Skip to main content
x

जोगळेकर, अरविंद मोरेश्वर

           रविंद मोरेश्वर जोगळेकर यांचा जन्म  कानपूर येथे झाला. त्यांचे वडील हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये चीफ इंजिनिअर होते, तर आई गृहिणी होती. त्यांना दोन भाऊ व दोन बहिणी होत्या. कुटुंबातील त्यांचे टोपणनाव दाजीहोते. ते अभ्यासात हुशार व मनमिळाऊ होते. त्यांचे इयत्ता चौथीपर्यंतचे शालेय शिक्षण मुंबईतील गिरगावात विल्सन हायस्कूलमध्ये झाले. शाळेतल्या बर्‍याच मुलांचा कल सैन्यात जाण्याचा होता त्यामुळे अरविंद जोगळेकर यांनीही सैन्यात जाण्याचे ठरविले.

त्यांचे डेहराडून येथील राष्ट्रीय सैनिकी प्रबोधिनीमधून (आय.एम.ए.) शिक्षण झाले आणि ते पुण्यात खडकी येथील बॉम्बे सॅपर्समध्ये प्रशिक्षणासाठी दाखल झाले. तेथून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी अनेक पदव्युत्तर अभ्यासक्रम केले. त्यांना बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रूपमध्ये पहिली नियुक्ती मिळाली. १९५४मध्ये त्यांचे बदली पंजाबमध्ये संग्रुर येथे झाली. त्यानंतर त्यांना इंग्लंडमध्ये बॉम्ब निकामी करण्याच्या प्रशिक्षणासाठी पाठविले गेले. १९५५ ते १९६० या काळात ते पुण्यात सैनिकी अभियांत्रिकी महाविद्यालयात (सी.एम.ई.- कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग) प्रशिक्षक होते. नंतर काही काळ पूंछमधील भारत-पाक सीमेवर ते तैनात होते. त्यानंतर त्यांना तामीळनाडूमध्ये वेलिंग्टन येथील स्टाफ कॉलेजमध्ये विशेष प्रशिक्षण मिळालेे. पुढे ते गोव्यात काही काळ  कार्यरत होते. नंतर लगेचच त्यांना आफ्रिकेत काँगो येथे संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतिसेनेच्या कार्यासाठी तेरा महिन्यांसाठी पाठविण्यात आले. १९६३ पासून काही काळ ते एका रेजिमेंटमध्ये भारताच्या पूर्व सीमेवर  कार्यरत होते. त्यानंतर त्यांची नियुक्ती पुण्यात बॉम्बे सॅपर्सचे कमांडट म्हणून झाली. १९७१च्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात त्यांचा सहभाग होता.

त्यानंतर जोगळेकर यांनी दिल्ली येथे राष्ट्रीय रक्षा महाविद्यालयात प्रशिक्षण प्राप्त केले. या प्रशिक्षणानंतर ते आसामात तेजपूर येथे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये दोन वर्षे कार्यरत होते. त्यानंतर त्यांची दिल्ली येथे सेना मुख्यालयात नियुक्ती झाली. निवृत्त होताना ते पुण्यात भूसेनेच्या दक्षिण विभागाचे मुख्य अभियंता म्हणून कार्यरत होते.

अभियंता म्हणून त्यांचे काम सैन्याला लागणार्‍या पुलांचे बांधकाम, त्यावर देखरेख, तसेच सुरुंग पेरले जाऊ शकतील अशा भूभागांची टेहळणी आणि सुरुंग निकामी करणे आदी स्वरूपाचे होते.

जानेवारी १९८४मध्ये ते निवृत्त झाले. त्याच वेळी त्यांना परमविशिष्ट सेवा पदकप्रदान करण्यात आले. निवृत्त झाल्यानंतर गोल्फ खेळणे, पोस्टाची तिकिटे जमा करणे हे छंद त्यांनी जोपासले. त्यांचा मित्रपरिवार  मोठा होता.ब्राँकोन्युमोनियाने त्यांचे निधन झाले. मेजर जनरल जोगळेकर यांचा मुलगा व्यापारी नौदलात आहे.

- रूपाली गोवंडे

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].