Skip to main content
x

जोशी, मोरेश्वर दिनकर

      मोरेश्‍वर दिनकर जोशी ऊर्फ तात्या जोशी हे कोकणातल्या रत्नागिरीचे. ते दोन वर्षांचे असतानाच त्यांचे वडील वारले. त्यांच्या आजोबांनी त्यांना सांभाळले. तो काळ स्वातंत्र्यलढ्याचा असल्याने रत्नागिरीतही तेच वातावरण होते. प्लेग प्रतिबंधक लसीकरणाला १९१६ ला झालेल्या विरोधात तात्यांनी भाग घेतला. पुढच्याच वर्षी ते मॅट्रिकनंतरच्या शिक्षणासाठी मुंबईच्या विल्सन महाविद्यालयात दाखल झाले. तिथेही त्यांनी अभ्यासक्रमात बायबल हा विषय अनिवार्य झाल्याच्या निषेधात भाग घेतला आणि गांधीजींच्या असहकार चळवळीतही सामील झाले.

     मोरेश्‍वर जोशी यांचा मूळ पिंड शिक्षकाचा होता. पदवीनंतर १९२२ ला राष्ट्रीय शिक्षण शाळेत त्यांनी शिक्षकाचीच नोकरी केली. त्याच वर्षी सरस्वतीताई तात्यांच्या सहचारिणी झाल्या. नंतरच्या चार वर्षात विधी महाविद्यालयामधून एलएल.बी. पदवी घेऊन तात्यांनी १९२६ ते १९३० या काळात विल्सन विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून नोकरी केली. इथे मोरोपंतांना जाणवले की, आपला जीव मुंबईत रमणे कठीण असून रत्नागिरी हीच आपली कर्मभूमी आहे. परिणामी त्यांनी १९३१ ला रत्नागिरीत स्थलांतर केले. मुंबईत बी.ए. आणि एलएल.बी पदवी घेऊन तात्यांनी कोकणच्या रत्नागिरी परिसरात १९५० ते १९७८ या काळात एक व्रत म्हणून शिक्षणाचा प्रसार केला.

     रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, गोगटे महाविद्यालयाचे संस्थापक - संवर्धक, जोगळेकर व्यापारी महाविद्यालयाचे संस्थापक आणि २२ वर्षे  सर्वोदय छात्रालयाचे कुशल व्यवस्थापक आणि दलित-मित्र या भावनेने विद्यार्थ्यांचे सर्वार्थाने मार्गदर्शक ही तात्यांची खरी ओळख! बाळासाहेब खेर यांचे दातृत्व आणि मोरोपंतांचे आदर्श अप्पासाहेब पटवर्धन यांच्या प्रेरणेने रत्नागिरीत सर्वोदय छात्रालय १९४९ साली स्थापन झाले. सामाजिक व आर्थिक बाबतीत दलित असलेल्या जिल्ह्यातल्या सर्व ग्रामीण विद्यार्थ्यांना शालेय तसेच महाविद्यालयीन शिक्षणासाठी रत्नागिरीत विनामूल्य निवास आणि भोजनाची सोय पुरवणे हे या छात्रालयाचे मुख्य ध्येय होते.

     आजपर्यंत १२०० मुलांनी छात्रालयात राहून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. यापैकी काही मुले निवडक क्षेत्रात नामवंत झाली. ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव, माजी राज्यमंत्री लक्ष्मणराव हातणकर, उपायुक्त श्रीकांत धाडवे, माजी आमदार विठ्ठलराव कळंबटे, शामराव नेने हे छात्रालयाचे लाभार्थी!

     मोरोपंत जोशी सरांनी छात्रालयातल्या विद्यार्थ्यांना शिक्षण संधी मिळवून देण्याबरोबर त्यांच्यावर सुसंस्कारही केले. सकाळ - संध्याकाळची सामूहिक प्रार्थना, १५ ऑगस्ट - २६ जानेवारीसारखे राष्ट्रीय सण साजरे करणे, संत, राष्ट्रपुरूषांच्या जयंत्या साजर्‍या करणे, स्वावलंबनावर भर, आवारात आणि आचरणात स्वच्छता पाळण्याबाबतची त्यांची कडक शिस्त, प्रत्येकाला दैनंदिनी लिहिण्याची लावलेली सवय, संस्कृत आणि इंग्रजी विषय शिकवणे असे उपक्रम त्यांनी अमलात आणले. तात्यांचे घर विद्यार्थ्यांना आपले वाटत असे. सरस्वतीताई देखील छात्रालयातील मुलांना आपल्या मुलांसारख्याच वागवित. एकूणच छात्रालय हे तात्यांचे एक मोठे कुटुंब झाले होते. तात्यांच्याच भाषेत सांगायचे, तर ‘हे  छात्रालय म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेची एक छोटीशी प्रयोगशाळा आहे.’

