Skip to main content
x

जोग, विष्णुपंत

अभिनेता

 

सुप्रसिद्ध विनोदी लेखक चिं.वि. जोशी यांनी चिमणराव जोशी व गुंड्याभाऊ दांडेकर या व्यक्तिरेखा आपल्या लेखणीद्वारे अमर केल्या. त्या रजतपटावर आणल्या मा. विनायक यांनी. १९४० साली त्यांनी लग्न पहावं करूनआणि १९४२ साली सरकारी पाहुणेहा चित्रपट सादर केला. त्यामध्ये दामुअण्णा मालवणकर यांनी चिमणरावांची भूमिका केली होती, तर गुंड्याभाऊच्या भूमिकेत विष्णुपंत जोग चमकले होते. चिं.वि. जोशी यांच्या व्यक्तिरेखांना रजतपटाद्वारे अमरत्व प्राप्त करून दिले ते दामूअण्णा मालवणकर आणि विष्णुपंत जोग यांनी. त्या दोघांनी सादर केलेल्या भूमिका गाजल्या पुढील काळात दामुअण्णा म्हणजे चिमणराव आणि विष्णुपंत जोग म्हणजे गुंड्याभाऊ, हे समीकरणच होऊन बसले.

विष्णुपंत जोग यांचा जन्म मध्य प्रदेशातील विलासपूर येथे झाला. त्यांचे वडील रेल्वेमध्ये नोकरी करीत. नागपूर येथे त्यांची बदली झाल्यावर विष्णुपंत जोग यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण नागपूर येथेच झाले. पण महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट सोडून देऊन ते द्रव्यार्जनासाठी कामाच्या शोधाला लागले.

जोग यांचे काका बाळाभाऊ हे नाटकात उत्तम स्त्रीपार्ट करीत. तसेच त्यांचे थोरले बंधू नाना जोग हे उत्तम सारंगीवादक होते. त्यांनी नाटकेही लिहिली होती. त्यामुळे जोग यांच्या घरी गाण्यांच्या मैफली होत. एकदा त्यांच्या घरी दीनानाथ मंगेशकर आले होते. विष्णुपंत जोग यांचा आवाज मर्दानी, पेदार आणि धारदार असल्यामुळे दीनानाथांनी त्यांना आपल्या बलवंत संगीत मंडळीत बोलावून घेतले आणि रणदुंदुभीया नाटकात किरकोळ भूमिका दिली. ते त्यांचे रंगभूमीवरचे पहिले पदार्पण. हे साल होते अंदाजे १९२८-२९.

मा. दीनानाथ यांच्या नाटक कंपनीत जोग यांना हवा तसा वाव मिळेना आणि मतभेद झाले. त्यामुळे त्यांनी ती कंपनी सोडली व हिराबाई बडोदेकर यांच्या नूतन संगीत मंडळीत गेले. तिथे हिराबाई यांनी त्यांना शास्त्रोक्त गाणे शिकवण्याचा प्रयत्न केला पण त्यांना ते जमले नाही. मात्र संशयकल्लोळ’, ‘सौभद्रवगैरे नाटकात भूमिका मिळाल्या. पण नूतन संगीत मंडळीमध्येही मतभेद झाले, तेव्हा जोग सोहराब मोदी यांच्या आर्यसुबोध नाटक मंडळीत दाखल झाले व तिथे त्यांनी भालजी पेंढारकर लिखित आसुरी लालसाया नाटकात भूमिका केली. सोहराब मोदी यांच्या कंपनीत हिंदी वातावरण होते. ते जोगांना रुचेना. तेव्हा ती कंपनी सोडून पुन्हा ते हिराबाई बडोदेकर यांच्या कंपनीत गेले व तिथे पुन्हा काही नवी-जुनी नाटके केली. पण तिथे पुन्हा बिनसले, तेव्हा नवप्रभात नाटक कंपनीत जाऊन त्यांनी अनेक हिंदी-उर्दू नाटकात कामे केली.

१९३५ सालापर्यंत विष्णुपंत जोग नाटकातून छोट्या मोठ्या भूमिका करीत व शास्त्रशुद्ध पद्धतीने गाणे शिकले नसूनही नाट्यगीते म्हणत व त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असे. या काळात चित्रपटांचा जमाना चांगला स्थिरावत चालला होता. विष्णुपंतांचे मेहुणे नटवर्य नानासाहेब फाटक. ते चित्रपटसृष्टीत शिरले होते. त्यांनीच विष्णुपंत जोग यांना आग्रहाने कोल्हापूर येथे बोलावून घेतले व शालिनी सिनेटोनच्या उषा’, ‘प्रतिभा’, ‘सावकारी पाशया चित्रपटांत छोट्या छोट्या भूमिका मिळवून दिल्या.

