Skip to main content
x

जोशी, मुरलीधर सदाशिव

 

निसर्गचित्रकार व कलाशिक्षक

१२ नोव्हेंबर १९१२ - २१ फेब्रुवारी २००१

एम.एस. जोशी हे निसर्गचित्रकार, कलाशिक्षक आणि ‘मॉडेल आर्ट इन्स्टिट्यूट’ या मुंबईतील प्रसिद्ध कलाशिक्षण संस्थेचे संस्थापक होते. मुरलीधर सदाशिव जोशी यांचा जन्म नाशिकमधील सिन्नर येथे झाला. नाशिकच्या सुंदर घाटांची नैसर्गिक रचना व भोवतालचा परिसर मुंबईच्या चित्रकारांना भुरळ पाडीत असे. त्या घाटावर चित्रण करण्यासाठी एस.एल. हळदणकर, त्रिंदाद, परांडेकर आदी ख्यातनाम चित्रकार सुट्टीत येत असत. शाळकरी वयातील मुरलीधर तासन्तास त्यांच्या चित्रांचे अवलोकन करीत असे.

कलेच्या ध्यासाने त्यांनी नाशिक सोडले. जे.जे.मध्ये शिक्षण घ्यायचे ही जिद्द असली तरी आर्थिक पाठबळ नव्हते. त्यांनी १९३२ मध्ये दादरला मालंडकरांकडे अभ्यास सुरू केला व अर्थार्जनासाठी ते शारदा फिल्म्समध्ये काम करू लागले. दुसर्‍या वर्षी, १९३३ मध्ये त्यांना सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश मिळाला. त्या काळी जे.जे.मध्ये वास्तववादी कामाला महत्त्व होते. वर्गात वास्तववादी काम व घरी आपल्या आवडीचे उत्स्फूर्त चित्रण करणे त्यांनी सुरू ठेवले.

ते १९३६ मध्ये ‘डिप्लोमा इन पेंटिंग’ ही परीक्षा  उत्तीर्ण झाले. त्यानंतर चित्रकार म्हणून त्यांची संपूर्ण कारकीर्द मुंबईमध्ये घडली. दादरमध्ये १९३९ साली  ‘मॉडेल आर्ट इन्स्टिट्यूट’ ही कलाशिक्षण संस्था स्थापन झाली. एस.के. ठोसर, आर.पी. जोशी आणि एम.एस. जोशी हे या संस्थेचे संस्थापक होते. हा सुरुवातीचा काळ आर्थिकदृष्ट्या त्यांना अत्यंत कठीण गेला. या काळात दिवसभर छबिलदास विद्यालयामध्ये चित्रकलेचे शिक्षक म्हणून ते नोकरी करत आणि सकाळी व संध्याकाळी मॉडेल आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये शिकवत. मॉडेल आर्टमधून कामाचे पैसे मिळाले नाहीत तरी छबिलदासच्या मिळणार्‍या पगारावर त्यांचा उदरनिर्वाह होई. तन, मन आणि धन यांसह मॉडेल आर्ट इन्स्टिट्यूटसाठी त्यांनी स्वत:ला झोकून दिले होते. परंतु हे सर्व करत असतानाच त्यांची स्वत:ची कलानिर्मितीही अव्याहत सुरू होती.

त्यांना १९६४ मध्ये ललित कला अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. १९९० मध्ये ते महाराष्ट्र गौरव पुरस्काराचे मानकरी ठरले. १९४७ ते १९६३ या काळात त्यांना बॉम्बे आर्ट सोसायटीची बारा पारितोषिके मिळाली, ज्यांत १९८३ मधील रौप्यपदकाचा समावेश आहे. म्हैसूर दसरा प्रदर्शनांत, १९५३ ते १९५४ या काळात व १९६० मधील रौप्यपदकासह त्यांना पंधरा पारितोषिके मिळाली. याशिवाय त्यांना आर्ट सोसायटी ऑफ इंडिया, ऑल इंडिया फाइन आर्ट अ‍ॅण्ड क्राफ्ट सोसायटी, दिल्ली, इंडियन अकॅडमी ऑफ फाइन आटर्स, अमृतसर, हैद्राबाद आर्ट सोसायटी अशा देशभरातील अनेक संस्थांच्या प्रदर्शनांत पुरस्कार मिळाले. एम.एस. जोशी यांची १९७१ ते १९८२ या काळात अकरा एकल व अनेक समूह प्रदर्शने झाली.

भारतीय वास्तववादी निसर्गचित्रणाला ब्रिटिश काळापासूनचा इतिहास आहे. ब्रिटिशांच्या भारतातील आगमनानंतर ब्रिटिश अकॅडमिक शैलीची परंपरागत आखीव-रेखीव व शिस्तबद्ध वैशिष्ट्ये भारतीय चित्रकारांनी सुरुवातीच्या काळात आत्मसात केली. नंतरच्या काळात यात स्वत:ची ओळख आणि अभिव्यक्ती शोधण्याचे प्रयत्न केले, ते जोशींच्या अगोदरच्या पिढीतील चित्रकारांनी. दैनंदिन जीवनातील विषय व परिसर निसर्गचित्रांमध्ये येऊ लागला. अभिव्यक्तीत अधिक मोकळेपणा व उत्स्फूर्तता येऊ लागली. कलाकारांची १९३० ते १९४० या काळातील कलानिर्मिती पूर्वसुरींच्या प्रभावातून मुक्त होऊ पाहत होती. झपाटल्यासारखी निसर्गचित्रे रंगविणार्‍या आणि उत्स्फूर्त अभिव्यक्ती करणार्‍या अशा कलावंतांत एम.एस. जोशी यांचा अंतर्भाव करावा लागेल.

