Skip to main content
x

जोगळेकर, जयवंत दत्तात्रेय

     १९९८ मध्ये जयवंत दत्तात्रेय जोगळेकर यांना स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकाने एक पुरस्कार देऊन सन्मानित केले. या प्रसंगी महाराष्ट्र टाइम्सचे तत्कालीन संपादक गोविंदराव तळवलकर विशेषत्वाने उपस्थित होते. तळवलकर म्हणाले की ‘‘ज.द. जोगळेकर म्हणजे एक व्यासंगी विद्वान, कधीही मदतीला धावून येणारा मित्र, लिखाणाला पूर्णता आणण्याकरिता भरपूर कष्ट उपसणारा एक जिद्दी लेखक व चालता-बोलता संदर्भ ग्रंथ आहे.’’ तळवलकर पुढे म्हणतात, ‘‘आम्हा दोघांत वैचारिक मतभेद असले, तरी ज.द. जोगळेकर यांच्यातील वरील गुणांमुळे आमच्या दोन दशकांहून अधिक काळच्या मैत्रीत कधीच व्यत्यय आला नाही. उलट ज.द. जोगळेकर यांच्यासारखा अष्टपैलू गृहस्थ आपला मित्र आहे, याचा आपल्याला अभिमान वाटतो.’’ एके काळी गोविंद तळवलकर, विद्याधर गोखले, दि.वि. गोखले व ज.द. यांच्या बौद्धिक मैत्रीची कुतूहलाने चर्चा होत असे. तळवलकरांनी ज.दं.विषयी काढलेले उद्गार त्यांच्या कर्तृत्वाची व वैचारिक उंचीची साक्ष पटवून देतात.

     ज.द. जोगळेकर हे ज्येष्ठ सावरकरवादी चिंतक व भारतीय राष्ट्रवादाचे गाढे अभ्यासक व एक विलक्षण समीक्षक म्हणून सर्वांना परिचित होते. अनेक वर्षे त्यांनी राष्ट्रीय विचारांची कास धरून, वैचारिक क्षेत्रात प्रदीर्घ काळ लेखन केले. जयवंत दत्तात्रेय जोगळेकरांचा जन्म मुंंबईत चिखलवाडीत झाला. जयवंतराव केवळ सहा महिन्यांचे असताना वडिलांनी त्यांना बडोद्यास नेले. त्या काळी हिंदुस्थानात सयाजीराव गायकवाडांच्या बडोदे संस्थानाचा एक लौकिक होता. अशा प्रगतिशील संस्थानाच्या शिक्षण खात्यात जयवंतरावांच्या वडिलांनी नोकरी मिळवली व ते तिथेच स्थायिक झाले.

     जयवंतरावांचे शालेय शिक्षण बडोद्यात झाले. शाळेत असताना अभ्यासापेक्षा, खेळ व अवांतर वाचनाकडे त्यांचा अधिक ओढा असावयाचा. लहानपणापासून स्वतंत्रपणे वागण्याची व विचार करण्याची सवय त्यांना होती. याचा परिणाम असा झाला की, पुढील काळात जोगळेकर हे एक स्वतंत्र, प्रतिभाशाली विचारवंत बनू शकले.

     चरित्र वाचनाची आवड त्यांना शालेय जीवनातच लागली. शिवाजी, नेपोलिअन, बाजीराव, सीझर यांची चरित्रे सुरुवातीस त्यांनी वाचली. जोगळेकर पुढील शिक्षणासाठी पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात दाखल झाले. त्यांचा वाचनाचा नित्य परिपाठ इथेही चालू राहिला. अ‍ॅबटचा नेपोलियन, गॅरिबाल्डी, डीव्हॅलेरा, मॅझिनी इ. चरित्रे त्यांनी त्या काळात वाचली. फर्ग्युसनमध्ये असतांना युनिव्हर्सिटी ट्रेनिंग कोअरमध्ये ते दाखल झाले. परेडचा भत्ता म्हणून त्या वेळी दर सहा महिन्यांनी पंधरा रुपये मिळत.  जयवंतरावांनी ‘माईन काम्फ’ हे हिटलरचे आत्मचरित्र विकत घेण्यासाठी या पहिल्या हप्त्याचा उपयोग केला होता. त्यांच्या वाचनप्रेमाचा यापेक्षा उत्तम दाखला तो कोणता? बुद्धीच्या विकासाला वाचनाने हातभार लागतो याची प्रचिती जयवंतरावांना महाविद्यालयीन जीवनात आली. अनेक विषयांचा अभ्यास करण्याच्या त्यांच्या इच्छेचा पाया बहुधा त्या वेळी घातला गेला. १९३८ च्या उत्तरार्धात द्वितीय जागतिक महायुद्धाचे ढग जमू लागले होते. महायुद्धाविषयी उत्सुकता वाढीस लागल्याने जोगळेकरांनी चर्चिल, रुझवेल्ट, हिटलर या नेत्यांविषयी वाचलेच, त्या शिवाय वेव्हेल, ऑकिन्लेक, माँटगॉमारी, मॅक आर्थर, मार्शल, रुडस्टेंड, रोेमेल इ. देशोदेशीच्या सेनानींच्या चरित्रांचाही त्यांनी तितक्याच जिज्ञासेने अभ्यास केला. यातूनच पुढे ‘भारतीय युद्धशास्त्राची उपेक्षा’ हा ग्रंथ त्यांनी लिहिला.

