Skip to main content
x

जोशी, लक्ष्मणशास्त्री बाळाजी

     खान्देशातील पिंपळनेर येथे लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा जन्म झाला. महान संस्कृत पंडित, महाराष्ट्रातील एक अग्रगण्य बुद्धिवादी विचारवंत, मराठी विश्वकोशाचे आद्य प्रमुख संपादक व महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे स्थापनेपासून वीस वर्षे अध्यक्ष. त्यांचे प्रारंभिक संस्कृत अध्ययन घरी व वेदाध्ययनाचा आरंभ वडिलांच्या भिक्षुक स्नेह्यांकडे झाला.

     वयाच्या चौदाव्या वर्षी ब्रह्मीभूत स्वामी केवलानंदशास्त्री (पूर्वाश्रमीचे नारायणशास्त्री मराठे) यांनी सन १८९६ मध्ये स्थापलेल्या वाई येथील प्राज्ञपाठशाळेत प्राचीन व्याकरण, न्याय, वेदान्त आदी शास्त्रांच्या अध्ययनाचा शुभारंभ झाला.

     सन १९१८ मध्ये त्यांनी न्यायशास्त्राच्या अध्ययनासाठी वाराणसीला प्रस्थान ठेवले. कै.राजेश्वरशास्त्री द्रविड व नंतर कै.वामाचरण भट्टाचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी न्यायशास्त्राचे सखोल अध्ययन केले व सन १९२२मध्ये कलकत्त्याच्या शासकीय संस्कृत महाविद्यालयाकडून सन्मानासह ‘तर्कतीर्थ’ ही पदवी संपादन केली. वंगीय संस्कृत परिषदेची ‘तर्कतीर्थ’ ही पदवी असामान्य नाही. महाराष्ट्रात व एकूण भारतातच अनेक ‘तर्कतीर्थ’, ‘काव्यतीर्थ’, ‘मीमांसातीर्थ’ व ‘व्याकरणतीर्थ’ आहेत.

     लक्ष्मणशास्त्र्यांनी ‘तर्क’ (खरे तर ‘न्याय’) या विषयावर काहीच लेखन केले नाही. तरीही आयुष्यभर ‘तर्कतीर्थ’ म्हणूनच ते ओळखले गेले, याचे कारण त्यांची तर्कशुद्ध विचारसरणी होय. ‘प्रमाणैरर्थपरीक्षणं न्याय:।’ ‘प्रमाणांद्वारा सप्तपदार्थांचे परीक्षण म्हणजे न्याय’ लक्ष्मणशास्त्री यांनी या पदवीला इतकी थोरवी प्राप्त करून दिली, की तर्कतीर्थ म्हणजे लक्ष्मणशास्त्री जोशीच असेच  डोळ्यासमोर येते. कालिदासाच्या भाषेत ‘द्वितीयगामी न हि शब्द एष:’ (दुसर्‍या कुणाला ही पदवी देता येणारच नाही.) याच वर्षी प्राज्ञपाठशाळेत परतून शिक्षक म्हणून त्यांनी आपले कार्य सुरू केले.   

     सन १९३४ मध्ये मंडळाच्या ‘धर्मकोश’ प्रकल्पाच्या मुख्य संपादनाची जबाबदारी त्यांच्याकडे आली. १९५५ मध्ये केवलानंद सरस्वतींच्या निर्वाणानंतर ते मंडळाचे तहह्यात अध्यक्ष झाले.

     सन १९१७ मध्येच प्राज्ञपाठशाळेतच आचार्य विनोबा भावे यांच्याकडून इंग्लिशचे प्राथमिक धडे घेऊन त्यांनी स्वप्रयत्नांनी इंग्लिश भाषेचा व पाशाच्त्य विद्यांचा दीर्घ व्यासंग आरंभला.

     सन १९३० पासूनच गुुरूंच्या मार्गदर्शनाखाली धर्मसुधारणेच्या आंदोलनाला त्यांंनी सुरुवात केली. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय भाग घेऊन सन १९३० मध्ये व १९३२ मध्ये कारावासही अनुभवला.

     महात्मा गांधींजींच्या अस्पृश्यता निवारणकार्यास शास्त्रीजींनी हिंदू धर्मशास्त्राचे पूरक भाष्य तयार करून दिले.धर्म निर्णय मंडळाच्या सदस्यांपैकी ते एक होते.  सन १९३६ च्या सुमारास मानवेंद्रनाथ रॉय या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मार्क्सवादी नेत्याच्या प्रभावामुळे नवमानववादाच्या वैचारिक मंथनात त्यांनी महत्त्वाचा वाटा उचलला व रॉय यांच्याकडून ‘भारतीय प्रबोधनाचे प्रसादचिन्ह’ असा गौरव त्यांना प्राप्त झाला.