एम.एस. जोशींची चित्रे पाहताना या उत्स्फूर्ततेचा व मुक्ततेचा प्रत्यय येतो. त्यांच्या चित्रांमधले विषय भारतीय असून इथल्या परंपरा, माणसे व संस्कृतीशी ते संबंधित असत. भारतातील विविध स्थळे, घाट, बाजार, मिरवणुका, रस्ते, इथली गर्दी त्यांच्या चित्रांत चैतन्यपूर्ण पद्धतीने साकार होताना दिसते. त्यांच्या चित्रणातील निसर्ग एकटादुकटा व स्थिर नाही, तर तो माणसांच्या गर्दीमधला सळसळणारा व गतिमान आहे. अपारदर्शक रंगांचे ग्वॉश तंत्र आणि पारदर्शक जलरंगाचे तंत्र ह्या दोन्ही तंत्रपद्धतींचा त्यांनी वापर केला.

रंगलेपनातील विलक्षण आवेग हा जोशींच्या चित्रांचा विशेष आहे. नाशिक, मुंबई, कोकण, हरिद्वार, उदयपूर, दिल्ली अशा अनेक ठिकाणी त्यांनी निसर्गचित्रे रंगवली. उत्स्फूर्तपणे चित्रण करताना अनावश्यक बारकावे टाळले गेले तरी त्या-त्या ठिकाणची वैशिष्ट्ये, रंग, आकार आणि वातावरण, छायाप्रकाशाचे दृश्य परिणाम जोमदार फटकार्‍यांमधून साकार होतात. नाशिकचे घाट, घाटावरील मंदिरे, गेट वे ऑफ इंडिया, महालक्ष्मी मंदिर, गंगूर घाट, उदयपूर यांसारख्या चित्रांतील पाणी आणि पाण्यातील प्रतिबिंबे नजर खिळवून ठेवतात.

एम.एस. जोशींचे जुन्या मुंबईचे ‘मोती बझार, मुंबई’ हे निसर्गचित्र पाहताना मुंबई वातावरणाची संपूर्ण छाप या चित्रावर पडली आहे हे लक्षात येते. नाशिकचा चौक एका विशिष्ट संस्कृतीचे प्रतिनिधित्व करतो, तर मुंबईचा हा रस्त्यावरचा देखावा मुंबईच्या संमिश्र (कॉस्मोपॉलिटन) संस्कृतीची नोंद घेतो. नाशिकचा चौक रंगवतानाचे रंग एकमेकांच्या जवळचे, तर मुंबईचे चित्रण करतानाचे रंग एकमेकांना विरोधी, परंतु पूरक आणि शुद्ध स्वरूपात वापरलेले आहेत.

एम.एस. जोशी मोठ्या आकारात जलरंगातील निसर्गचित्रे रंगवीत. मोठा ब्रश घेऊन कागदावर स्पंजच्या साहाय्याने पाणी लावून, कधी कागद मोकळा सोडत, तर कधी रंग लावत ते चित्र झपाट्याने पूर्ण करत. व्यक्तिचित्रे व समूहचित्रे यांसाठी त्यांनी अनेक पारितोषिके मिळवली असली तरी त्यांची ख्याती होती ती त्यांच्या चैतन्याने झपाटलेल्या उत्स्फूर्त निसर्गचित्रांसाठीच!

एक सहृदय शिक्षक आणि प्रांजळ व्यवस्थापक म्हणूनही त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. मॉडेल आर्ट इन्स्टिट्यूटच्या प्रगतीसाठी नियमांचे काटेकोर मापदंड न लावता जोशींनी अखंड प्रयत्न केले. शिक्षकांच्या वैयक्तिक अडचणी वेळीच ओळखून त्यांना साहाय्य व कलानिर्मितीसाठी प्रोत्साहन दिले. भारतात विविध ठिकाणी होणार्‍या कलाप्रदर्शनांसाठी संस्थेच्या शिक्षकांनी आपआपल्या कलाकृती पाठवाव्यात यावरही जोशींचा कटाक्ष असे आणि अशा वेळी गरज पडल्यास एखाद्या शिक्षकाचा खर्च ते आपणहून करत.

वयाची ऐंशी वर्षे उलटल्यानंतर मॉडेल आर्ट इन्स्टिट्यूटच्या दैनंदिन कामकाजातून जोशींनी लक्ष काढून घेतले. तरीही संस्थेवरच्या प्रेमापोटी ते जवळजवळ रोज येत आणि नित्यनियमाने मॉडेल आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये बसून निसर्गचित्रण करीत. बघता बघता कागद छाया-प्रकाशाच्या जोमदार फटकार्‍यांनी भरून जाई आणि त्यावर साकार होई कधी मुंबईतील बाजार, तर कधी नाशिकचा घाट, कधी खवळलेला समुद्र, तर कधी स्ट्रीट सीन... निसर्गचित्रांतून स्वत:ची ओळख सांगणारे एम.एस. जोशी कलाजगतात स्वत:चा ठसा उमटवून गेले.

- माणिक वालावलकर, दा.ग. पुजारे

संदर्भ ः ‘मास्टर स्ट्रोक्स ४’, एक्झिबिशन कॅटलॉग; जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई; २००५.

संदर्भ :
ः ‘मास्टर स्ट्रोक्स ४’, एक्झिबिशन कॅटलॉग; जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई; २००५.

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].