     तरुण वयात माणसाचा स्वभाव थोडा धाडसी असतो. जयवंतरावही यास अपवाद नव्हते. १९५२ मध्ये खिशात दमडी नसताना मित्रांकडून उसने पैसे घेऊन त्यांनी युरोपचा दौरा केला. हे त्यांच्या दृष्टीने जीवनातील एक अविवेकी धाडस होते. लंडनमध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय कायद्याचा वर्षभराचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यांनी याच वास्तव्यात वृत्तपत्रांना लेख लिहून पाठवण्यास सुरुवात केली. एका अर्थाने पुढील काळात त्यांच्या हातून झालेल्या वृत्तपत्रीय लिखाणाचा श्रीगणेशा होता.

     भारतात परत आल्यानंतर डोक्यावर कर्जाचा आर्थिक बोजा असल्यामुळे जयवंतरावांनी नोकरी शोधण्यास प्रारंभ केला. बडोद्यात असताना काही काळ त्यांनी वकिली केली. याच काळात हिंदू महासभेचे कार्यही त्यांनी नेटाने केले. दि. ३ मे १९५७ रोजी मुंबईत बेस्टमध्ये त्यांनी नोकरीस सुरुवात केली. जनसंपर्क अधिकारी म्हणून त्यांनी तब्बल २१ वर्षे बेस्टमध्ये काम केले. नोकरीत असतानाही ज.दं.नी  लेखन, वाचन, जग प्रवास यासाठी त्यांच्या रजांचा उपयोग केला, हे त्यांचे आगळेवेगळे वैशिष्ट्यच!

     त्यांच्या या यशस्वी जीवन प्रवासात त्यांच्या पत्नी स्व. डॉ. शोभा जोगळेकर यांनी जयवंतरावांना लिखाणासाठी पूर्ण स्वातंत्र दिले, इतकेच नव्हे, तर मानसिक आधाराबरोबर आर्थिक पाठबळही दिले.

     राष्ट्रवादाविषयी मनात असलेली स्वच्छ धारणा व त्यावर असलेली अपरंपार निष्ठा हा जोगळेकरांचा एक विशेष. जयवंतरावांच्या जीवनात स्वा. सावरकरांना अनन्यसाधारण स्थान आहे. सावरकरांच्या बुद्धिवादाचा त्यांच्यावर पगडा आहे. पुण्यातील वास्तव्यात सावरकरांची भाषणे, सभा, चर्चा जयवंतरावांना प्रत्यक्ष ऐकावयास मिळाल्या. १९३८ मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पुण्यात लाला हरदयाळ यांच्यावर जे भाषण केले, त्या भाषणाने जयवंतराव अत्यंत प्रभावित झाले व तेव्हापासून ते सावरकरवादी झाले. मात्र भावनेच्या भरात ते सावरकरवादी झाले नाहीत, तर घरातील वातावरण, बुद्धीला पटलेले सावरकरांचे विचार यामुळे ते सावरकरांचे अनुयायी झाले. टिळक, केळकर, सावरकर यांच्या साहित्याबरोबरच शॉ, वेल्स, रसेल यांचे साहित्य व युरोपीय वैचारिक साहित्य यामुळे ‘रॅशनल’ विचार करण्यास आपण शिकलो, असे जोगळेकर सांगत. अचाट स्मरणशक्ती, प्रशासकीय निपुणता, हजरजबाबीपणा, स्पष्टवक्तेपणा आणि मिश्कीलता हे ज.दं.चे आणखी काही स्वभाव विशेष!

     ज.द. जोगळेकर म्हणजे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घटनांकडे राष्ट्रवादाच्या संदर्भात बघणारा थोर विचारवंत आहे. त्यांच्या चिंतनाला आधुनिक काळातील संदर्भाची परिभाषा असते.

