Skip to main content
x

जोशी, गजानन नारायण

     डॉ. गजानन नारायण जोशी हे नाव तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात आणि तत्त्वज्ञानात रस असणार्‍या कोणत्याही मराठी माणसाला सुपरिचित आहे. पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा इतिहास मराठी भाषेत तीन खंडांमध्ये आणून आणि भारतीय तत्त्वज्ञानाचा बृहद् इतिहास बारा खंडांमध्ये लिहून त्यांनी मायमराठीची बहुमोल सेवा केलेली आहे. पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाच्या इतिहासात डॉ. जोशी यांनी अगदी ग्रीक तत्त्वज्ञानापासून आधुनिक तत्त्वज्ञानापर्यंतचा  विस्तृत आढावा घेतलेला आहे. भारतीय तत्त्वज्ञानाच्या बृहद् इतिहासामध्ये प्राचीन भारतीय तत्त्वचिंतन संपूर्णपणे व सलगपणे मराठी भाषेत आणलेले आहे. या दोन वाङ्मयीन कृतींद्वारे त्यांनी मराठी सारस्वतात मोलाची भर टाकलेली आहे. याशिवाय त्यांचे विविध विषयांवरील अनेक ग्रंथही विद्वन्मान्य ठरलेले आहेत. काही ग्रंथांना पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत.

     डॉ. जोशी अंमळनेर तालुक्यात उंच टेकड्यांवर वसलेल्या जळोद या चिमुकल्या गावचे रहिवासी. त्यांचे वडील नारायण विष्णू जोशी हे प्राथमिक शिक्षक होते. आई यमुनाताई या उत्तम गृहिणी होत्या. पारोळ्यानजीक बहादरपूर या गावी गजानन यांचे प्राथमिक शिक्षण झाले. नंतर त्याच गावी मराठी शाळेतून १९३५मध्ये व्हरनॅक्युलर फायनल परीक्षा उत्तीर्ण झाले. पुढील शिक्षणासाठी ते अंमळनेर येथील प्रताप हायस्कूलमध्ये दाखल झाले. १९४१मध्ये मॅट्रिक परीक्षा देऊन त्यांनी त्यात उत्तम यश मिळवले. प्रताप विद्यालयातच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी घडण झाली.

     मॅट्रिकनंतर त्यांनी पुणे येथील फर्गसन महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला आणि महाविद्यालयाला रामरामही ठोकला आणि ‘भारत छोडो’ आंदोलनात उडी घेतली. आपल्या मित्रांना भेटून मार्गदर्शन करण्यासाठी एक दिवस भूमिगत अवस्थेत पूज्य साने गुरुजी अचानक अंमळनेरला आले. अनेक अनुयायांनी त्यांची भेट घेतली. गजाननही गुरुजींना भेटले. महाविद्यालय सोडून दिल्याची हकीकत सांगितली, तेव्हा साने गुरुजींनी त्यांना सल्ला दिला, ‘‘हे देशव्यापी आंदोलन दीर्घकाळ चालणार आहे. स्वतंत्र्य तर नक्कीच मिळणार आहे. पण तुझे वय शिक्षण घेण्याचे असल्याने तू पुन: महाविद्यालयाला जा. देश स्वतंत्र झाल्यानंतर त्याची पुनर्बांधणी करण्याचे प्रचंड कार्य उत्तमपणे करण्याची जबाबदारी तुमच्या पिढीला स्वीकारावी लागणार आहे.’’ या आदेशानुसार गजानन यांनी शिक्षण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.

     पुण्यात त्यांच्याविरुद्ध पोलीस वॉरंट असल्याने ते फर्गसन महाविद्यालयामध्ये येऊ शकले नाहीत. तेव्हा ते बडोद्याला गेले. आर्थिक स्थिती हलाखीची असतानासुद्धा विविध प्रकारची कामे करून त्यांनी पदवीपर्यंतचे आपले शिक्षण पूर्ण केले. तत्त्वज्ञान व समाजशास्त्र हे विषय घेऊन ते १९४८मध्ये पुण्यामध्ये एम.ए. प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. १९५५ मध्ये फर्गसन महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तत्पूर्वी त्यांनी सुरतजवळील नवसारी येथील महाविद्यालयामध्ये व्याख्याता म्हणून पाच वर्षे काम केले. १९४९ ते १९५२ या काळात त्यांनी आपला पीएच.डी. प्रबंध पूर्ण करून डॉक्टरेट मिळवली. त्यांचा विषय होता ‘The Evolution of the concept of the Atman and Moksa in the different systems of Indian Philosophy’ आणि परीक्षक होते गुरुदेव रा.द. रानडे.

