Skip to main content
x

जोशी, मधुकर रामदास

     मधुकर रामदास जोशी यांचा जन्म अकोला येथे झाला. त्यांच्या आईचे नाव मथुराबाई होते.सर्वसाधारण परिस्थिती असलेल्या घरात जन्म झाला असला तरीही बालपण सुखात गेले. मधुकर यांचे  शालेय शिक्षण अकोला येथे झाले. अकोल्याच्या सीताबाई महाविद्यालयातून  शिक्षण पूर्ण झाले.जात्याच हुशार असलेल्या मधुकर यांना संशोधनाची मुळातच आवड होती. त्यावेळी घरात वडिलांच्या मित्रांचे येणे - जाणे असे. त्या नामवंत व हुशार मित्रमंडळींमध्ये दत्त संप्रदायाचे अभ्यासक अप्रबुद्ध यांचे ही येणे- जाणे होते. त्यांच्या हुशारीचा, अभ्यासाचा प्रभाव मधुकर यांच्यावर पडला आणि प्राचीन पोथ्या, पुराणे, हस्तलिखिते वाचण्याची आवड निर्माण झाली. पदव्युत्तर शिक्ष्णानंतर  त्यांनी एम. ए. मराठी व संस्कृत या द्विपदव्या संपादित केल्या. तसेच ‘नाथ संप्रदाय’ या विषयात प्रबंध लेखन करून डॉक्टरेट ही  पदवी संपादित केली. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर अकोल्याच्याच सीताबाई महाविद्यालयात व्याख्याता म्हणून नोकरी लागली. काम सुरू असतानाच  हस्तलिखितांचे वाचन संशोधन सुरू होते. त्यांचा हा व्यासंग, अभ्यासू वृत्ती पाहून नागपूर विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. वि.भि. कोलते यांनी स्वतः घरी येऊन नागपूर विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यभार संभाळण्यासाठी निमंत्रित केले. एखाद्या विद्यापीठाच्या कुलगुरुंनी घरी येऊन काम करण्यासाठी बोलावणे ही फार मोठी गोष्ट आहे. यावरूनच मधुकर रामदास जोशी यांच्या विद्वत्तेची प्रचिती येते. ते  १९६१ मे मध्ये पूर्वाश्रमीच्या निशा देशपांडे यांच्याशी विवाहबद्ध झाले.

     प्रा. मधुकर जोशींना नागपूर विद्यापीठात काम करण्याची संधी मिळाली आणि ज्ञानग्रहणाची कक्षा अधिक विस्तृत झाली. नागपूरला विद्वत्ताप्रचुर मंडळींचा सहवास लाभला त्यामध्ये प्रामुख्याने शिलालेख व ताम्रपट या विषयातील महामहिम डॉ. वा. वि. मिराशी, हस्तलिखितांचे संशोधक, अभ्यासक डॉ. य. खु. देशपांडे, महानुभाव लिपी तज्ज्ञ डॉ. वा. ना. देशपांडे, संस्कृत तज्ज्ञ डॉ. ग. त्र्यं. देशपांडे  आणि डॉ. सुरेश डोळके अशा दिग्गज मंडळींचा समावेश होता. या विद्वान मंडळींकडून बरेच काही शिकता आले आणि त्यांना अभ्यासाची नेमकी दिशा लाभली.