     युरोपमध्ये गेल्या चार-पाचशे वर्षात ज्या घटना घडल्या, त्यांच्याशी संबंधित जयवंतरावांचे बहुतांश लिखाण राहिले आहे. या काळात युरोपमध्ये आधुनिकतेचे अनेक प्रवाह निर्माण झाले. त्यातील आधुनिक राष्ट्रनिर्मितीच्या प्रवाहासंदर्भात जयवंतरावांच्या इतके सातत्याने लिखाण मराठीत तरी कोणीही केलेले नाही. सांप्रदायिक वर्चस्वापासून आपली मुक्ती करून घेऊन ऐहिक ज्ञानाच्या बळावर युरोपमध्ये राष्ट्रनिर्मितीची प्रक्रिया कशी घडली, हे स्पष्ट करण्यासाठी त्यांनी फ्रान्सचा रिशेल्यू आणि  तालेराँ, इटलीतील काहूर,जर्मनीचा बिस्मार्क, हंगेरीचा कोसूथ, अमेरिकेचा जेफर्सन, तुर्कस्थानचा केमाल पाशा आदींच्या राष्ट्र उभारणीच्या कार्याचे महत्त्व सांगणारा ‘निधर्मी राष्ट्रवादाचे शिल्पकार’ असा ग्रंथ लिहिला. राष्ट्रनिर्मितीची प्रक्रिया जटिल असते, अनेक हितसंबंधांना राष्ट्रहिताशी जोडून ती करावी लागते याची माहिती देण्याकरिता ही उदाहरणे त्यांनी अभ्यासकांपुढे ठेवली.

     युरोप जेव्हा चर्चच्या सांप्रदायिक सत्तेच्या अधीन होता, तेव्हा तिथे अंधारयुग होते व जसजसा युरोपला ग्रीक बुद्धिवादाचा व ऐहिक ज्ञानशाखांचा परिचय झाला, तेव्हा युरोपमध्ये पुनरुत्थानाचे पर्व सुरू झाले. ज्या अरब देशांकडून युरोपला हा ज्ञानलाभ झाला, त्या अरबस्थानने जेव्हा या ऐहिक ज्ञानापेक्षा इस्लामी सांप्रदायिक वर्चस्वाला मान्यता दिली, तेव्हापासून अरबस्थानचे बौद्धिक मागासलेपण सुरू झाले. सांप्रदायिक विचारांचा प्रभाव, राष्ट्रवाद व आधुनिकता यांच्या परस्पर संबंधांचा एवढा मूलगामी वेध मराठीत तरी क्वचितच कोणी घेतली असेल. त्यामुळे या संबंधात जगभरात घडणाऱ्या घटनांवर त्यांचे चौफेर लक्ष असे व त्या घटना ते लगेच वाचकापुढे ठेवीत. ‘युगप्रवर्तनाच्या उंबरठ्यावरचे अरब जग’ हे मध्यपूर्व देशांतील घडामोडींवर त्यांचे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे.

     ज.द. हे प्रागतिक विचारांचे होते. भारतीय इतिहासाकडे डोळसपणे बघण्याची त्यांची दृष्टी होती. म्हणूनच त्यांनी भारतात युद्धशास्त्राची उपेक्षा कशी झाली हे सांगणारे पुस्तक लिहिले. भारताच्या इतिहासाला निर्णायक वळण देणाऱ्या अलेक्झांडर व पोरस, पृथ्वीराज चौहान व महंमद घोरी, राणा संग व बाबर, विजयनगरचे राक्षस तागडी येथील रामराया विरुद्ध दक्षिणेतील सुलतान, सदाशिवरावभाऊ व अब्दाली यांचे पानिपत आणि दौलतराव शिंदे व वेलस्ली अशा सहा निवडक लढायांचे विश्लेषण केले. या सर्व युद्धात हत्तीदळाचा हल्ल्यासाठी वापर करणे, घोडदळाच्या गतिमान युद्धांशी परिचय नसणे, कमी दर्जाची शस्त्रास्त्रे, राखीव सैन्यदल नसणे आदी त्याच-त्याच चुका या सहाही युद्धात कशा केल्या गेल्या, हे त्यांनी अधोरेखित केले. युद्धशास्त्राचा शास्त्रीय अभ्यास न केल्याने असे घडले हे त्यांचे त्यावरील अभ्यासपूर्ण प्रतिपादन.