    सन १९५१ मध्ये, परंपरेने अस्पृश्य मानलेल्या सर्वांना सोमनाथ मंदिर खुले राहील असे मंदिराच्या विश्‍वस्तांकडून आश्‍वासन घेऊन त्यांनी सन १९५१ मध्ये भारत सरकारलाच मंदिराच्या जीर्णोद्धाराचे अध्वर्युत्व पत्करण्यास भाग पाडले. भारतीय राज्यघटनेचे संस्कृत भाषांतर करण्यासाठी भारत सरकारने नेमलेल्या समितीचे ते सन्मान्य सदस्य होते. त्यांनी आपल्या ९३ वर्षांच्या प्रदीर्घ आयुष्यात केलेले संशोधनात्मक व संपादनात्मक कार्य आणि निर्माण केलेली बहुमोल ग्रंथसंपत्ती ‘शुद्धिसर्वस्वम्’ (१९३४), ‘आनंदमीमांसा’ (१९३८), ‘हिंदुधर्माची समीक्षा’ (१९४१), ‘जडवाद’ (९१४१), ‘ज्योतिनिबंध’ (१९४७), ‘वैदिक संस्कृतीचा विकास’ (१९५१), ‘आधुनिक मराठी साहित्याची समीक्षा व रससिद्धान्त, जोतिचरित्र’ (१९७३) याशिवाय साहित्य अकदमीसाठी त्यांनी राजवाडे लेखसंग्रह (१९५८) व लो. टिळक लेखसंग्रह यांचे संपादन केले.

     धर्मानंद कोसंबींच्या ‘बुद्धलीला’ आणि सुमंत मुरंजनांच्या ‘ब्राह्मणवर्गाचे वर्चस्व’ या पुस्तकांना त्यांनी लिहिलेल्या अभ्यासपूर्ण प्रस्तावनाही उल्लेखनीय आहेत. जपान, रशिया, अमेरिका आदी देशांतील धार्मिक वा अन्य परिषदांमधून शास्त्रीजींनी शोधनिबंध सादर केले. ‘नवभारत’ मासिकाची धुरा त्यांनी अखेरपर्यंत वाहिली.

    नवीन विद्यांच्या प्रकाशात प्राचीन भारतीय विद्या तपासून घेतली पाहिजे, याबद्दलचा त्यांचा आग्रह रास्त होता. तथापि ‘वैदिक संस्कृतीचा विकास’ (१९५१) या पूर्वीच्या ग्रंथात मार्क्सवादी विचारसरणीच्या काहीशा अतिरिक्त प्रभावामुळे वैदिक संस्कृतीतील आध्यात्मिक व वैचारिक स्थिर मूल्यांच्या शक्तीकडे पाहिजे तितके लक्ष दिले गेले नाही आणि आर्थिक उत्पादन पद्धतीच्या स्थित्यंतरांवर प्रभुत्व गाजवणार्‍या मानसिक मूल्यांची हिंदू धर्माने जी जोपासना केली त्याचीही उपेक्षा झाली, हे त्यांनी या पुस्तकात मोकळेपणे मान्य केले.

     १ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतर डिसेंबरमध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ निर्माण झाले व त्याच्या अध्यक्षपदी शास्त्रीबुवांची नियुक्ती झाली व आपले गुरू स्वामी केवलानंद सरस्वतींच्या त्रिखंडात्मक मीमांसाकोशाच्या अनुभवाच्या जोरावर वीस खंडांच्या मराठी ‘विश्‍वकोशा’च्या प्रमुख संपादकाची जबाबदारी स्वीकारून प्रत्येकी एक सहस्र ते बाराशे पृष्ठांच्या सतरा खंडांची भव्य योजना त्यांनी आखली. यात तंत्र-विज्ञान व मानविकींना समान महत्त्व देण्यात येणार असल्यामुळे आपल्याकडील भाषा अस्तित्त्वात नसलेली नवी परिभाषा निर्माण करणे आवश्यक होते. यासाठी इंग्लिश संकल्पनांसाठी मराठी संज्ञांची व मराठी संकल्पनांना योग्य अशा इंग्लिश संज्ञांची व्यवस्था असलेला परिभाषासंग्रह हा या विश्‍वकोशाचा अठरावा खंड आधी प्रसिद्ध करण्यात आला. याशिवाय एक नकाशाखंड व उर्वरित सूचिखंड प्रसिद्ध करण्याचेही ठरवले.

