जोगळेकर, नवनीत विष्णुपंत
घृतांशविरहित दूध आणि दुग्धजन्य पदार्थ यावर संशोधनात्मक कार्य करणारे नवनीत विष्णुपंत जोगळेकर यांनी १९७१ मध्ये डॉ. पं.दे.कृ.वि.मधून बी.एस्सी. (कृषी) पदवी प्रथम श्रेणीत प्राप्त केली व १९७३ मध्ये मराठवाडा कृषी विद्यापीठामधून पशुसंवर्धन या विषयामधून एम.एस्सी. (कृषी) प्रथम श्रेणीत प्रथम क्रमांक मिळवून, १९७८मध्ये फूड सायन्स हा विषय घेऊन पुन्हा एकदा एम.एस्सी. पदवी म्हैसूर या शिक्षण संस्थेमधून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली व २०००मध्ये दुग्ध व्यवसायामधील तंत्रज्ञान या विषयावर संशोधनात्मक प्रबंध सादर करून त्यांनी पीएच.डी. मिळवली. ज्ञानाचा उपयोग वैयक्तिक विकासासाठी करायचा नाही, हा विचार त्यांच्या मनामध्ये दृढ झाला होता. विद्यादानामधून आदर्श विद्यार्थी घडवायचे हे एकमेव ध्येय निश्चित झाल्यामुळे १९७६मध्ये साहाय्यक प्राध्यापक या पदावर ते रुजू झाले. त्यांनी सलग ३० वर्षे विद्यादानाचे कार्य केले व ते विद्यार्थिप्रिय शिक्षक झाले. त्यांनी २००१मध्ये सहयोगी प्राध्यापक हे पद प्राप्त केले व ते या पदावरच सेवानिवृत्तीपर्यंत कार्यरत होते. त्यांनी एकूण सेवाकाळात १६ विद्यार्थ्यांना एम.एस्सी.साठी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय या विषयाचे मार्गदर्शन केले. फूड सायन्समधील एम.टेक. व पीएच.डी.च्या प्रत्येकी एका विद्यार्थ्याला मार्गदर्शन केले.
जोगळेकर यांचे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय या विषयाशी निगडित असे ५२ शास्त्रीय लेख प्रसिद्ध झाले आहेत. या प्रकाशित लेखांपैकी २७ लेखांना विशेषत्त्वाने लोकप्रियता लाभली होती. सेवाकाळामध्ये ‘घृतांशविरहित दुग्धजन्य प्रथिन अन्नपदार्थ’ या प्रकल्प योजनेचे प्रमुख संशोधक अधिकारी ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली व हा प्रकल्प ‘आदर्श प्रकल्प’ म्हणून सिद्ध केला. संयुक्त संस्थाने (यू.एस.) यांच्या विद्यमाने राबवण्यात आलेल्या ‘नूतन स्रोतांचा वापर’ या प्रकल्पांतर्गत औद्योगिक क्षमतेच्या डिंकाचे उत्पादन या प्रक्रिया प्रकल्पाचे ‘प्रमुख प्रकल्पाधिकारी’ म्हणून काम केले व या प्रकल्पाचे भारतीयांबरोबर परदेशी संशोधकांनीसुद्धा कौतुक केले.
२००३ साली अमेरिकन चरित्रकोश या संस्थेवर मानद सल्लागार या पदावर जोगळेकर एक वर्ष कार्यरत होते. २००४ ते २००६ या काळात परभणी येथे मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र व कृषी सेवा केंद्र या दोन समित्यांवर विषयतज्ज्ञ म्हणून कार्यरत होते.