जोशी, अंबादास तुकाराम
अंबादास तुकाराम जोशी यांचा जन्म नांदेड जिल्ह्यातील भोकर येथे झाला. त्यांचे बालपण भोकर येथेच गेले व शालेय शिक्षण नांदेड येथे झाले. त्यांनी बी.एस्सी.(कृषी)ची पदवी हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठातून घेतली. त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण उर्दू माध्यमातून झाले. त्यांनी १९५१मध्ये पिल्ले व डॉ. व्यंकटरत्नम यांच्या मार्गदर्शनाखाली हैदराबाद येथील उद्यानविद्या विभागात कृषी साहाय्यक या पदावर नोकरीस प्रारंभ केला आणि १९५६मध्ये झालेल्या राज्य पुनर्रचनेमुळे त्यांची बदली पुणे येथील कृषी खात्यामधील उद्यानविद्या विभागात झाली. त्यांनी तेथे असताना १९६१मध्ये पुणे विद्यापीठाची उद्यानविद्याशास्त्रातील एम.एस्सी. (कृषी) पदवी मिळवली. त्यानंतर त्यांची साहाय्यक प्राध्यापक म्हणून धुळे येथे कृषी महाविद्यालयात बदली झाली. तेथील बगीचा व फळबाग प्रक्षेत्र त्यांनी स्वतः उभे केले. धुळे येथून त्यांना १९६७मध्ये प्राध्यापक म्हणून बढती मिळाल्यावर ते अकोला येथील कृषी महाविद्यालयात गेले. डॉ. पं.दे.कृ.वि.च्या स्थापनेनंतर त्यांची उद्यानविद्या विभागप्रमुख म्हणून पदोन्नती झाली. त्यांनी उद्यानविद्या विभागात विविध फळझाडांचे प्रक्षेत्र वाढवले. अकोला जिल्ह्यात कागदी लिंबाचे प्रक्षेत्र वाढवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. विदर्भामध्ये द्राक्षाची लागवड करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रयोगास त्यांनीच सुरुवात केली. त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील मौजे गहुली व चिखली या दोन गावांत द्राक्षाची लागवड केली. त्या वेळी त्यांनी संजीवकाचा फवारा देऊन संत्रा लागवड क्षेत्रात फळगळती थांबवण्याचे तंत्रही विकसित केले. त्यांच्याबरोबर डॉ. पी.पी. देशमुख व डॉ. कुलवाल यांनीही काम केले. डॉ. पं.दे.कृ.वि.मध्ये उद्यानविद्या विभागाचा विकास करण्यातही त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. त्या काळात पानवेल क्षेत्रामध्ये मररोगाचे प्रमाण फार होते. त्यांनी परतवाडा प्रक्षेत्रावर पारंपरिक व शास्त्रीय पद्धतीने पानमळा लागवड करून मररोगाचे प्रमाण कमी करून दाखवले. त्यांची जून १९८४मध्ये सहयोगी अधिष्ठाता (शिक्षण) या पदावर पदोन्नती झाली. या पदावरून ते १९८६मध्ये सेवानिवृत्त झाले.