे मठ, धर्मशाळा व देवस्थाने महाराष्ट्र व इतरत्रही कार्यरत आहेत. पुण्यातील समाधिस्थानी रोज त्रिकाळ आरती, पंचपदी व प्रत्येक गुरुवार व चतुर्मासातील एकादशीस रात्री भजनाचा कार्यक्रम महाराज यांच्या काळापासून आजतागायत चालू आहे. चैत्र पाडव्यापासून चतुर्दशीपर्यंत (समाधी दिन) मोठ्या प्रमाणात उत्सव होतो. या उत्सवात महाराष्ट्रातील अनेक नामवंत प्रवचनकार, गायक, वादक, कलाकार विविध प्रकारे आपली सेवा श्री चरणी रुजू करतात.

अविनाश हळबे

जंगली, महाराज