Skip to main content
x

जोग, सूर्यकांत शंकर

       सूर्यकांत शंकर जोग यांचा जन्म अमरावती येथे झाला. वडील शंकर जोग हे १९२९ ते १९३५  या काळात सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेम्ब्लीचे सभासद होते. देशाच्या संरक्षण व प्रशासन आणि सामाजिक  क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देण्याची परंपरा जोग घराण्यात आहे. त्यांचे मामा परांजपे हे मुंबई शहराचे पोलीस उपायुक्त होते. जोग यांच्या आठ भावांपैकी दोन भाऊ  भूसेनेतून कर्नल या पदावरून निवृत्त  झाले आहेत, तर दोन भावांनी भारतीय वायुसेनेतून देशसेवा केली आहे.

        सूर्यकांत जोग यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण अमरावती येथे झाले. किंग एडवर्ड मेमोरियल शिष्यवृत्तीमधून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयीन जीवनात एन.सी.सी.मध्ये अंडर ऑफिसर आणि त्यानंतर अधिकारी म्हणून त्यांनी काम केले. एन.सी.सी.मधील या जबाबदारीतूनच पुढील काळात भारतीय पोलीस सेवेत (आय. पी. एस.) मध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण झाली.

      याच काळात क्रिकेट आणि फुटबॉल या खेळांमध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले होते. त्या काळातील चार परदेशी संघांविरुद्ध असणार्‍या कर्नल सी.के. नायडू यांच्या नेतृत्वाखालील क्रिकेट संघात त्यांची निवड झाली होती. तसेच रणजी ट्रॉफी आणि फुटबॉल संघातही त्यांची निवड झाली होती.

      नागपूर विज्ञान महाविद्यालयामधून रसायनशास्त्र या विषयात विद्यापीठात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन त्यांनी एम.एस्सी.ची पदवी घेतली. १९५३ मध्ये अखिल भारतीय नागरी सेवेच्या परीक्षेत ते देशात तिसर्‍या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आणि त्यांनी भारतीय पोलीस सेवेत जाण्याचा निर्णय घेतला.

       जोग यांची प्रथम नियुक्ती त्या वेळच्या द्विभाषिक मुंबई राज्यात करण्यात आली. त्यानंतर त्यांची बदली महाराष्ट्र राज्यात करण्यात येऊन बुलढाणा, औरंगाबाद, गोवा, मुंबई अशा विविध ठिकाणी महत्त्वाच्या पदांवर त्यांची नेमणूक करण्यात आली.

       १९६९ मध्ये झालेल्या गोवामुक्ती संग्रामातील संरक्षण दलाच्या कार्यवाहीत त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. त्यानंतर १९७० ते १९७३ या कालावधीत ते गृहमंत्रालयात सहसचिव या पदावर कार्यरत होते. त्यानंतर दोन वर्षे त्यांची नियुक्ती सीमा सुरक्षा दलामध्ये पोलीस संचालक या पदावर करण्यात आली.

       पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर १९८४ मध्ये जोग यांच्यावर दिल्लीचे पोलीस आयुक्त म्हणून महत्त्वाची कामगिरी सोपवण्यात आली. या वेळी दिल्ली येथील कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी जोग यांनी अत्यंत कौशल्याने हाताळली.

          १९८५ मध्ये सूर्यकांत जोग महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक झाले. या पदावर असताना महत्त्वपूर्ण घटना घडली. कुख्यात आंतरराष्ट्रीय गुन्हेगार चार्ल्स शोभराज दिल्ली येथील तिहार कारागृहातून आपल्या साथीदारांसह पसार झाला. जोग यांनी त्या वेळचे मुंबईचे पोलीस आयुक्त दत्तात्रेय सोमण आणि चार्ल्स शोभराज याला पूर्वी अटक करणारे पोलीस अधिकारी झेंडे यांच्या सहकार्याने चार्ल्स शोभराजला पुन्हा अटक करण्यासाठी सापळा रचला. गुन्हेगारांचा माग काढत जोग यांच्या चमूने गोव्यापर्यंत तपासजाळे विणले आणि अखेरीस या प्रयत्नांना यश येऊन चार्ल्स शोभराजला गोवा येथील ‘एल पेकेव्हा’ या हॉटेलमधून अटक करण्यात आली. आपल्या संपूर्ण कारकिर्दीतली ही अत्यंत महत्त्वाची कामगिरी आहे असे जोग मानतात. या कामगिरीबद्दल तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी त्यांचे आणि त्यांच्या चमूचे विशेष कौतुक केले.