     डॉ. मधुकर जोशी यांनी हस्तलिखितांच्या वर्णनात्मक यादीच्या संपादनाचे महत्त्वपूर्ण काम केले. नागपूर विद्यापीठाच्या कोशकार्याच्या कार्यकारिणीचे  संपादकीय सदस्य म्हणून काम पाहिले. त्याचप्रमाणे त्यांनी समर्थ रामदासांचे  समग्र कार्य, सुमंगल प्रकाशन, मुंबई, संत तुकारामांचे समग्र कार्य, सुमंगल प्रकाशन मुंबई , मराठी वाङ्मयाचा इतिहास, व्हिनस प्रकाशन, पुणे, समर्थ रामदासांच्या दासबोधाचे टीकात्मक समीक्षण, प्रकाशक सज्जनगड प्रतिष्ठान, सातारा आणि महाभारत प्रतीच्या पाठ संहितेचा इतिहास आदी संशोधनात्मक कार्य प्रकाशित झाले आहे. डॉ. मधुकर जोशी  यांची ‘नाथ संप्रदाय’, व्हिनस प्रकाशन पुणे, ‘मनोहर अंबानगरी’, नागपूर हिंदू धाम मंदिर  प्रकाशन, ‘स्टडीज ऑफ ज्ञानेश्वरी’, साहित्य प्रसार केंद्र, नागपूर, मंगेश प्रकाशन नागपूर द्वारा ‘श्री विठ्ठल आणि पंढरपूर’, ब्रज मंडळातील कृष्णसखा— स्वामी सच्चिदानंद, मोहपा यांचे चरित्र व कार्य ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत.सध्या शके १५०० मधील श्री गुरुचरित्राच्या प्राचीन संहितेचे मुद्रण सुरू आहे.

     आतापर्यंत डॉ. जोशी यांनी चाळीस हजाराच्यावर हस्तलिखितांचे वाचन व अभ्यास झालेला आहे. फक्त ज्ञानेश्वरीच्याच १३५० पोथ्यांचे वाचन व अभ्यास केला आहे. महानुभाव पंथाच्या सत्तावीस लिप्यांपैकी तेवीस लिपींची त्यांना ओळख आहे. पुण्याच्या द. वा. पोतदार, ग. ह. खरे, शं. गो. तुळपुळे, रा. शं वाळिंबे, अ. का. प्रियोळकर आदी मान्यवर तज्ज्ञांबरोबर काम करण्याची संधी मिळाली आहे.

     डॉ. मधुकर रामदास जोशी यांनी विदर्भ संशोधन मंडळाचे चिटणीस व संपादक म्हणून काम पाहिले आहे. ते नागपूर विद्यापीठाच्या एम. फिल. संशोधन शास्त्र विभागाचे संचालक पदी नियुक्त होते. त्यांनी नागपूर विद्यापीठांतर्गत १९८७ मध्ये भरलेल्या ‘ज्ञानेश्वर’ या विषयावर भरलेल्या परिसंवादाचे प्रमुख म्हणून काम पाहिले. हस्तलिखिते व हस्तलिखित शास्त्र या विषयात त्यांचा विशेष अभ्यास आहे.त्यामुळे ते महाराष्ट्र सरकारच्या हस्तलिखितशास्त्र समितीवर  सल्लागार म्हणून काम केले आहे. सरस्वती महाल वााचनालय थंजावूर, तामिळनाडू येथे    हस्तलिखितशास्त्रज्ञ म्हणून मंडळावर नियुक्त आहेत.

     आजपर्यंत डॉ. जोशी यांनी  सत्तावीस विद्यार्थ्यांना पीएच. डी. साठी  मार्गदर्शन केले आहे त्यापैकी पाच विद्यार्थ्यांना ‘थंजावूर साहित्य’ या विषयात प्राप्त झाली आहे.त्यांनी नागपूर व जबलपूर या विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून काम केले आहे तसेच पुणे, बरोडा, हैदराबाद, औरंगाबद, कोल्हापूर, अमरावती, आदी विद्यापीठांवर परीक्षक म्हणून काम केले आहे. डॉ. जोशीं यांना मुंबई विद्यापीठाचा प्रियोळकर पुरस्कार प्राप्त झाला. तसेच  विदर्भ साहित्य संघ, जिजामाता शिव प्रतिष्ठान मंडळ, नागपूर, ज्ञानेश्वर प्रतिष्ठान, अचलपूर, समर्थ साहित्य पुरस्कार, सज्जनगड आदी संस्थांकडून मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहे.

     डॉ. जोशी वयाच्या चौर्‍यांशीव्या वर्षी सुद्धा कार्यरत आहेत. त्यांना दोन मुले व दोन मुली असून मोठा मुलगा अजय वैज्ञानिक म्हणून कार्य करीत आहे.                                                                                                          

   - सुपर्णा कुलकर्णी

जोशी, मधुकर रामदास