Skip to main content
x

जोशी, मदन वसंत

            खासगी वा इतर शासकीय संस्थांकडून आर्थिक साहाय्य मिळवून लोकोपयोगी संशोधन पूर्णत्वाला नेणाऱ्या संशोधकांपैकी एक डॉ. मदन वसंत जोशी. महाराष्ट्र पशू-मत्स्यविज्ञान विद्यापीठ व डॉ.पं.दे.कृ.वि.अंतर्गत पशु-विकृतिशास्त्र विभागात त्यांनी अध्यापनासोबतच महाराष्ट्रातील पशुपालकांना  महत्त्वाच्या समस्यांवर उत्तरे शोधण्याबरोबर हे संशोधन गावपातळीवर पोहोचवण्यासाठी समाज प्रबोधनाच्या अनेक वाटा चोखाळल्या. त्यांचा जन्म नागपूर येथे झाला. त्यांनी १९७१मध्ये नागपूर बोर्डातून दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली. नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयातून १९७७मध्ये पशुवैद्यकीय पदवी प्राप्त डॉ. जोशी यांनी अकोल्याच्या डॉ. पं.दे.कृ.वि.अंतर्गत पदव्युत्तर शिक्षण संस्थेतून डॉ. बा.ल. पुरोहित या नामवंत पशुवैज्ञानिकाच्या मार्गदर्शनाखाली पशु-विकृतिशास्त्र विषयात पदव्युत्तर ज्ञान प्राप्त केले (१९७७). याच विद्यापीठातून पीएच.डी. (१९९०) तर इंडियन असोसिएशन ऑफ व्हेटरनरी पॅथॉलॉजीअंतर्गत इंडियन कॉलेज ऑफ व्हेटरनरी पॅथॉलॉजीची ‘डिप्लोमॅट’ ही मानद पदवी २००८ मध्ये प्राप्त केली. ही पदवी प्राप्त करणारे ते महाराष्ट्रातील पहिलेच प्राध्यापक. अध्यापन व संशोधन कार्य अद्ययावत ठेवण्याच्या दृष्टीने डॉ. जोशी यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण केले, ज्यात प्रामुख्याने पशुखाद्यान्नातील अ‍ॅफ्लॉटॉक्सीन या विषारी रसायनाचे प्रमाण, श्‍वानदंश रोगनिदान, अश्‍ववर्गीय जनावरातील रोगनिदान या प्रशिक्षणांचा अंतर्भाव आहे.

            डॉ. जोशी यांनी १९८० ते २०१२ या प्रदीर्घ कालखंडात विकृतिशास्त्र विषयाचे साहाय्यक प्राध्यापक, प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणून पदव्युत्तर अध्यापनाबरोबरच निम्नस्तरीय पशुवैद्यकीय प्रशिक्षण कार्यक्रम पार पाडले. खेडोपाडी काम करत असणाऱ्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यासांठी त्यांनी तयार केलेला ‘सर्वसमावेशक पशुवैद्यकीय कार्यक्षेत्रात नवीन पद्धतींचा अवलंब’ हा प्रशिक्षण कार्यक्रम राष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त ठरला आणि अशा प्रकारचा कार्यक्रम देशात प्रथम तयार करण्याचा मान डॉ. जोशी यांना, पर्यायाने महाराष्ट्राला मिळाला. अकोला-अकोट-दर्यापूर भागांतील खारपाणी पट्ट्यातील जनावरांची अनुत्पादकता बकऱ्यांतील सुप्त स्तनदाहामुळे होणारे करडांचे अपमृत्यू, काळ्या ज्वारीचा कोंबड्यांच्या खाद्यान्नात उपयोग या संदर्भात डॉ. जोशी यांनी केलेले संशोधन पशुपालकांच्या दृष्टीने अनमोल ठरले आहे. खारपाणीपट्ट्यातील कृषी उत्पादनात सुधारणा होण्यासाठी कृषी विभाग व विद्यापीठात अनेक स्तरांवर प्रयत्न झाले असले, तरी या पट्ट्यात असणाऱ्या  पशुधनाची अल्प उत्पादकता व त्यावर उपाय यासाठी डॉ. जोशी यांनी प्रथम प्रयत्न सुरू केले. क्षारयुक्त पाणी सतत प्यायल्याने जनावरांचे जठर, यकृत व मूत्रपिंड यावर दुष्परिणाम होऊन हे अवयव अकार्यक्षम बनतात. जनावरांच्या उत्पादकतेवर अनिष्ट परिणाम होतात व या पट्ट्यातील जनावरांत मोठ्या प्रमाणावर आढळणारे चयापचयाचे, पचनाचे, यकृताचे व मूत्रपिंडाचे विकार हे या पाण्यामुळे होतात, हे त्यांनी शवविच्छेदनाद्वारे व वरील अवयवांच्या सूक्ष्मपरीक्षणाद्वारे सिद्ध केले. या पट्ट्यातील तलावांचे, विहिरींचे वा कूपनलिकांचे पाणी जनावरांना न पाजता, या पट्ट्याबाहेरून येणाऱ्या व नळाद्वारे पुरवल्या जाणाऱ्या गोड पाण्यात ५०: टक्के या प्रमाणात मिसळून पाजल्याने खाऱ्या  पाण्यामुळे होणारे दुष्परिणाम टळतात, चयापचयाच्या विकारांचे प्रमाण कमी होऊन, उत्पादकतेत वाढ होते हे त्यांनी सिद्ध केले. त्यांचे हे संशोधन खारे पाणीपट्ट्यांतील पशुपालकांना दूरगामी दिलासा ठरणारे ठरले. केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर अखिल भारतीय स्तरावर खारे पाणीपट्ट्यातील जनावरांवर हे संशोधन उपकारक ठरले.

