Skip to main content
x

जोशी, मोरेश्वर प्रभाकर

    थोर चिंतक, साक्षात्कारी संत बाबा महाराज आर्वीकर हे मूळचे विदर्भातील आर्वी या गावचे म्हणून त्यांचे आडनाव ‘आर्वीकर’ पडले; पण त्यांचे कार्यक्षेत्र व मुख्यालय सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील भीमानदीच्या काठी असलेले प्राचीन शिवक्षेत्र ‘माचणूर’ हे होते. नगर जिल्ह्यातील मढी येथे ते कानिफनाथांच्या दर्शनास आले होते, तेव्हा माचणूरला जाऊन ठाण मांडावे असा कानिफनाथांचा आदेश झाला आणि या ईश्वरी आदेशानुसार बाबा महाराज आर्वीकर हे माचणूरला जाऊन राहू लागले.

     बाबा महाराजांचे पूर्ण नाव मोरेश्वर प्रभाकर जोशी (दुचक्के). त्यांचे वडील हे शिक्षक होते. ते दत्तोपासक होते. गुरुचरित्राचे पारायण, साधना हा त्यांचा आवडीचा विषय होता. मोरेश्वर हे प्रभाकरपंत व वेणूबाई यांचे तिसरे अपत्य. त्यांचा जन्म श्रावण शुद्ध चतुर्थीला (शके १८४७) झाला. आर्वीला त्यांच्या घरापुढेच शाळा होती. एके दिवशी शाळेत जाताना छोट्या मोरेश्वरला आत्महत्या केलेल्या एका महिलेचे प्रेत एका विहिरीत दिसले; त्या अत्यंत करुण प्रसंगाने त्याच्या बालमनावर परिणाम झाल्याने तो अबोल व अंतर्मुख बनला. माध्यमिक शाळेत असताना त्याला अनेक सत्पुरुषांचे दर्शन झाले. वडिलांबरोबर अनेक वेळा संत तुकडोजी महाराज यांच्या आश्रमात जाण्याचा योगही त्यास लाभला. मोरेश्वर याचा ओढा धार्मिक-चिंतनपर ग्रंथांकडे होता.

     मोरेश्वर पंधरा वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले. मॅट्रिकपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यावर ते संत तुकडोजी महाराजांच्या भजनी मंडळात दाखल झाले व जन-जागृती करीत गावोगावी हिंडले; पण गुरुदेव सेवा मंडळात मन न रमल्यामुळे ते आर्वीला परतले. त्यांनी आर्वी येथील दत्तमंदिरात नित्य उपासना सुरू केली व समवयस्क मुलांना एकत्र करून त्यांना योगासने-प्रार्थना शिकवणे सुरू केले. त्यांना युवकांमध्ये कार्य करण्याची आवड असून त्यांच्याकडे उत्तम संघटन- कौशल्य होते. त्यांनी काही काळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेही कार्य केले. पण एके दिवशी हे सारे कार्य आणि आर्वी गाव सोडून एका वेगळ्या मन:स्थितीत ते थेट पंढरपूरला रवाना झाले. श्री क्षेत्र पंढरपुरात त्यांनी विप्रदत्त मंदिराजवळ वास्तव्य केले. त्यांनी अनेक संतांच्या गाठीभेटी घेतल्या. विठ्ठल मंदिरात जाऊन विठ्ठलाची मनोभावे भक्ती करताना या काळातील एका काव्यरचनेत ते म्हणतात : ‘नको करू पायापरता। आता मज पंढरीनाथा॥’ काही वर्षे पंढरीत राहिल्यानंतर विठ्ठलाच्या आदेशानेच त्यांनी नाशिकला जाऊन पंचवटीमध्ये अडीच-तीन वर्षे घोर तपःश्चर्या केली. नंतर विदेही अवस्थेतच ते थेट मध्य प्रदेशातील मंदिरात गेले असता महान यती महेश्वरानंद यांच्याशी त्यांची भेट झाली व त्यांनी मोरेश्वरांना उन्मनी अवस्थेचा अनुभव दिला. या यतीच्या आदेशाने त्यांनी वृंदावनला गमन केले. तेथे ‘शाम दाऊनि शांतवी देवा। वाजवी सोऽहं पावा॥’ अशा शब्दांत त्यांनी करुणा भाकली.

    मोरेश्वरांना अनेक साधू, महंत, योगी, तपस्वी यांच्याकडून काही ना काही विद्या मिळत राहिली. नागा साधूंंकडून त्यांना मंत्रविद्या मिळाली, बिहारी-बंगाली साधूंकडून तंत्रविद्या प्राप्त झाली. महात्मा गांधी, विनोबा भावे आणि तुकडोजी महाराज यांचाही सहवास त्यांना मिळाला. भटकत भटकत ते अहमदनगर जिल्ह्यातील मढी येथे कानिफनाथांच्या दर्शनास आल्यावर त्यांना ‘माचणूर’ या सिद्धक्षेत्री जाण्याचा आदेश झाला आणि त्यानुसार १९५५ पासून माचणूर हेच त्यांचे अखेरपर्यंतचे वास्तव्यस्थान बनले.

     माचणूरला येताना ते अक्कलकोटला स्वामी समर्थ यांच्या दर्शनाला गेले. तेथे भोसले संस्थानिकांनी त्यांना चतुर्मास सप्ताह करण्याची विनंती केली. या सप्ताहात त्यांचे चिंतन, निरूपण-शैली यांमुळे असंख्य भाविक आकर्षित झाले व त्यांनी ‘बाबा महाराज आर्वीकर’ असे म्हणून त्यांचा गौरव केला.

     लोकांनी केवळ वृद्धापकाळात देव-देव करून पुण्यकर्म करावे, हा विचार आर्वीकरांना मान्य नव्हता. अंगात सळसळता उत्साह आणि जोम असणार्‍या तरुणांनी आपल्या पौरुषाने भारताच्या सांस्कृतिक संचिताचे जतन व संवर्धन करावे असे त्यांचे चिंतन होते. त्यामुळे सनातन वैदिक विचार परिपुष्ट करण्यासाठी त्यांनी तरुण, उत्साही साधकांची जडणघडण करण्यावर भर दिला. त्यासाठी ते दरवर्षी मार्गशीर्ष शुद्ध पंचमी ते एकादशी (गीता जयंती) ‘साधना सप्ताह’ आयोजित करीत असत.

     मोरेश्वर यांचे वाङ्मय हे आध्यात्मिक चिंतनाचे नवनीत आहे. ‘दिव्यामृतधारा’ (३ खंड), ‘ब्रह्मनिनाद’ (२ खंड), ‘प्रार्थना प्रभात’, ‘साधना संहिता’, ‘हरिपाठ’, ‘माचणूर हृद्गत’, ‘गुरुगीता’, ‘मानवगीता’ ही त्यांची पुस्तके साधकांना दीपस्तंभासारखी नित्य मार्गदर्शन करणारी आहेत. वयाच्या सेहेचाळिसाव्या वर्षी हिरडीला जखम झाल्याचे निमित्त होऊन मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिनी बाबा महाराज आर्वीकर यांचे निर्वाण झाले.

- विद्याधर ताठे

जोशी, मोरेश्वर प्रभाकर