Skip to main content
x

जोगळेकर, रामचंद्र गणेश

     रामचंद्र गणेश जोगळेकर यांचा जन्म अलिराजपूर संस्थानामध्ये झाला. वयाच्या ७व्या वर्षीच त्यांच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे त्यांना आपले शिक्षण आपल्या मामाकडे नागपूरला राहून घ्यावे लागले. त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी नागपूर विद्यापीठाची बी.एजी. ही पदवी प्रथम श्रेणीत प्रथम क्रमांकाने प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी इंडियन अ‍ॅग्रिकल्चरल रीसर्च इन्स्टिट्यूट (पूसा) येथे संशोधन कार्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी रायपूर येथे भात संशोधन केंद्रामध्ये ११ वर्षे नोकरी केली. या दरम्यान त्यांनी तांदळाच्या नवनवीन जाती तयार करण्यात सहभाग घेतला होता. १९४५मध्ये त्यांना पुढील शिक्षणासाठी किंग एडवर्ड मेमोरियल शिष्यवृत्ती मिळाल्यावर ते बेलफास्ट (आयर्लंड) येथे रवाना झाले. तेथे त्यांनी ‘इन्टेसिव्ह अ‍ॅन्ड एक्सलंट’ हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केला. तेथून परत आल्यावर त्यांना नागपूर येथील कृषी महाविद्यालयात कृषी जीवशास्त्राचे प्राध्यापक म्हणून नियुक्त करण्यात आले. येथे त्यांनी केलेल्या संशोधनाचे लेखन प्रकाशित झालेले आहे. या काळात त्यांनी संकरित ज्वारीवर संशोधन केले. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना पीएच.डी.साठी मार्गदर्शन केलेले आहे.

जोगळेकर यांच्या संशोधन कार्याचे जगभर कौतुक करण्यात आले. नागपूर कृषी विद्यापीठाने त्यांच्या संशोधन कार्याची माहिती देणारी पुस्तिका प्रकाशित केली होती.

- संपादित

जोगळेकर, रामचंद्र गणेश