त्या काळाला अनुरूप अशा राजकीय - सामाजिक क्षेत्रातही तात्यांचा सहभाग लक्षणीय होता. छोडो भारत चळवळीत तावून - सुलाखून निघालेले स्वातंत्र्यसैनिक, विधानसभेचे आमदार, लोकसभेचे खासदार, निर्भीड संपादक, वृत्तपत्रीय लिखाणातून लोकशिक्षण साधणारे पत्रकार आणि कुठलेही सामाजिक भेदाभेद न मानणारा आतिथ्यशील सामान्य नागरिक हे त्यांचे आणखी वेगळे गुणविशेष !

     रत्नागिरीत आल्यावर तात्यांनी चरितार्थासाठी वकिली सुरू केली. याचवेळी रत्नागिरीतल्या ‘बळवंत’ या स्थानिक वृत्तपत्राच्या संपादकपदाची जबाबदारी त्यांच्यावर आली. देशातल्या स्वातंत्र्य चळवळीने उग्र रूप घेतले होते. ‘कोकणचे गांधी’ अशी ओळख मिळालेल्या अप्पा पटवर्धनांनी कोकणात काँग्रेसच्या या चळवळीचे नेतृत्व केले. राजकारण आणि समाजकारण यात लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, अप्पा पटवर्धन, विनोबा भावे ही दिग्गज व्यक्तिमत्त्व तात्यांची स्फूर्तिस्थाने होती. अध्यात्माच्या संदर्भात स्वामी स्वरूपानंद त्यांचे आदर्श होते. स्थानिक वृत्तपत्राचा संपादक या नात्याने त्यांचा स्वातंत्र्य चळवळीतला प्रत्यक्ष सहभाग अनिवार्य  होता. म्हणूनच १९४२ च्या भारत छोडो चळवळीतल्या सहभागामुळे त्यांना ३० महिन्यांचा कारावास झाला.

     राजकारणातल्या त्यांच्या योगदानामुळे १९४६ ला मोरेश्‍वर जोशी यांची मुंबई विधानसभेवर रत्नागिरी उत्तर मतदारसंघातून निवड झाली. त्यानंतर १९५२ ला लोकसभेची निवडणूक झाली. राजापूर मतदारसंघातून काँग्रेसचे खासदार म्हणून ते निवडून गेले. खासदारकीच्या काळात पक्षशिस्तीच्या चौकटीत राहून त्यांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा जोरदार पाठपुरावा केला. कोकणच्या विकासासाठी खाण उद्योगासह इतर औद्योगिक क्षेत्रांबरोबरच कोकण रेल्वेची मागणी सभागृहात ठामपणे मांडणारे ते पहिले लोकप्रतिनिधी होते. लोकसभेची १९५७ ची निवडणूक संयुक्त महाराष्ट्र चळवळीने गाजली. यात पराभव झाल्यानंतर निवडणुकीच्या राजकारणातून तात्यांनी निवृत्ती पत्करली आणि शिक्षणक्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतले.

     मतभेद झाल्याने जवळजवळ सव्वीस वर्षे बळवंतचे संपादक असलेल्या तात्यांनी १९५७ ला हे पद सोडले. त्याचवेळी अप्पासाहेब पटवर्धनांनी ‘नवकोकण’ साप्ताहिकाची कल्पना प्रत्यक्षात आणली आणि त्याच्या संपादनाची जबाबदारी मोरोपंतांवर आली. विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीचा रत्नागिरी परिसरात प्रचार हे नवकोकणचे मुख्य उद्दिष्ट होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे १९७७ ला ‘नवकोकण’ त्यांनी श्री. भिसे यांच्याकडे सोपवले.

     आपल्या परिसरात समाजहिताचं काम करणाऱ्या व्यक्ती तात्यांच्या नजरेस नक्की येत. याचे निदर्शक म्हणजे त्यांनीच लिहिलेले मंचरजी खारेघाट या जिल्हा सत्र न्यायाधीशांचं चरित्र! मूळ पारशी असलेले मंचरजी रत्नागिरीत असताना गरीब, होतकरू शिक्षणार्थीना फी साठी दरमहा १०० रुपयांचं आर्थिक सहाय्य करीत.

     अस्पृश्यता निवारण (१९३५-६०), पत्रकारिता (‘बळवंत’ १९३१-५७) आणि ‘नवकोकण’ (१९५७-७७) आणि शिक्षणक्षेत्र (सर्वोदय छात्रालय १९५०-७८) यांत मोरोपंतांनी दिलेले योगदान मोठे आहे. त्यांच्या घरी सर्वांना मुक्त प्रवेश होता. हरिजन व मुस्लिमांबरोबरच्या पुरोगामी आचरणामुळे त्यांना ब्रह्मवृंदांकडून बहिष्कार पत्करावा लागला. पण याच ब्रह्मवृंदांनी नंतर मोरोपंतांची स्थानिक वेदशाळेच्या कार्यकारी अध्यक्षपदी नेमणूक केली.

     तात्या जोशी यांचा अनेक स्तरावर गौरव झाला. त्यातले नोंद घेण्याजोगे पुरस्कार आहेत ते स्वातंत्र्यसैनिक हे मानचिन्ह आणि महाराष्ट्र शासनाचा दलितमित्र हा पुरस्कार!

 - सुधाकर कुलकर्णी

जोशी, मोरेश्वर दिनकर