बाबूराव पेंटर यांनी दिग्दर्शित केलेल्या शालिनी सिनेटोनमधील चित्रपटांतील विष्णुपतांच्या भूमिका मा. विनायक यांच्या पाहण्यात आल्या व त्यांनी विष्णुपंत जोग यांना ब्रम्हचारी’ (१९३८) या चित्रपटात चकोरची भूमिका करण्यासाठी बोलावून घेतले व जोग यांच्या जीवनात आणखी एक नवा अध्याय सुरू झाला. ब्रम्हचारीया चित्रपटातील त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या मनात चांगलीच रुजली. त्यांचे गाणेही एकदम उचलून धरले गेले. त्यामुळे विनायक यांनी जोग यांना ब्रँडीची बाटली’, ‘सुखाचा शोधअर्धांगीया हिंदी/मराठी चित्रपटात विनोदी भूमिका दिल्या. पण लग्न पहावं करूनया १९४० साली प्रदर्शित झालेल्या जोग यांच्या गुंड्याभाऊ दांडेकर या भूमिकेने त्यांना लोकप्रियतेच्या उच्चांकावर नेऊन बसवले. त्यांच्या सर्व भूमिकांना गाण्याची जोड असायचीच. त्यानंतर विनायकांनी जोग यांना अमृत’, ‘संगमपहिली मंगळागौरया चित्रपटात भूमिका दिल्या व त्यानंतर पुन्हा एकदा चिमणराव व गुंड्याभाऊ यांच्या प्रमुख भूमिका असलेला सरकारी पाहुणेहा  चित्रपट पडद्यावर आणला. लग्न पहावं करूनया चित्रपटाप्रमाणे सरकारी पाहुणेहा चित्रपटही खूपच गाजला आणि गुंड्याभाऊ म्हणजे विष्णुपंत जोग हे समीकरण होऊन बसले.

विष्णुपंत जोग यांचा अभिनय आणि गाणे यांवर मा. विनायक एकदम खूश होते. १९४३ साली प्रदर्शित झालेल्या गजाभाऊया एकमेव चित्रपटात त्यांनी नायकाची भूमिका केली होती. त्यानंतर मा. विनायक यांच्या अनेक हिंदी व मराठी बोलपटांत त्यांनी विविध प्रकारच्या विनोदी भूमिका सजवल्या. १९४७ साली मा. विनायक यांचे निधन झाल्यावर त्यांनी जय मल्हार’, ‘जिवाचा सखा’, ‘देव पावलावगैरे चित्रपटात महत्त्वपूर्व भूमिका केल्या व गाणीही म्हटली. त्यानंतर ते चरित्र भूमिकांकडे वळले व आपले लक्ष त्यांनी मराठी चित्रपटांपुरतेच मर्यादित ठेवले.

विष्णुपंत जोग यांनी जवळजवळ ७५ हिंदी/मराठी चित्रपटांत भूमिका केल्या. १९७५ साली प्रदर्शित झालेला घर गंगेच्या काठीया चित्रपटात छोटीशी भूमिका करून त्यांनी चित्रसंन्यास घेतला. त्यांची कर्मभूमी कोल्हापूर हीच होती. चित्रसंन्यास घेतल्यानंतर ते पुणे येथे निवृत्तीचे जीवन जगत होते.

विष्णुपंत जोग यांच्या ऐन उमेदवारीच्या काळात पारितोषिके नव्हतीच. पण १९८० साली अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांचा अखिल भारतीय नाट्यपरिषदेतर्फे भव्य सत्कार करण्यात आला होता. ज्येष्ठ कलाकार या नात्याने भारतीय चित्रपटांना ७५ वर्षे पूर्ण झाली तेव्हा त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले होते. त्यांचा वृद्धापकाळामुळे पुणे येथे मृत्यू झाला.

जोग यांनी गुंड्याभाऊ तर अमर केलाच, त्याचबरोबर त्यांच्या गाण्यांची खुमारी प्रेक्षकांना चटका लावून जात असे. सरकारी पाहुणेमधला त्यांनी गायलेला तराणा कोण विसरेल!

 

संदर्भ :
१) खांडगे मंदा, ‘मी गुंड्याभाऊ’, प्रतिमा प्रकाशन, पुणे; १९९४.

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].