            करडातील अपमृत्यू म्हणजे बकरीपालनातील आर्थिक नुकसानीतील महत्त्वाचे कारण. याची कारणे शोधताना व्यायलेल्या बकऱ्यांतील सुप्त स्तनदाह हे सर्वात महत्त्वाचे कारण असल्याचे डॉ. जोशी यांच्या संशोधनातून समोर आले. सुप्त स्तनदाह झालेल्या शेळ्यांतील जंतुसंसर्ग दुधावाटे करडाच्या पोटात जाऊन ही करडे अतिसाराने मृत्युमुखी पडतात. व्यायलेल्या शेळ्यांची सुप्त स्तनदाहासाठी तपासणी व त्यावर त्वरित उपाय केल्याने करडातील अपमृत्यू टाळता येतात, हे सप्रमाण दाखवून डॉ. जोशी यांनी असंख्य बकरीपालकांचा दुवा मिळवला.

            मराठवाडा-विदर्भात काळ्या ज्वारीच्या समस्येचे स्वरूप उग्र होते. ही ज्वारी कोंबड्यांच्या खाद्यात वापरता येईल का? यावर संशोधन करता केवळ अशी ज्वारी धुऊन व नंतर वाळवून कोंबड्यांच्या खाद्यमिश्रणात वापरल्यास कोंबड्यांच्या मांसलतेवर वा अंडी उत्पादनावर दुष्परिणाम होत नाहीत, हे सिद्ध करून काळ्या ज्वारीचा प्रश्‍न सोडवण्याचा यशस्वी प्रयत्न डॉ. जोशी यांनी केला. ज्वारीच्या कोंबामुळे होणारी जनावरातील विषबाधा हाही ज्वारी उत्पादक प्रदेशातील महत्त्वाचा प्रश्‍न होता. सर्वसाधारणपणे ज्वारीचे कोंब एका विशिष्ट काळानंतर साइनाइडविरहित असल्याने ते जनावरांच्या खाण्यात आल्यास विषबाधा होत नाही, हेही डॉ. जोशी यांचे एक महत्त्वाचे संशोधन होय. संशोधन पशुपालकांच्या गोठ्यापर्यंत गेल्यासच त्याची उपयुक्तता सिद्ध होते. यावर नितांत विश्‍वास ठेवणार्‍या डॉ. जोशी यांना विस्तार समन्वयक म्हणून अनेक उपक्रम राबवले. यात बेरोजगार युवकांसाठी पशुपालन व्यवसाय, गोचीड आणि गोमाशा नियंत्रण कार्यक्रम, दुग्ध व्यवसायिक मेळावे, पशुरोगनिदान शिबिरे, चर्चासत्रे, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम, दूरदर्शन, आकाशवाणी कार्यक्रम, स्थानिक वर्तमानपत्रांतून लेख, घडीपत्रिका अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. ७५ संशोधनात्मक लेख त्यांनी लिहिले आहेत. राष्ट्रीय (२५) आणि आंतरराष्ट्रीय (१०) परिषदांमध्येही त्यांचा सहभाग होता.

            अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पारितोषिकांचे मानकरी असलेल्या जोशी यांनी ‘पशु-विकृतिशास्त्र’ या रूढ अर्थाने अनभिज्ञ विषयात केलेले संशोधन केवळ शैक्षणिक वा प्रयोगशाळास्थित न ठेवता पशुपालकापर्यंत पोहोचवून पशुवैद्यकीय विद्याशाखेला अधिक लोकाभिमुख केले.

- डॉ. रामनाथ सडेकर

जोशी, मदन वसंत