Skip to main content
x

जोगळेकर, अर्चना अरुण

    र्चना जोगळेकर यांची आई आशा जोगळेकर उत्तम कथ्थक नृत्यकलाकार असल्याने अर्चना यांच्या बालपणापासून त्यांना घरातच नृत्याचे धडे मिळाले. एकीकडे नृत्यकला आत्मसात करतानाच त्यांनी उच्च शिक्षणाकडेही कायम लक्ष ठेवले. त्यांनी  बी.कॉम., एल.एलबी. केल्यावर वकील म्हणून हळूहळू व्यवसायही सुरू केला. पण वकिलीपेक्षा अभिनय व नृत्य या कलांकडे त्यांचा जास्त ओढा होता. कलेच्या क्षेत्रातच त्यांनी भरपूर प्रगती केली. शिवाजी मंदिर क्रीडा विभागाच्या खुल्या एकपात्री स्पर्धेत अभिनयाचे पहिले पारितोषिक पटकावल्याने त्यांना ‘उघडले स्वर्गाचे दार’ या नाटकात काम करण्याची संधी मिळाली. ‘मुक्ता’, ‘कळत-नकळत’ अशा काही मराठी नाटकांतून भूमिका साकारतानाच दिग्दर्शक व्ही.के. नाईक यांनी ‘खिचडी’मध्ये आपले पुत्र शेखर यांची नायिका म्हणून त्यांना संधी दिली. या चित्रपटात नृत्याला वाव असल्याने अर्चना सरस ठरल्या.

     त्यानंतर ‘अर्धांगी’ (दिग्दर्शक - राजदत्त), ‘रंगत संगत’ (दिग्दर्शक - गिरीश घाणेकर), ‘निवडुंग’ (दिग्दर्शक - महेश सातोस्कर), ‘एकापेक्षा एक’ (दिग्दर्शक - सचिन), ‘अनपेक्षित’ (दिग्दर्शक - संजीव नाईक) अशा मराठी चित्रपटांतून भूमिका साकारताना त्यांना मराठीतील मान्यवर दिग्दर्शकांकडे काम करायला मिळाले. यातून त्यांचे व्यक्तिमत्त्व खुलले.

      अर्चना जोगळेकर यांनी व.पु. काळे यांच्या कथांवर आधारित ‘अवघाची संसार’ या मालिकेच्या कथा-पटकथा-संवादलेखन व दिग्दर्शन या साऱ्यांची जबाबदारी स्वीकारली. नायिका म्हणून त्यांची कारकिर्द खुलत असताना त्यांनी अशी आव्हाने पेलणे त्या वेळी खूप विशेष मानले गेले. अर्चना यांनी ‘राऊ’ ही मालिका व ‘निवडुंग’ चित्रपट यांचेही नृत्यदिग्दर्शन केले. ‘चुनौती’ या मालिकेपासून अर्चना यांनी हिंदीत पाऊल टाकले. ‘साम्राज्य’ या मालिकेचे कथा-पटकथा-संवादलेखन व दिग्दर्शन या जबाबदाऱ्या त्यांनी पेलल्या.

      ‘संसार’, ‘बिहू बादशाह’ अशा काही हिंदी चित्रपटांतून भूमिका साकारतानाच अर्चना जोगळेकर यांना दिलीप शंकर दिग्दर्शित ‘आतंक ही आतंक’ या चित्रपटात अमीर खान व रजनीकांत या दोन कलाकारांसोबत अभिनय करण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्या ‘पुना चोढोई’ (बंगाली), ‘स्त्री’ (ओरिसा), ‘मोहमूळ’ (तमिळ) अशा काही प्रादेशिक चित्रपटांतूनही चमकल्या. त्यांनी ‘गणपती अथर्वशीर्ष’, ‘अर्धनारीनटेश्वर’, ‘विश्वविनायका’ अशा कार्यक्रमांचे नृत्यदिग्दर्शनही यशस्वीपणे केले.

      अमेरिकेतील न्यू जर्सी येथील डॉ. निर्मल मुळ्ये यांच्याशी १९९९ मध्ये विवाह केल्यावर अर्चना जोगळेकर न्यू जर्सी येथे राहायला गेल्या. येथील कलाक्षेत्रावर त्यांचा ठसा उमटला आहे.

- दिलीप ठाकूर

जोगळेकर, अर्चना अरुण