Skip to main content
x

जोगळेकर, रंजना

       रंजना पेठे-जोगळेकर यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांचे वडील राम पेठे हे स्वतः उत्तम गायक आणि संगीतकार होते. त्या काळी त्यांचे आकाशवाणीवर कार्यक्रम होत असत, त्यामुळे रंजनाला जन्मापासूनच संगीताचे बाळकडू मिळू लागले. वडिलांकडे येणाऱ्या गजाननराव वाटवे, बबनराव नावडीकर, दत्ता वाळवेकर अशा दिग्गजांचे कृपाशीर्वाद रंजना पेठे यांना अगदी लहान वयातच मिळाले. सुरुवातीला सरस्वती राणे आणि त्यानंतर जयपूर घराण्याचे पं. राजाभाऊ देव यांच्याकडून त्यांनी गायनाचे शिक्षण घेतले. बी.ए. आणि एम.ए. (मानसशास्त्र आणि हिंदुस्थानी राग संगीत) अशा दोन पदव्या त्यांनी संपादन केल्या.

शिक्षण सुरू असतानाच सार्वजनिक गणेशोत्सवातील कार्यक्रमांमधून त्यांनी मंचावर गाण्यास सुरुवात केली. पुण्याच्या स्वरानंद संस्थेने १९७८ च्या सुमारास ग.दि. माडगूळकरांच्या गीतांवर आधारित ‘मंतरलेल्या चैत्रबनात’ हा पहिला मराठी वाद्यवृंद मंचावर आणला. या कार्यक्रमातून रंजना पेठे-जोगळेकर यांचे गायन क्षेत्रात पदार्पण झाले. त्यांनी या कार्यक्रमाचे अडीचशे प्रयोग केले. त्यानंतर त्यांना आकाशवाणीवर गाण्याची संधी मिळाली. रसिकांबरोबरच रंजना यांचा आवाज तत्कालीन प्रसिद्ध संगीतकारांच्या पसंतीसही उतरला.

राम कदम यांनी ‘दुनिया करी सलाम’ या चित्रपटातून रंजना जोगळेकरांना पार्श्वगायनाची पहिली संधी दिली. त्यानंतर त्यांनी श्रीधर फडके, यशवंत देव, प्रभाकर जोग, श्रीकांत ठाकरे अशा दिग्गजांसाठी गाणी गायली. दूरदर्शनवरील ‘शब्दांच्या पलीकडले’ या लोकप्रिय कार्यक्रमात त्यांनी अनेक गाणी गायली आहेेत. ‘शब्दांच्या पलीकडले’मध्ये आपल्या वडिलांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांचा एक संपूर्ण कार्यक्रमदेखील त्यांनी सादर केला. दूरदर्शनवरील ‘युवदर्शन’ या कार्यक्रमात रंजना यांनी सुरेश भटांच्या मराठी गझला गायल्या. अरुण दाते यांचा ‘शुक्रतारा’, श्रीधर फडके यांचा ‘फिटे अंधाराचे जाळे’, भास्कर चंदावरकर यांनी संगीतबद्ध केलेला ‘नक्षत्रांचे देणे’ असे अनेक दर्जेदार कार्यक्रम रंजना जोगळेकरांच्या आवाजामुळे फुलले.

भावगीतांच्या या काळात रंजना अनेक ध्वनिफितींसाठीदेखील गाणी गायल्या. त्यांनी गायलेल्या ‘रानात सांग कानात’, ‘माझं कोकरू’, ‘मृगजळाचे गाव माझे’, ‘सजणा पुन्हा स्मरशील ना’, ‘माघाची थंडी’ या ध्वनिफिती गाजल्या. स्वतः तयार केलेला ‘भावधारा’ हा जुन्या-नव्या गीतांवर आधारित कार्यक्रम त्या सादर करतात. रंजना जोगळेकरांनी परदेशांतही अनेक कार्यक्रम सादर केले. अमेरिकेमध्ये त्यांनी तीन महिन्यांचा दौरा केला. याव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, दुबई, शारजा, मॉरिशस अशा देशांमध्ये त्या गायल्या आहेत.

त्यांना २०१०-२०११ या वर्षात ‘भारत गायन समाजा’तर्फे ‘मालती पांडे-बर्वे’ या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आपले यजमान वास्तुविशारद आणि घरातील बरीचशी मंडळी डॉक्टर असूनही घरच्यांच्या प्रोत्साहनामुळे जागतिक पातळीवर मराठी गाण्यांची ओळख मांडणार्‍या रंजना जोगळेकरांचा गायकीचा प्रवास जोमाने सुरू आहे. नव्या पिढीला गाणी आणि त्याचबरोबर चांगले संस्कार देण्यासाठी त्या सदैव तत्पर असतात. पुणे, नाशिक, गोवा या ठिकाणी त्या सुगम संगीताच्या कार्यशाळा घेतात. ‘संस्कार भारती’ या संस्थेच्या दादर विभागाच्या त्या अध्यक्षा आहेत.

         — अमोल ठाकुरदास

जोगळेकर, रंजना