      डॉ. जोशींचा पिंड शिक्षकाचा होता. आवड ज्ञानाची होती, तर अभिवृत्ती नित्य अध्ययन-अध्यापन-लेखनाची होती. महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य सुरू असतानाच त्यांनी मोठ्या प्रमाणात लेखनकार्यही चालू ठेवले. त्याच वेळी डेक्कन शिक्षण संस्थेचा आजीव सदस्य या नात्याने विविध पदांवर जबाबदारीची कामेही त्यांनी पार पाडली. तसेच अंमळनेर येथील जागतिक कीर्तीचे प्रताप तत्त्वज्ञान केंद्र पुणे विद्यापीठाशी संलग्न करण्यात त्यांनी सिंहाचा वाटा उचलला. अंमळनेरच्या अत्यंत उदार मनाच्या श्रीमंत प्रतापशेठ यांनी तत्त्वज्ञानाच्या अभ्यासासाठी स्थापन केलेली ही असामान्य स्वरूपाची व अतुलनीय अशी संस्था आहे. तिची रचना व घडण करण्यात प्रतापशेठना डॉ. राधाकृष्ण, गुरुदेव रानडे, सुप्रसिद्ध तत्त्वज्ञ कृष्णचंद्र भट्टाचार्य, प्रोफेसर राशबिहारी दास, चंद्रोदय भट्टाचार्य यांसारख्या विद्वान व व्युत्पन्न पंडितांचे मार्गदर्शन व साह्य मिळाले होते. डॉ. जोशी हे काही काळ या संस्थेत फेलो म्हणून होते.

     १९८१मध्ये फर्गसन महाविद्यालयामधून सेवाविवृत्त झाल्यानंतर डॉ. जोशींच्या लेखनाला बहर आला. त्यांची ग्रंथसंपदाही मोठी झाली. तत्त्वज्ञान आणि अन्य विषयांवर त्यांचे ३२ ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत. त्यात ‘पूज्य साने गुरुजींचे अंतरंग’, ‘योगी अरविंदांच्या सावित्री या महाकाव्यातील तत्त्वज्ञान’. ‘जे कृष्णमूर्तींची जीवनदृष्टी’, ‘पातंजल योगदर्शन’, ‘पू. साने गुरुजींचे तत्त्वचिंतन’, ‘डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे तत्त्वचिंतन’, ‘आचार्य काका ‘कालेलकरांचे जीवन चिंतन’, ‘संस्कृति-संभ्रम’, ‘रवींद्रनाथ टागोर’ (मराठी अनुवाद), ‘आनंद कुमारस्वामी’ (मराठी अनुवाद), ‘कालीमातेची मुले’ (मराठी अनुवाद) इत्यादी महत्त्वपूर्ण ग्रंथांचा समावेश आहे. याशिवाय प्रारंभी उल्लेखिलेल्या ग्रंथांचा समावेश आहेच.

     थोर तत्त्वचिंतक प्रो. डी.डी. वाडेकर यांच्या त्रिखंडात्मक मराठी तत्त्वज्ञान महाकोशाचा सहसंपादक म्हणूनही त्यांनी केलेले योगदान महत्त्वाचे आहे. प्रो. वाडेकरांच्या पश्चात तत्त्वज्ञान महाकोश मंडळाच्या संचालकपदाची जबाबदारीही त्यांनी पार पाडली. या काळात विद्वान लेखकांनी लिहिलेली सुमारे ३५ पुस्तके मंडळातर्फे प्रसिद्ध झाली. डॉ. ग. ना. जोशी यांचे सर्वच लेखनकार्य म्हणजे मराठी भाषेतील एक मौलिक ठेवा आहे. त्यांच्या लेखनाला लिहिण्याची विलक्षण गती व वेग होता. ज्ञानेच्छूंना मार्गदर्शन करण्यात ते नेहमीच तत्पर असत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे सहा विद्यार्थ्यांना पीएच.डी. प्राप्त झाली. याशिवाय अखिल भारतीय तत्त्वज्ञान परिषदेचे सहकार्यवाह म्हणूनही त्यांनी सहा वर्षे सेवा केली. अखिल भारतीय चर्चासत्रांमध्येही त्यांचा सहभाग असे.