         १९८७ मध्ये सूर्यकांत जोग महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक या पदावरून निवृत्त झाले. सध्या ते अमरावती येथे स्थायिक झाले आहेत. निवृत्तीनंतरचे जीवन हे  कमावण्यासाठी न घालवता समाजातील तरुण होतकरू मुले-मुली आणि इतरांसाठी कसे उपयोगी होईल, यासाठी सूर्यकांत जोग सातत्याने विचार आणि प्रयत्न करत असतात. १९९१ मध्ये त्यांनी अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथे एका सैनिकी शाळेची स्थापना केली. विशेष करून विदर्भातील विद्यार्थ्यांना आवश्यक अशी ही संस्था आहे. विदर्भात पाण्याचे दुर्भिक्ष ही तर नित्याचीच बाब आहे.

       जोग यांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना स्वयंशिस्त आणि नियोजनातून आपण या समस्येवर मात करू शकतो हे उदाहरणाने पटवून दिले. छपरावर पडणार्‍या पावसाच्या पाण्याची साठवण करण्याचा नवीन प्रयोग याठिकाणी शाळेच्या माध्यमातून करण्यात आला. आज या योजनेला सरकारी मान्यता मिळून ‘शिवकालीन योजना’ असे तिचे नामकरण करण्यात आले आहे. सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांच्या अंघोळीनंतर जमा होणार्‍या सांडपाण्यावर ६०-७० फळझाडांची एक बाग उभारण्यात आली आहे.

       संपूर्ण अमरावती जिल्ह्यात अशा प्रकारची जलव्यवस्थापनाची कामे करण्याचा जोग यांचा मानस आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी हा तालुका संत्र्यांसाठी प्रसिद्ध आहे. त्या ठिकाणची संत्र्यांची झाडे  पाण्याच्या अभावामुळे वाळली होती. जोग यांनी आपल्या शाळेच्या माध्यमातून येथील पाच नाल्यांवर ‘चेक डॅम’ बांधून मुबलक पाणी उपलब्ध करून दिले आहे.

       आज वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षीदेखील जोग या सामाजिक कामांमध्ये तरुणांना लाजवेल अशा उत्साहाने भाग घेतात. यांनी आपली साधी राहणी व सामाजिक कामातून निवृत्तीनंतरच्या समाजसमर्पित जीवनाचा एक वस्तुपाठच घालून दिला आहे.

        सूर्यकांत जोग यांच्या दोनही मुलांचा मृत्यू दुर्दैवाने त्यांच्या तरुण वयात झाला. त्यांचा मोठा मुलगा दीपक जोग मुंबई येथे उपायुक्त, गुन्हे अन्वषण शाखेत या पदावर असतानाच मृत्युमुखी पडला दुसरे पुत्र तर दुसरा मुलगा भारतीय वायुसेनेत फायटर पायलट या पदावर असताना, विमान अपघातात मृत्युमुखी पडला. आपल्या दोन्ही मुलांच्या स्मरणार्थ जोग यांनी दोघांच्याही नावाने ट्रस्ट निर्माण केले आहेत. या ट्रस्टच्या माध्यमातून दरवर्षी हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना त्या शिष्यवृत्त्या देण्यात येतात. तसेच मयत पोलिसांच्या दहा मुलांना दरवर्षी त्यांच्या फी आणि पुस्तकांकरिता मदत देण्यात येते. या दोन्ही ट्रस्टमधून दरवर्षी १५,००० रुपये खर्च करण्यात येतात. हा उपक्रम गेली वीस वर्षे अव्याहत चालू आहे.

        जोग यांची कन्या अंजली बॅनर्जी या अर्थशास्त्र आणि गणित या विषयात एम.ए.एम.एड. असून सध्या त्या पुणे येथील शरद पवार इंटरनॅशनल स्कूलमध्ये नोकरी करत आहेत, तर त्यांचे जावई अजय बॅनर्जी हे आर्मी ब्रिगेडियर या पदावर कार्यरत आहेत.

        अशा ह्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचे वृद्धापकाळाने निधन झाले.

- संध्या लिमये

जोग, सूर्यकांत शंकर