     सन १९६० पासून १९८०पर्यंत महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची धुरा शास्त्रीबुवांकडेच होती. त्यानंतर महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे ते अखेरपर्यंत अध्यक्ष व विश्वकोशाचे प्रमुख संपादक होते. त्यांच्या अध्यक्षतेच्या काळात विज्ञान, वैद्यक, धर्म, इतिहास, सामाजिक शास्त्रे, ललितकला यांसारख्या विषयांवर स्वतंत्र शंभर पुस्तके प्रकाशित झाली. यात उर्दू-मराठी शब्दकोशाबरोबर आयुर्वेदीय शब्दकोशाचाही समावेश आहे. याखेरीज म.म. पांडुरंग काणे लिखित ‘हिंदू धर्मशास्त्राचा इतिहास’, बौद्ध वाङ्मयातील महत्त्वाचे ग्रंथ, न्यायमूर्ती रानडे, निकोलाय मनुची, बर्नार्ड रसेल, जदुनाथ सरकार, एम.एन. रॉय यांसारख्या लेखकांच्या निरंतर वैचारिक मूल्य असणार्‍या लेखनाची अडुसष्टपेक्षा जास्त भाषांतरित पुस्तके प्रसिद्ध करण्याचेही अवधान मंडळाने ठेवले.

     या कोशातील नोंदी लिहिण्याच्या बाबतीत कर्नाटक, पंजाब आदी अन्य भाषिक प्रदेशांतील विद्वानांचे आवश्यक सहकार्य मिळवून शास्त्रीबुवांनी या कोशकार्याला आगळे महत्त्व प्राप्त करून दिले. या विश्‍वकोशाचे प्रकाशित झालेले सतरा खंड मराठीला भूषणभूत आहेत. या विश्वकोशाच्या संपादनात शास्त्रीबुवांनी महाराष्ट्रीय विद्वानांबरोबर निरनिराळ्या देशांच्या भारतीय दूतावासांचेही सहकार्य मिळवले, हे फिनलँड, जपान आणि इतर देशांवरील नोंदींवरून स्पष्ट होते.

     विश्वकोशाप्रमाणेच या मंडळाने महाराष्ट्राच्या इतिहासाच्या लेखनाची योजना आखली व प्रागैतिहासिक कालापासून आधुनिक कालखंडापर्यंतच्या इतिहासाचे पाच भाग पाडून त्यांच्या लेखनाचे व संपादनाचे काम विद्वानांकडे सोपवलेले आहे. शास्त्रीय विज्ञान ग्रंथमाला प्रकाशित करण्याच्या साहित्य संस्कृती मंडळाच्या उपक्रमाला अनुसरून ‘रेडिओ रचना आणि कार्य’, ‘मधुमेह’, ‘प्राणिसृष्टी’, ‘बुद्धिबळ’, ‘पाणीपुरवठा’ यांसारख्या विषयांवरील ४५ पुस्तके मराठीत प्रकाशित करून लोकभाषा मराठीच्या माध्यमातून विज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्यही शास्त्रीबुवांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झालेले आहे.

     पांडित्य किंवा विद्वत्ता, त्याचे संपादन व संवर्धन यांना शास्त्रीजींनी आपल्या प्रदीर्घ आयुष्यात समाजात एक न्याय्य स्थान मिळवून दिले व आधुनिक लोकशाही मूल्यप्रणालीशी सुसंगत असे तिचे हक्क व कर्तव्ये यांची समाजाला जाणीव करून देऊन प्रबोधनाचे भरीव काम केले.

     प्राचीन आचार्यांच्या परंपरेतूनच विचारांची, विचारांच्या स्वातंत्र्याची जडणघडण होते. इतकेच नव्हे, तर आधुनिक काळाला अनुरूप असणार्‍या नवनिर्मितिक्षम विचारांची, विवेकपूर्ण विचारांची वीण गुंफता येते हे सोदाहरण दाखवून देऊन समाजाचे प्रबोधन करणार्‍या आधुनिक विचारवंतांत शास्त्रीबुवांचे स्थान असाधारण होय.

     यामुळेच नवी दिल्लीतील साहित्य अकादमीचा मराठी ग्रंथाचा पहिला पुरस्कार (१९५५), राष्ट्रीय संस्कृत पंडित (९१७३), राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार, कोल्हापूर (१९९०), पद्मभूषण (१९७६), पद्मविभूषण (१९९२) तसेच एशियाटिक सोसायटीची गौरववृत्ती (१९९१), फाय फाउंडेशनचा ‘राष्ट्रभूषण’ पुरस्कार हे त्यांच्या वाट्याला आले व मध्य प्रदेश संस्कृत अकादमीनेही १९९२मध्ये त्यांचा गौरव केला. दिल्ली येथील १९५४ मधील मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. वयाच्या ९३ व्या वर्षी महाबळेश्‍वर येथे त्यांचा मृत्यू झाला.

      — डॉ. मो.गो. धडफळे / संपादक मंडळ       

जोशी, लक्ष्मणशास्त्री बाळाजी