      डॉ. जोशी यांच्या ग्रंथांची योग्य अशी नोंदही महाराष्ट्राने घेतली. अनेक संस्थांनी पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. त्यात प्रामुख्याने उत्कृष्ट वाङ्मय निमिर्तीबद्दल महाराष्ट्र राज्याचा पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून पं. रामाचार्य अवधानी पुरस्कार, अंमळनेर येथील मुक्ताई पुरस्कार, पुणे येथील देवदेवश्वर संस्थेकडून श्रीमंत पेशवे धार्मिक आणि आध्यात्मिक पुरस्कार यांचा आवर्जून उल्लेख करता येईल.

     डॉ. जोशी हे तत्त्वचिंतक, समाजसेवा व्रतधारक आणि स्वातंत्र्य सैनिक तर होतेच, तसेच साधा, निगर्वी, प्रेमळ आणि विनोदबुद्धी असलेला एक माणूस म्हणूनही ते परिचित होते. जीवनविषयक भारतीय विचारधारा आणि पाश्चात्त्य विचारधन यांचा तौलनिक अभ्यास व चिंतन केल्यानंतर भारतीय जीवनपद्धतीची विशेषता त्यांनी विशद केलेली आहे. त्यांच्या मते पाश्चात्त्य जीवनपद्धतीत आणि आदर्शरहित विचारसरणीत भौतिक समृद्धी, सुख, चैन आणि उथळ चित्तवृत्ती यांना जे अवास्तव आणि गैरवाजवी महत्त्व व प्राधान्य दिले जाते, ते मानवाच्या खर्‍या विकासाला, आत्मजीवनाला पोषक न ठरता काही प्रमाणात अपायकारक आणि विघातक ठरत आहे, याची गंभीरपणे दखल घेणे आवश्यक आहे. सध्या भौतिक समृद्धी देणार्‍या आणि सुखलालसा तृप्त करणार्‍या ऐहिक मनोवृत्तीचे अत्यंत सूक्ष्मपणे विश्लेषण आणि मूल्यमापन करण्याची, साक्षेपीपणाने विचार करून इष्ट-अनिष्ट, शुभ-अशुभ, चांगले-वाईट ठरवण्याची वेळ आलेली आहे.

     आज विज्ञान आणि तंत्रविज्ञान यांच्या विषयांना जे  अधिक महत्त्व दिले जाऊन त्यांचे ज्ञान मिळवण्यास महाविद्यालयात आणि विद्यापीठांमध्ये जे अतिरेकी महत्त्व व प्रोत्साहन दिले जाते, त्याला पायबंद बसण्यासाठी तर्कशुद्ध व मूल्यात्मक पद्धतीने आणि साक्षेपी दृष्टीने विचार करण्यासाठी तत्त्वज्ञानाच्या पद्धतीने विचार करून घडणार्‍या घटनांचे मूल्यमापन करण्यास अधिक महत्त्व व प्रोत्साहन देण्याची फार मोठी आवश्यकता आहे. असे जर झाले नाही, तर भौतिक व ऐहिक विषयोपभोगांच्या ओझ्याखाली माणुसकीच्या कोमल व उदात्ततेकडे नेणार्‍या वृत्ती व भावना चिरडल्या जाऊन मानवाचे आंतरिक भाव-भावनांचे जीवन शुष्क, भकास आणि केवळ आहार-निद्रा-भय-मेैथुन यांनी पुष्ट होऊन त्याच्या पलीकडे वैचारिक, बौद्धिक आणि आंतरिक जीवनाची उपासमार होऊन त्याचे यांत्रिकीकरण होत जाईल. मानवाचे मानवत्व नष्ट होण्याची क्रिया झपाट्याने वाढत जाईल. मानवाचा अध्यात्माच्या दिशेने विकास होणे थांबेल. माणूस हा वैज्ञानिक आणि तंत्र-वैज्ञानिक यांच्या हातातील एक निर्जीव खेळणे बनेल. असे घडत गेल्याने मानवी संस्कृती उच्च, उदात्त आणि मंगलमय न बनता आजारी (Sick) आणि रोगट बनेल. त्यामुळे माणसाचे दैवीकरण होण्यास वाव आणि आवाहन उरणार नाही. अशी मते गजानन जोशी यांनी व्यक्त केली.

      — बी.आर. जोशी  

जोशी, गजानन नारायण