     ज.दं.च्या वडिलांनी लिहिलेली चार पिढ्यांची हकिकत ज.दं.नी अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या आत्मचरित्रात दिली आहे. त्यात, त्यांच्या पणजीने घरात कर्ता पुरुष कोणी नसल्याने सगळा कारभार हाती घेऊन दूर-दूर असणाऱ्या शेतांकडे जाऊन आणि उत्पन्न घेऊन मोठ्या कुटुंबाचा संसार चालवला, याची माहिती आहे. तसेच त्यांचे आजोबा इंग्रजी शिक्षण नसूनही सामाजिक कार्यात भाग घेत असत. त्यामुळे ते काप दापोलीच्या नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. पण पुढे मुलाच्या शिक्षणासाठी त्यांनी मुंबईस जाण्याचे ठरवले. त्यांनी अध्यक्षपदाचे त्यागपत्र दिले, तेव्हा त्या वेळचा इंग्रज कलेक्टर त्यांना म्हणाला, ‘‘जोगळेकर, तू मुंबईला कशाला जात आहेस? मी तुला रावसाहेब पदवी द्यावी अशी सरकारकडे शिफारस करीत आहे.’’ परंतु त्यांच्या आजोबांनी रावसाहेब पदवीचा मोह सोडला व मुलांच्या उच्च शिक्षणासाठी ते मुंबईला निघून आले.

     कर्तृत्ववान पणजी नि पदवीचा मोह सोडणारे आजोबा, अशी परंपरा असलेले जोगळेकर सहजतेने वीर सावरकरांचे पुढील वाक्य नेहमी सांगत, ‘‘इंद्रपद जरी माझ्याकडे येत असले, तरी पहिला अहिंदू म्हणून जगण्यापेक्षा शेवटचा हिंदू म्हणून मी मरण पत्करीन.’’ मी राष्ट्रवादाचा अभ्यासक आहे आणि सावरकर विचारांचा प्रचारक आहे, अशी जोगळेकरांची भूमिका होती. जोगळेकरांनी राष्ट्रवादावर जितके साहित्य लिहिले, ते पाहिल्यावर कोणीही म्हणेल की त्यांनी केलेले स्वतःचे वर्णन यथार्थ आहे.

     लोकसत्तेेचे दिवंगत संपादक व नाटककार विद्याधर गोखले हेही ज.दं.चे एक स्नेही होते. ज.दं.नी ‘सावरकर : एक वादळी जीवन’ हे पुस्तक लिहिले, त्या वेळी गोखले म्हणाले की, ‘‘जणू गगनदीप हे झळकतात मोजू किती? स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या कर्तृत्वसंपन्न महापुरुषाच्या बहुरंगी जीवनाकडे पाहताना आपली अशीच काहीशी स्थिती होते. महाभारतासारखेच त्यांचे चरित्र, त्यातील प्रत्येक पर्व रसोत्कट आणि नानाविध घटनांनी, विचारांनी खच्चून भरलेले!... असे हे चरित्र अवघ्या २२५ पानांत कोणतीही उल्लेखनीय गोष्ट न वगळता साधार, सप्रमाण कथन करणे आणि या चरित्राला अथपासून इथपर्यंत उजाळा देणारे लोकोत्तर चरित्र पानोपानी प्रकट करणे हे सोपे काम नव्हे. आमचे स्नेही आणि लोकसत्तेचे एक धुरंधर लेखक श्री. ज.द. जोगळेकर यांनी हे उत्तम प्रकारे केले आहे.’’

     जयवंतरावांना त्यांच्या वैचारिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल तब्बल १७ पुरस्कार प्राप्त झाले. ‘युद्धशास्त्राची उपेक्षा’, ‘साम्यवादी देशातील फेरफटका’ या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळाले आहेत. स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक ( दादर) राष्ट्रीय  विचार प्रबोधन परिषद (औरंगाबाद) या संस्थांनी त्यांचा गौरव केला आहे, तर धर्माचार्य ब्रह्मचारी विश्वनाथजी पुरस्कार, ब.ल. वष्ट पुरस्कार हे त्यांना प्राप्त झालेले काही प्रमुख पुरस्कार आहेत.

     ज.द. जोगळेकर शरीराने थकले होते, अनेक व्याधींनी ग्रस्त होते, तरीसुद्धा लेखन व वाचनाबद्दलची त्यांची तळमळ दिसून येत होती. भारतीय युवकांमध्ये वाचन संस्कृतीची जोपासना झाली पाहिजे, असे ते युवा लेखकांना आवाहन करीत. परंतु त्यासाठी भारताचा व जागतिक इतिहास, जागतिक युद्धे, क्रांत्या, युद्धशास्त्र हे विषय, बाजारात नवनवीन येणारी इंग्रजी भाषेतील पुस्तके, तसेच शिवाजी, बाजीराव, नेपोलियन व वॉशिंग्टन इत्यादींच्या नेतृत्वाचा अभ्यास आवश्यक आहे, असे ते सांगत. मुंबई येथे आजारपणामुळे त्यांचा मृत्यू झाला.

 — रवींद्र माधव साठे

जोगळेकर, जयवंत दत्तात्रेय